
How to handle when a girl only wants to be friends
पणजी : "आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत, खूप कमी वेळात आम्ही अगदी सहज एकमेकांना समजू शकलो आणि मी तिच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला हे प्रेम असेल असं वाटलं नाही, पण एकेदिवशी न राहून तिला सांगून टाकलं. वाटलं ती दरवेळीप्रमाणे मला समजून घेईल, तिलाही असंच वाटत असेल, पण नाही. ती म्हणाली मी तिच्यासाठी फक्त एक चांगला मित्र आहे, आणि ती मला मित्राच्या पलीकडे बघतच नाही. मला ही मैत्री तोडायची नाही, आणि माझं प्रेम सुद्धा तेवढंच खरं आहे. मग मी काय करावं?"
न्यूजरुममध्ये नातेसंबंध म्हणजेच रिलेशनशिप या लेखमालेबाबत चर्चा करत असताना सहकाऱ्याने त्याच्या मित्राचा अनुभव शेअर केला. अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, जिथे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या निस्सीम प्रेमात असता, मात्र ती व्यक्ती तुमच्यात मैत्रीच्या पलीकडे गुंतलेली नसते. भावनांच्या या द्विधा स्थितीमुळे मैत्रीचं नातं सुद्धा बिघडेल का अशी भीती वाटायला लागते. जेव्हा दोन व्यक्तींच्या भावना आणि अपेक्षांमध्ये फरक असतो, तेव्हा भावना समजून घेणं आणि त्यावर उघडपणे बोलणं महत्त्वाचं ठरतं.
परिस्थिती समजून घ्या:
लक्षात घ्या ही परिस्थिती विचित्र असली तरीही अवघड नाही. नातं, रोमँटिक असो किंवा मैत्रीचं त्यात संवाद, विश्वास आणि अनुभव हे घटक फार महत्वाचे ठरतात.
मुलाचा दृष्टीकोन: वाढत्या मैत्रीसोबत मुलाच्या मनात कदाचित रोमँटिक भावना निर्माण होऊ शकतात. एकत्र घालवलेला वेळ, सोबतीचे काही क्षण किंवा शारीरिक आकर्षण यामुळे मुलाच्या मनात प्रेमभावना निर्माण होऊच शकते. नातेसंबंधातील त्याची रुजलेली खोल भावनिक गुंतवणूक कदाचित त्याला मैत्रीच्या पुढे जायला प्रवृत्त करते, ज्यात काही गैर नाही.
मुलीचा दृष्टीकोन: पण दुसऱ्या बाजूने ती मुलगी मुलाला फक्त एक मित्र म्हणून पाहत असते, आणि तिची भावनिक गुंतवणूक मैत्रीच्या पलीकडे गेलेली नसते. ती नातेसंबंधांना महत्त्व देते पण तिच्या भावना या त्याच्याप्रमाणे रोमँटिक नसतात. याचा अर्थ तिला त्याच्याबद्दल काळजी वाटत नाही असा होत नाही; याचा अर्थ फक्त तिच्या अपेक्षा वेगळ्या आहेत असा होतो.
भावनिक अस्वस्थता: मुलगा आणि मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून खूप चांगले मित्र असतात, त्यांच्यात छान बॉण्ड निर्माण झालेला असतो आणि म्हणून नकळत आपोआप अपेक्षा ठेवल्या जातात, अशा परिस्थितीत मुलीने प्रेमात दिलेला नकार पचवणं मुलासाठी कठीण होतं. हा भावनिक गोंधळ दोघांनाही सोडवणं कठीण जातं, हाती निराशा येते. मुलीला तिच्या मित्राला दुखवायचं नसतं मात्र प्रेम सुद्धा करता येत नाही आणि एक छान नातं विस्कटायला सुरुवात होते.
गैरसमज: भावनिक गरजा अचानक बदलल्यामुळे मैत्रीच्या एका छान नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. मैत्री आणि प्रेम यांच्यात सुरु असलेल्या भावनिक युद्धामुळे भांडणं वाढू शकतात, गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि अशा स्थितीत एक नवीन नातं बनवताना हातात असलेलं मैत्रीचं नातं कायमचं विस्कटू शकतं.
ती व्यक्ती समोर आल्यावर मनात प्रेमभावना उफाळून येणे हे साहजिक असते. अशा परिस्थितीत स्वतः सावरा. ३-४ वेळा दीर्घ श्वास घ्या आणि लगेचच तुम्ही आता काय ऐकताय? तुम्हाला काय दिसतंय? यावर लक्ष केंद्रित केल्याने शरीराला शांत व्हायला मदत मिळेल."
वैदेही नाईक (मानसशास्त्रज्ञ,गोवा )
स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद: कोणत्याही नात्याचा पाया संवादावर अवलंबुन असतो. मुलाने आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या पाहिजेत आणि मुलीने देखील तिला प्रेमाचं नातं का नकोय हे स्पष्ट शब्दांत मुलासमोर मांडलं पाहिजे. "बघू, थोडा वेळ घेऊ. वेळेनुसार ठरवू" अशी खोटी आश्वासनं देऊ नये.
मताचा आदर करणं: जर मुलीने स्पष्टपणे सांगितले की तिला फक्त मैत्री हवी आहे, तर मुलाने तिच्या निर्णयाचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला तिच्या निर्णयावर दबाव आणण्याचा किंवा तिचं मत बदलण्याचा अधिकार नाही. दुसऱ्या बाजूने, मुलीने देखील तिच्या मतावर ठाम राहिलं पाहिजे, मिक्स सिग्नल्स न देणं हे कधीही उत्तम.
एकमेकांच्या अपेक्षा समजणं: नात्यात असलेल्या दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा तपासून पाहाव्यात. आपण रोमँटिक संबंध हवे आहेत का, किंवा एकमेकांसोबत मैत्रीचं नातं उत्तम ठरेल? याचा सखोल विचार झाला पाहिजे.
नकार आल्यानंतरच मनाला कसं सावरायचं हा महत्त्वाचा भाग असतो. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यात अधिकाधिक वेळ घालवा, स्वत: ला गुंतवून ठेवा आणि गरज पडल्यास तज्ज्ञांकडे मदत मागायला मागे-पुढे पाहू नका.स्वतःला वेळ द्या.
वैदेही नाईक (मानसशास्त्रज्ञ,गोवा )
नवीन मर्यादा निश्चित करा: जेव्हा तुम्हाला समजलंय की हे नातं एका बाजूने मैत्रीच्या पलीकडे गेलंय तेव्हा तुम्ही मैत्रीच्या नात्यात असल्यागत वागू शकत नाही. दोन्ही व्यक्तींनी नव्याने मर्यादा निश्चित कराव्यात. कधी कधी या शारीरिक अंतर ठेवणे किंवा विशिष्ट गोष्टींमध्ये मर्यादा पाळणं सुद्धा आवश्यक असतं.
जर कोणत्याही एका व्यक्तीला मैत्रीचं नातं जपणं अत्यंत कठीण वाटत असेल, तर काही वेळासाठी एकमेकांपासून अंतर ठेवणे योग्य ठरतं. कारण लक्षात घ्या इथे तुम्ही मैत्रीचं असलेलं नातं संपवत नाही आहात तर स्वतःला आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी देत असता.
लेखाच्या सुरुवातीला जो प्रसंग आपण वाचला त्यावर उत्तर देताना गोव्यातील उदयोन्मुख मानसशास्त्रज्ञ वैदेही नाईक म्हणाल्या की अशावेळी संवाद हा फार महत्वाचा आहे, आणि हा संवाद वेळीच झाला पाहिजे. आपल्याला जेव्हा जाणीव होते की समोरचा माणूस आपल्यासाठी केवळ मित्र किंवा मैत्रिण राहिलेला नाही तेव्हाच अगदी स्पष्टपणे त्या व्यक्तीजवळ जाऊन हे बोलून टाकावं. भावनिक गुंतागुंत ही पहिल्या टप्प्यात जास्ती नसते आणि म्हणून आलेला नकार सुद्धा पचवणं फार कठीण जात नाही. जास्त वेळ घेत विचार करत बसल्याने किंवा समोरच्याला गृहीत धरत पुढे जात राहिल्याने नातं खराब होऊ शकतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.