AFC Champions League FC Goa defense again under discussion Tough challenge from the mighty Persepolis team 
क्रीडा

AFC Champions league: एफसी गोवाचा बचाव पुन्हा चर्चेत; बलाढ्य पर्सेपोलिस संघाचे खडतर आव्हान

गोमंतक वृत्तसेवा

पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाचा कणखर बचाव मंगळवारी पुन्हा चर्चेत असेल. लागोपाठ दोन लढतीत मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना गोलशून्य बरोबरीत रोखलेल्या या संघाने लक्षणीय प्रगती प्रदर्शित केली आहे. त्यांच्यासमोर आता सलग दोन विजयासह ई गटात अव्वल स्थानी असलेल्या इराणच्या पर्सेपोलिस एफसीचे खडतर आव्हान असेल.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल, त्यावेळी स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला आणि नऊ फटके अडवलेला एफसी गोवाचा वीस वर्षीय गोलरक्षक धीरज सिंग याच्यावर साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या असतील. एफसी गोवाने कतारचा अल रय्याने आणि संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा या क्लबने बरोबरीत रोखून दोन गुण प्राप्त केले आहेत. पर्सेपोलिस संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी अल वाहदा क्लबला 1-0 असे निसटते, तर अल रय्यान संघाला पिछाडीवरून 3-1 फरकाने नमवून सहा गुणांसह गटात अग्रस्थान मिळविले आहे. पर्सेपोलिस संघ एएफसी चँपियन्स लीगमधील दोन वेळचा उपविजेता आहे. (AFC Champions League FC Goa defense again under discussion Tough challenge from the mighty Persepolis team)

गोल नोंदविणे आवश्यक : फेरांडो

एफसी गोवाने भक्कम बचाव प्रदर्शित करून वाहव्वा मिळविली असली, तर आता गोल नोंदविणे आवश्यक असल्याचे मत या संघाचे 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘‘गोल नोंदविणे महत्त्वाचे आहे, पण त्याच वेळी ते अवघडही असेल. पर्सेपोलिसच्या रुपात आम्ही खूप कठीण संघाचा सामना करणार आहोत. प्रत्येक वेळी एक पाऊल आणि एकच सामना हेच लक्ष्य आम्ही बाळगले आहे. सध्या आमच्यासाठी पर्सेपोलिसविरुद्ध उद्या होणारा सामना अतिशय महत्त्वाचा आहे,’’ असे फेरांडो म्हणाले. एएफसी चँपियन्स लीगमुळे मिळालेले व्यासपीठ एफसी गोवासाठी भावी कालखंडात विकासाच्या दृष्टीने परिणामकारक असल्याचेही फेरांडो यानी नमूद केले. बलाढ्य संघाविरुद्ध खेळूनच प्रगती साधता येते असे ते म्हणाले.

एफसी गोवा दृढनिश्चयी ः गोल मोहम्मदी

इराणच्या पर्सेपोलिस संघाचे मुख्य प्रशिक्षक याह्या गोलमोहम्मदी यांनी एफसी गोवाच्या मागील दोन लढतीतील प्रगतीची दखल घेतली आहे. एफसी गोवा दृढनिश्चयी संघ असल्याने त्यांच्याविरुद्ध संधी साधणे जास्त गरजेचे आहे, असे त्यांना वाटते. ‘‘उत्कृष्ट संघ असल्याचे एफसी गोवाने सिद्ध केले आहे आणि मला वाटते, की ते आतापर्यंत चँपियन्स लीगमधील सरप्राईज पॅकेज ठरले आहेत. त्यांनी दोन चांगल्या संघांना रोखले आहे आणि या दोन्ही बरोबरी निश्चितच नशिबवान नव्हत्या,’’ असे 50 वर्षीय गोलमोहम्मदी यांनी एफसी गोवाविषयी सांगितले. ‘‘एफसी गोवा संघात नियमित खेळाडू असून गोलरक्षकाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे, तरीही आपला संघ संधी निर्माण करेल याची आशा आहे, त्यावेळी संधीचा लाभ घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आम्ही उच्च दर्जाची एकाग्रता आणि व्यवहारज्ञानासह खेळणे आवश्य आहे,’’ असे 13 वेळा पर्सियन गल्फ प्रो-लीग स्पर्धा जिंकलेल्या संघाचे प्रशिक्षक म्हणाले.

आजचे सामने (ई गट)

- अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) विरुद्ध अल रय्यान (कतार), रात्री 8 वाजता

- पर्सेपोलिस (इराण) विरुद्ध एफसी गोवा (भारत), रात्री 10.30 वाजता

- दोन्ही सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाचे सलग 2 सामने गोलशून्य बरोबरीत

- स्पर्धेत 180 मिनिटे क्लीन शीट

- गटात गोल न स्वीकारलेला एफसी गोवा एकमेव संघ

- पर्सेपोलिस संघाचे ई गटात सर्वाधिक 4 गोल

- इराणचा लीग विजेता संघ 6 गुणांसह अग्रस्थानी

- पर्सेपोलिस संघ 2018 व 2020 मध्ये एएफसी चँपियन्स लीगमध्ये उपविजेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT