Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेबाबत सुरु असलेल्या गोंधळादरम्यान, स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, भारताला त्याचे सामने यूएईमध्ये खेळण्याची ऑफर दिली जाऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. अशा स्थितीत भारताने अंतिम फेरी गाठल्यास अंतिम सामनाही यूएईमध्येच होणार आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक 4 फेब्रुवारी रोजी बहरीनमध्ये झाली. यापूर्वी एसीसीने आपले वेळापत्रक जाहीर केले होते, ज्यात या स्पर्धेचे यजमान म्हणून पाकिस्तानचा उल्लेख नव्हता.
मीडियाशी बोलताना पीसीबीचे प्रमुख नजम सेठी म्हणाले की, पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या (ICC) बैठकीत या विषयावर आणखी चर्चा होईल कारण हा मुद्दा अद्याप सुटलेला नाही.
ते पुढे म्हणाले की, 'एसीसीच्या बैठकीत काय झाले यावर काय बोलू. तोडगा निघू शकला नाही.' मात्र, या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे कायम राहण्याची शक्यता आहे, तर काही सामने यूएईमध्ये होणार असून भारत आपले सर्व सामने तिथे खेळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, भारत जेव्हा अंतिम फेरीत पोहोचेल तेव्हा फायनलही होईल. आशिया चषक या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे, परंतु बीसीसीआयचे सचिव आणि एसीसी प्रमुख जय शाह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ पाकिस्तानला (Pakistan) जाणार नसल्याचे सांगितले होते.
पाकिस्तान आणि भारत द्विपक्षीय क्रिकेट खेळत नाहीत. दोन देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे 2013 पासून केवळ जागतिक स्पर्धा किंवा बहु-सांघिक स्पर्धांमध्येच हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत.
भारताचा शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 च्या आशिया चषकासाठी होता, तर पाकिस्तानचा शेवटचा भारत दौरा 2016 च्या ICC T20 विश्वचषकासाठी होता. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांशी शेवटचे खेळले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.