Asia Cup 2023: आशिया चषक 2023 चे आयोजन यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे अधिकृत यजमानपद सध्या पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानमध्येच ही स्पर्धा खेळवण्यात येणार की नाही, याबद्दल निर्णय आता मार्चमध्ये होणार आहे.
एशियन क्रिकेट काउंसिलची (ACC) बहारेनमध्ये शनिवारी बैठक झाली. या बैठकीसाठी एसीसीटचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी आणि अन्य संघांचे प्रतिनिधीही या बैठकीसाठी उपस्थितीत होते. मात्र या बैठकीत आशिया चषक 2023 स्पर्धेच्या ठिकाणाबद्दल अंतिम निर्णय घेण्यात अपयश आले.
त्यामुळे आता मार्चमध्ये पुन्हा एसीसीची बैठक घेण्यात येणार असून त्यावेळी या प्रकरणाबद्दल निर्णय घेतला जाईल.
एसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की 'आगामी आशिया चषक 2023 स्पर्धेबद्दल चर्चा झाली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठीच्या गोष्टींवर चर्चा करण्याचे बोर्डाने मान्य केले होते. या चर्चेचे अपडेट मार्च 2023 मध्ये होणाऱ्या पुढील एसीसीच्या बैठकीत घेण्यात येतील.'
(Final decision whether Pakistan will host the 2023 Asia Cup or not will be taken in March)
गेल्या काही महिन्यांपासून आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानला आशिया चषक खेळण्यासाठी जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी म्हटले होते, की जर भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही, तर पाकिस्तानही 2023 वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार नाही. या दोन विधानांनंतर आशिया चषकाच्या ठिकाणाबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते.
क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार असेही समजत आहे की नजम सेठी यांनी बैठकीतही हे स्पष्ट केले होते की जर भारतीय संघ पाकिस्तानला आला नाही, तर पाकिस्तानही 2023 वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही. तसेच असेही समोर आले आहे की एसीसीस सदस्यांनी प्रत्येक संघाला पाकिस्तानला जाण्यासाठी त्यांच्या सरकारची परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जर पाकिस्तानला आशिया चषक झाला नाही, तर तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाऊ शकतो. यंदाचा आशिया चषक वनडे क्रिकेटच्या स्वरुपातील असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे 2009 साली श्रीलंकन संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेकवर्षे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले गेले नव्हते. पण गेल्या तीन वर्षांपासून भारत व्यतिरिक्त अन्य संघ नियमितपणे पाकिस्तानचा दौरा करत आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकिय वादामुळे या दोन्ही संघात क्रिकेट सामनेही नियमित होत नाहीत. हे दोन्ही संघ अखेरचे द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळले होते. त्यानंतर हे दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात.
दरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीत 2023-24 दरम्यानचे वेळापत्रक मंजूर करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.