Esha Singh, Palak and Divya TS Twitter/Media_SAI
क्रीडा

Asian Games: भारतीय नेमबाजांचा सहाव्या दिवशीही अचूक नेम! टेनिस, स्कॅश, गोळाफेकमध्येही मिळाली मेडल

Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी धडाकेबाज कामगिरी नोंदवली असून सहाव्या दिवसापर्यंत तब्बल १८ पदके नावावर केली.

Pranali Kodre

19th Asian Games Hangzhou, 6th Day 29th September, India Result :

चीनमध्ये सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा धडाका सुरूच आहे. शुक्रवारी (२९ सप्टेंबर) या स्पर्धेचा सहावा दिवस आहे. या सहाव्या दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकांचा पाऊस पाडला आहे.

सहाव्या दिवसाखेर भारताच्या खात्यात एकूण 33 पदके जमा आहेत. यामध्ये ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.

शुक्रवारी भारताला पहिले पदक महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात मिळाले. इशा सिंग, पलक आणि दिव्या टीएस यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने रौप्य पदक जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत १७३१ स्कोअर केला. या प्रकारात चीनच्या संघाने १७३६ स्कोअर करत सुवर्णपदक जिंकले, तर चायनिज तिपैईने १७२३ स्कोअरसह कांस्य पदक जिंकले.

दरम्यान महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक प्रकारातही इशा सिंग आणि पलकने पराक्रम गाजवला. पलकने वैयक्तिक सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर इशाने रौप्य पदक जिंकले.

पलकने अंतिम फेरीत २४२.१ स्कोअर केला, तर इशाने २३९.७ स्कोअर केला. तसेच पाकिस्तानच्या तलक किशमाला हिने २१८.२ स्कोअरसह कांस्य पदक मिळाले.

वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक

शुक्रवारी ५० मीटर रायफल ३ पोसिशन सांघिक प्रकारात भारताच्या संघाने विश्वविक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या संघात स्वप्निल कुसळे, ऐश्वर्य तोमर आणि अखिल शोरन यांचा समावेश आहे. त्यांनी अंतिम फेरीत १७६९ स्कोअरसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. हा विश्वविक्रमही आहे.

विशेष म्हणजे याच प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या चीनच्या संघानेही जूना विश्वविक्रम मागे टाकला. लिंशू दू, हाओ यू आणि जियामिंग तियान यांचा समावेश असलेल्या चीनच्या संघाने १७६३ स्कोअर केला आहे.

यापूर्वी ५० मीटर रायफल ३पोसिशन सांघिक प्रकारात अमेरिका संघाच्या नावावर विश्वविक्रम होता. त्यांनी गेल्यावर्षी १७६१ स्कोअर केला होता. हा विक्रम आता भारताच्या नावावर असून दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल ३ पोसिशन वैयक्तिक प्रकारात शुक्रवारी ऐश्वर्य तोमरने रौप्य पदकही जिंकले. त्याने अंतिम फेरीत ४५९.७ स्कोअर केला. तसेच अव्वल क्रमांकावर ४६०.६ स्कोअरसह चीनचा लिंशू दू राहिल्याने त्याने सुवर्ण पदक जिंकले, तर चीनच्याच जियामिंग तियानने ४४८.३ स्कोअरसह कांस्यपदक जिंकले.

नेमबाजीत शुक्रवारपर्यंत भारताने १८ पदके मिळवली आहेत. यात ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

टेनिसमध्येही पदक

शुक्रवारी टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी या भारताच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताची जोडी चायनिज तिपैईच्या जेसन जंग आणि एचसू यू-एचसिऊ या जोडीकडून ४-६,४-६ अशा फरकाने पराभूत झाली.

दरम्यान, टेनिसमध्येच रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले या भारताच्या जोडीने मिश्र दुहेरीतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचेही पदक पक्के आहे.

स्क्वॅशमध्ये कांस्य

शुक्रवारी स्कॅशमध्ये भारताच्या महिला संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यांना उपांत्य फेरीत हाँग काँगकडून २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला.

याबरोबरच शुक्रवारी स्क्वॅशमध्ये भारताच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत मलेशियाला २-० असे पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला असल्याने त्यांचेही पदक पक्के झाले आहे. भारताचा अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाची सामना होणार आहे.

गोळाफेकमध्ये पदक

भारताच्या 24 वर्षीय किरण बालियानने इतिहास रचला आहे. महिलांच्या गोळाफेकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. किरणने 17.36 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक जिंकले.

बॅडमिंटनमध्येही पदक, तर निखतला ऑलिम्पिक तिकीट

आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळला ३-० असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच भारताचे पदक पक्के झाले आहे. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल ३७ वर्षांनी बॅडमिंटनमध्ये भरताचे पदक पक्के झाले आहे.

भारताची स्टार बॉक्सर निखत जरिनने देखील पदक पक्के केले असून तिने पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे. तिने शुक्रवारी महिलांच्या ५० किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीत जॉर्डनच्या हानान नासरचा 53 सेकंदात पराभव केला. याविजयासह तिने पदक आणि ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले. ती पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली बॉक्सर आहे.

तसेच भारताच्या हॉकी संघाने मलेशियाविरुद्ध ६-० असा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बास्केटबॉलमध्ये महिला प्रिलिमिनरीमध्ये भारतीय संघाने मंगोलियाला ६८-६२ अशा फरकाने पराभूत केले असून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT