India Women Hockey Team Beats Indonesia: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघाने विजयाची मालिका कायम ठेवत मैदानात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा दारुण पराभव केल्यानंतर, आता दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी इंडोनेशियावर 17-1 अशा अवाढव्य फरकाने दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात इंडोनेशियाचा संघ भारताच्या आक्रमक खेळासमोर पूर्णपणे हतबल दिसला. सुवर्णपदक जिंकण्याच्या स्पष्ट इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली आणि आपल्या चमकदार कामगिरीने सर्व क्रीडाप्रेमींची मने जिंकली.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच भारतीय खेळाडूंनी अत्यंत आक्रमक आणि वेगवान खेळ करत इंडोनेशियावर दबाव आणला. भारताच्या जोरदार आक्रमणामुळे हाफ टाईमपर्यंतच संघाने 9 गोल डागून विजयाचा पाया रचला. दुसऱ्या हाफमध्येही भारतीय खेळाडूंचा हाच जलवा कायम राहिला. भारताकडून दीपिका, सुनेलिता टोप्पो, लालरेमसियामी, ऋतुजा पिसळ, साक्षी राणा, सलीमा टेटे, नवनीत कौर आणि इशिका चौधरी यांनी उत्कृष्ट ताळमेळ दाखवत एकापाठोपाठ एक गोल केले. इंडोनेशियाची गोलरक्षक आणि बचाव फळी भारतीय आक्रमकांचे वार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली, ज्यामुळे भारताने तब्बल 16 गोलांच्या फरकाने हा सामना खिशात घालत पुढील फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या बाजूला इंडोनेशियाचा संघ संपूर्ण सामन्यात केवळ एकच गोल करु शकला. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंडोनेशियाच्या इन्नेस आदित्य हिने भारताची बचाव फळी भेदून चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला, मात्र त्याव्यतिरिक्त इंडोनेशियाला कोणतीही मोठी कमाल करता आली नाही. याआधी पुरुषांच्या हॉकी सामन्यातही भारताने इंडोनेशियाचा 13-1 असा धुव्वा उडवला आणि आता महिला संघानेही तीच पुनरावृत्ती केली. उझबेकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दीपिका सेहरावतने एकटीने 8 गोल डागले. सलग दोन मोठ्या विजयांमुळे भारतीय महिला हॉकी संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला असून सुवर्णपदकाकडे त्यांची वाटचाल वेगाने सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.