19th Asian Games Hangzhou, 5th Day 28th September, India Result:
चीनमध्ये सुरू असेलल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा गुरुवारी (28 सप्टेंबर) पाचवा दिवस होता. पहिल्या चारही दिवशी पदकांची बरसात झाल्यानंतर पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात 3 पदके आली असून ही तीनही पदके वेगवेगळ्या खेळात मिळाली आहेत.
पाचव्या दिवशी भारताला नेमबाजीत सुवर्ण, वुशूमध्ये रौप्य आणि घोडेस्वारीमध्ये कांस्य पदक मिळाले. गुरुवारी भारताला पहिले पदक रोशिबिना देवी हिने मिळवून दिले. तिने वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे. तिला अंतिम सामन्यात चीनच्या शियाओवेईने 2-0 असे पराभूत केले.
तसेच नंतर भारताला नेमबाजीतील पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक मिळाले. 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात सरबज्योत सिंग, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंग चिमा यांचा समावेश होता. हे नेमबाजीतील एकूण चौथे सुवर्णपदक ठरले.
तसेच घोडेस्वारीमध्ये ड्रेसेजमध्ये अनुश अगरवाल्ला याला कांस्य पदक मिळाले. हे आशियाई क्रीडा स्पर्धेत ड्रेसेजमध्ये भारताला मिळालेले पहिले वैयक्तिक पदकही ठरले.
याशिवाय हॉकीमध्ये साखळी फेरीत भारतीय पुरुष संघाने जपानला 4-2 अशा गोल फरकाने पराभूत केले आहे. मात्र, फुटबॉलमध्ये भारतीय पुरुष संघाला उपउपांत्यपूर्व फेरीत सौदी अरेबियाकडून 2-0 अशा गोलफरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
टेनिस आणि स्क्वॅशमध्ये पदक पक्के झाले आहे. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी भारताच्या जोडीने पुरुष दुहेरीत अंतिम फेरी गाठत पदक पक्के केले आहे. तसेच रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनीही मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत पदक पक्के केले.
तसेच स्कॅशमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत पदक निश्चित केले आहे.
दरम्यान गुरुवारी भारताच्या महिला जलतरणपटूंनी राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. त्यांनी महिलांच्या 4x200 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी गुरुवारी अंतिम फेरीत 8:37.58 सेकंद वेळ नोंदवली.
मात्र असे असले, तरी भारताचा संघ अंतिम फेरीत सर्वात शेवटी राहिला. या संघात धिनिधी देसिंघू, वृत्ती अगरवाल, शिवांगी शर्मा आणि हशिका रामचंद्रा यांचा समावेश होता.
तसेच स्विमिंगमधील 4x100 मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात भारतीय पुरुष संघानेही अंतिम फेरीत प्रवेश केलेला पण ते शेवटच्या स्थानी राहिले.
दरम्यान, गुरुवारपर्यंत भारताच्या खात्यात एकूण 25 पदके जमा झाली असून यात 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.