In Goa, Jeevan Anand is doing great work for the homeless people
In Goa, Jeevan Anand is doing great work for the homeless people  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोव्यात 'जीवन आनंद' संस्थेचे अनमोल कार्य

दैनिक गोमन्तक

शहरात गर्दीच्या ठिकाणी निराधार व्यक्ती भीक मागताना दिसणे ही आपल्याला अगदी सामान्य गोष्ट वाटते. इतकी सामान्य की त्यात आपल्याला वावगे किंवा माणूसहीन असे काही वाटतच नाही. आपली नजर आणि मन मानवी दुर्दशेच्या बाबतीत इतके निर्ढावलेले असते. रस्त्यावर बेवारस पडून असलेली ही माणसे येतात कुठून व रस्त्यावर जगतात कशी हे प्रश्न मनातून हद्दपार करून आपण आपले मन सुरळीत ठेवतो.

पण साऱ्यांच्या बाबतीत ते तसे नसते. त्यांच्या मनात प्रश्न उठतात व आपल्या परीने ते या प्रश्नांची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते तोडगाही काढतात. त्यांच्या त्या विचाराने सुरू झालेल्या प्रवासात त्यांना इतरही समविचारी लोक येऊन मिळतात आणि एकत्रितपणे ते अशा निराधारांचे, वंचितांचे, कुपोषितांचे आयुष्य सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हापसा शहरात हल्लीच एक जनजागृती रॅली झाली. वंचितांसाठी कार्य करणाऱ्या ‘जीवन आनंद’ या संस्थेने ही रॅली रोटरॅक्ट क्लबच्या सहयोगाने आयोजित केली होती. रस्त्यावरच्या निराधारांबद्दल समाजात सकारात्मक जाणीव निर्माण करणे हे या रॅलीचे उद्दिष्ट होते.

‘जीवन आनंद’ ही संस्था महाराष्ट्रात गेली वीस वर्षे काम करते आहे. संदीप परब हे या संस्थेचे संस्थापक. रस्त्यावर जीवन कंठणाऱ्या निराधारांना, आजारी लोकांना ही संस्था तिथून उचलते. त्यांच्यावर उपचार करते. त्यांना बरे करते व त्यांचे पुनर्वसन करते. मुंबई शहरात त्यांच्या या कामाला प्रथम सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांनी सात आश्रम उभे केले. त्यापैकी एक आश्रम महाराष्ट्रातील, गोव्याला जवळच असणाऱ्या कुडाळ या शहरात आहे. गोव्यातल्या अनेक निराधार व्यक्ती आश्रयासाठी त्यांच्या या कुडाळच्या आश्रमात जायच्या. परंतु त्यांच्या बाबतीत काही कायदाविषयक समस्या तयार झाल्याने ‘जीवन आनंद’ या संस्थेला गोव्यातही आपले काम सुरू करणे आवश्यक वाटले.

गोव्यात (Goa) ओपा, खांडेपार येथे जून 2021 मध्ये ‘मां आसरोघर’ हा आश्रम ‘जीवन आनंद’ने कार्यान्वित केला. आता म्हापसा शहरातदेखील आश्रम सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. पण दरम्यान म्हापसा शहरातील निराधारांना मदत करणे चालूच असेल. तिथल्या पीडितांवर कदाचित ओपा इथल्या आश्रमातही उपचार होऊ शकतील. संस्थेचे संस्थापक सचिव संदीप परब यांचे त्यांच्या कार्याबद्दलचे विचार ठाम आहेत. ते म्हणतात, आज विविध कारणांनी रस्त्यावरचे जीवन जगत असलेल्या माणसांची संख्या सगळीकडे दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर वंचिततेचे जीवन जगावे लागत असलेली ही माणसे हाडामासाची माणसे आहेत. ही सर्व माणसे आपले बांधव आहेत. आपल्या या वंचित देशबांधवांना माणुसकीचे जीवन लाभावे यासाठी काही करणे ही शासनाची जबाबदारी असली तरी एक सजग नागरिक म्हणून इतरांनाही ही जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.

म्हापसा (Mapusa) शहरात दिसणाऱ्या अशा निराधार नागरिकांचे 10 फेब्रुवारीपर्यंत पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट ‘जीवन आनंद’ या संस्थेने ठेवले आहे. गोव्यातील (Goa) संवेदनशील नागरिकांच्या सहाय्याने त्यांनी रस्त्यावरच्या 78 पैकी 22 नागरिकांवर उपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केले आहे. इतर काहींचे पुनर्वसन आश्रमाच्या माध्यमातून झाले आहे. 1 जानेवारी रोजी म्हापसा शहरात झालेल्या ‘जीवन आनंद’च्या रॅलीत संदीप परब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहरातल्या सर्व वंचित निराधार बांधवांचे योग्य पुनर्वसन करून म्हापसा शहर, रस्त्यावर एकही निराधार, वंचित नागरिक नसलेले, देशातील एक आदर्श शहर बनवण्याचा त्यांचा नववर्ष संकल्प आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: पर्वरीत चारचाकीच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

Fighter Jet Attack Simulation: गोव्यात UFO? मध्‍यरात्री कानठळ्या, हृदयात धडकी भरवणाऱ्या आवाजचे रहस्य काय?

SSC Result 2024 : ‘हेडगेवार’ची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

Mopa Airport: खून प्रकरणानंतर मोपात सतर्कता; शेकडाे मजुरांची पडताळणी

Margao Accident : कणकवली येथे कार उलटून मडगावातील सात प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT