पणजी: "व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय आणि मला माझ्या मैत्रिणीला घेऊन डेटवर जायचं आहे. मला ती खूप आवडते, पण तिच्या मनात माझ्यासाठी नक्की काही भावना आहेत की नाही मला अंदाज येत नाहीये. मी तिला आवडलो पाहिजे, पण नेमकं काय केल्याने ती मला पसंत करेल याचं उत्तर सापडत नाहीये."
रविवारी एका कॅफेत आम्हा मित्रमंडळीच्या गप्पा सुरू असताना 24 वर्षांच्या रोहनने थेट मुद्द्याला हात घातला. पहिली डेट या विचारानेच त्याला दडपण आलं होतं.
व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.. त्यानिमित्त रोहनसारखी कित्येक मुलं किंवा मुली पहिल्या डेटचं प्लान करतायंत. नात्याच्या श्रीगणेशा करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांनी पहिल्या डेटवर जाण्यापूर्वी काही गैरसमज दूर केले पाहिजे.
असं म्हणतात First Impression is the Last Impression, त्यामुळे पहिल्या भेटीत आपण जर का समोरच्या व्यक्तीवर आपण छाप पाडली की आपण निम्मी लढाई जिंकली. हे काही प्रमाणात खरं असलं तरी हेच अंतिम सत्य नाही. आणि हो तुम्ही छाप पाडणं आणि परफेक्ट दिसावं, वाटावं यासाठी खटाटोप करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
ही पहिली डेट यशस्वी व्हावी म्हणून काही गोष्टी पढवून पाठवलं जातं, आपल्याला सुद्धा पहिल्यावेळी कसं वागावं याचा ताण आलेला असतोच आणि काही चुका घडतात. आज आम्ही तुम्हाला पहिल्या डेटबदल अशा काही गैरसमज दूर करणार आहोत
1. पहिल्या डेट 'परफेक्ट' झालीच पाहिजे:
पहिल्या डेटवर आपल्याला "सर्व काही परफेक्ट असायला हवं" असं वाटतं. ही पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे खरी मात्र डेटवर "परफेक्ट" असणं आवश्यक नाही. खरं तर डेटवर असलेल्या व्यक्तीसोबत आपण किती सहज वागू शकतो हे जास्त महत्वाचे असते. आपण जसे आहोत तसे जेव्हा समोरच्या व्यक्तीला सामोरे जातो तेव्हा ताण येत नाही, खरेपणा दिसतो, आत्मविश्वास वाढतो आणि तेव्हा डेट खऱ्या अर्थाने 'परफेक्ट' ठरते.
2. 'पहिल्या डेट'मध्येच सगळं फायनल:
अनेक जण असा विचार करतात की पहिल्या डेटवरच आपला समोरच्या माणसाबद्दल निर्णय झाला पाहिजे, आपल्याला तो माणूस क्लिक झाला पाहिजे. पण इथेच सगळी गडबड होते. पहिल्या भेटीत तुम्हाला ती व्यक्ती आवडलीच पाहिजे, हीच व्यक्ती आपली जोडीदार होईल, अे फिल्मी अट्टहास नको. आणखी दोन- तीन वेळा भेटून तुम्हाला समोरची व्यक्ती कशी आहे याचा पुरेसा अंदाज येईल आणि त्यानंतर निर्णय घेतला तरी चालू शकतं.
त्यामुळे पहिली डेट ही फक्त पहिली भेट आहे आणि या एका डेटवर सर्व निर्णय घेतले जात नाहीत.
3. पहिली डेट 'खर्चिक' असली पाहिजे:
आपण पहिल्या डेटला एक महागड्या रेस्टॉरंटमध्ये, शॉपिंग मॉलमध्ये किंवा सिनेमाला जाऊन किंवा काही महागडी गिफ्ट्स आणून आपण समोरच्या व्यक्तीला पटकन इम्प्रेस करू शकतो असं काही लोकं समजतात. पण तुम्ही किती मोठ्या, महागड्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये जाताय यापेक्षा तुमच्यामध्ये किती आपुलकी निर्माण होते, माणूस तुमच्याशी किती खरं वागतो हे महत्त्वाचं आहे.
4. पहिल्या डेटमध्ये चुकीला माफी नाही:
माणूस हा कधीही आणि कुठेही चुकू शकतो, त्यामुळे मी आज डेटवर आहे याचं दडपण असताना तुमच्या हातून एखादी क्षुल्लक चूक घडली तरीही त्यात काहीही गैर नाही. काही लोकं पहिल्या डेटवर खूप विचार करत असतात की काही चुक झाल्यास समोरची व्यक्ती 'न्यायाधीश' असल्यासारखं आपल्याला जज करणार, आपलं नातं सुरू होण्यापूर्वीच फिस्कटेल असा अतिविचार डोक्यात सुरू असतो. पण हे लक्षात ठेवा माणूस म्हटलं की चूक होणारच. पहिल्या भेटीत चूक झाली तरी हरकत नाही. दडपण न घेता समोरच्याची माफी मागा.
5. पहिली डेटवर चर्चा फक्त 'प्रेमाची'?
तुम्ही डेटवर जाताय म्हणजे त्यात फक्त प्रेमाच्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे असं नाही. तुम्ही सर्वात आधी मैत्रीचं नातं निर्माण केलं पाहिजे.
यासाठी थेट प्रेमाच्या मुद्द्याला हात घालण्याऐवजी हलके फुलके विषय जशा की आवडीनिवडी, नोकरी किंवा व्यवसायातील अनुभव, बालपणातले किस्से अशा गोष्टींवरून गप्पांन सुरूवात करावी. आणि हो तुमचं मत मांडत बसू नका. समोरच्या व्यक्तीचंही म्हणणं ऐका. इंग्लिशमध्ये आपण Active Listening म्हणतो ते हेच.
"पहिल्या डेटनंतरच 'बेडरुम'पर्यंत पोहोचू" असल्या भंपक अपेक्षा डोक्यात ठेवून जाऊ नका. पहिली डेट हा एक नवीन अनुभव असतो, यात आपण समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न करतो. पहिल्या भेटीसाठी मिळालेला वेळ हा एका नात्याची पायाभरणी ठरू शकते. मग ते नातं प्रेमापर्यंत न पोहोचता मैत्रीवरच थांबलं तरी हरकत नाही. अपेक्षांचं ओझं न ठेवता बिनधास्त डेटवर जा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.