आय लव्ह यू!! ऐकायला खूप छान वाटलं ना? नक्कीच, कोणाला नाही आवडत हे तीन शब्द. या तीन शब्दांना तर मॅजिकल वॉर्ड्स असं सुद्धा म्हटलंय. आपल्या आयुष्यात अशी एक खास व्यक्ती असते जिच्यावर आपण मनापासुन प्रेम करत असतो आणि तिच्या किंवा त्याच्यापर्यंत ती भावना पोहोचावी म्हणून आपण या तीन शब्दांचा अगदी होईल तेवढा जास्ती वापर करतो.
पण तुम्हाला हे माहिती आहे का, अनेकवेळा तीच तीच वाक्य सुद्धा कंटाळवाणी ठरू शकतात. हो!! त्या व्यक्तीला रोज आय लव्ह यू ऐकून कंटाळा येऊ शकतो. मग, अशावेळी काय करावं जेणेकरून तुमच्या भावना देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि ते कंटाळणार देखील नाही?
आज आम्ही तुम्हाला काही अशी वाक्य सुचवणार आहोत जी 'आय लव्ह यू' च्या एकदम तडीसतोड आहेत. एकदवेळेस तुम्ही आय लव्ह यू नाही जरी म्हणालात तरी समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना, तुमचा सच्चेपणा नक्कीच पोहोचेल. एक गोष्ट जाणून घ्या तुम्ही कितीवेळा आय लव्ह यू म्हणता यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रेमासाठी काय करू शकता हे महत्वाचं आहे, त्यामुळे तुमच्या पार्टनरशी अशा काही गोष्टी बोला ज्यामुळे त्यांना तुमच्यासोबत सुरक्षित वाटेल, तुम्ही त्यांचा आदर करताय, तुमच्यात छान मैत्रीचं नातं आहे याची खात्री पटेल.
"माझ्या आयुष्यात तुझं असणं खूप महत्त्वाचं आहे"
प्रेम व्यक्त करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा आपल्या पार्टनरच्या विचारांचा, कामाचा आदर करतो तेव्हा तो आदर शब्दांमधून व्यक्त करावा. "माझ्या आयुष्यात तुझं असणं खूप महत्त्वाचं आहे" हे शब्द आपल्या पार्टनरला त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे याची जाणीव करून देतात.
"तुझ्या स्वप्नांमध्ये मी तुझ्यासोबत आहे"
प्रेम ही एक अशी भावना आहे ज्यात आपल्या पार्टनरच्या गरजा आणि इच्छांची जाणीव असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. "तुझ्या स्वप्नांमध्ये मी तुझ्यासोबत आहे" हे शब्द आपल्या पार्टनरच्या स्वप्नांमध्ये, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये तुमचं समर्थन दाखवतात. त्यांची स्वप्न हि केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नाहीत तर तुम्ही देखील त्यात सहभागी आहात हि भावना त्यांना आत्मविश्वास देऊ शकते.
"माझा तुझ्यावर विश्वास आहे"
प्रेम म्हणजे आपल्या पार्टनरला मानसिकदृष्ट्या आधार देणं. त्यांच्यातील स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवणं, त्यांच्या कार्यशक्तीला समर्थन देणं. आपण जेव्हा ऐखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याच्या आनंदात सहभागी होतानाच कठीण काळात सहभागी होता आलं पाहिजे.
"माझा तुझ्यावर विश्वास आहे" हे शब्द त्यांना आत्मविश्वास देतात. हे शब्दच केवळ तुमच्या पार्टनरमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतात. त्यांना पुढे जाण्याचं बळ देऊ शकतात.
"तुझं हसणं मला खूप आवडतं"
लहान आणि साध्या गोष्टींमध्ये प्रेम व्यक्त करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. "तुझं हसणं मला खूप आवडतं." असं म्हणणं म्हणजे त्यांचं अस्तित्वाची कदर करणं. हे शब्द त्यांच्या भावनिक गरजांचा आदर करतात आणि आपण समोरच्या माणसासाठी महत्वाचे आहोत याची जाणीव करवून देतात.
"तू कशी\कसा आहेस?"
आपल्या पार्टनरची काळजी घेणं हे प्रेम व्यक्त करण्याचं साधं पण प्रभावी माध्यम आहे."तू कशी\कसा आहेस?" असा एक साधा आणि सोपा प्रश्न विचारल्याने समोरच्या माणसाला भावनिक आधार मिळतो आणि त्याला समजतं कि त्यांचा पार्टनर त्याच्याप्रती संवेदनशील आहे.
"मी तुला माफ केलंय"
प्रेम व्यक्त करताना आपल्या पार्टनरच्या चुकांना माफ करणं आणि त्यांना समजून घेणं याला खूप महत्त्व आहे."मी तुला माफ केलंय" हे शब्द त्यांच्या कमतरता स्वीकारत, त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि त्यांच्या चुका सुधारत तुम्ही त्यांच्या सोबत कायम असाल याची खात्री त्यांना करून देईल.
काही वेळा, "आय लव्ह यू" हे शब्द अपुरे पडू शकतात किंवा कंटाळवाणे ठरू शकतात. पण अशावेळी प्रेम व्यक्त करण्याचे अनेक छोटे-छोटे मार्ग नक्क्कीच आहेत.
तुमचा तुमच्या पार्टनरप्रति आदर, काळजी, समर्थन, आणि विश्वास दाखवणारे शब्द तुमच्या रिलेशनशिपला गोडवा देऊन जातात आणि तुमचं नातं आणखीन पक्कं करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.