Are Red and Green Flags in Relationship Important?
पणजी : "त्याने आजही मला घरी आल्याआल्या फोन केलाच नाही, तो आजकाल कामात एवढा बिझी झालाय की माझ्याकडे लक्ष द्यायला मुळीच वेळ नसतो." तिने जवळच्या मैत्रिणीला रागारागात सांगितलं. "अगं!! हे जरा अतीच नाहीये का पण? मी सुद्धा रिलेशनशिपमध्ये आहे पण माझा बॉयफ्रेंड मला भरपूर वेळ देतो, आठवड्यातून किमान पाच दिवस आम्ही भेटतोच, त्याशिवाय नातं टिकत नाही अगं" "तुझ्यासोबत जे काही होतंय हे मला बरोबर वाटत नाहीये, तो रेड फ्लॅग आहे!"
वेळ न देणं, फोनवर तासंतास बोलत न बसणं, दुसऱ्या मुलाशी किंवा मुलीशी बोलणं हे नात्यातले रेड फ्लॅग म्हटले जातात,आणि मग He is not the one असं म्हणून एक सुंदर नातं कायमचं संपतं. सध्या सोशल मीडियावर #Couple Goals बऱ्यापैकी चर्चेत आहे. एखादं नातं दहा वर्ष किंवा बारा वर्ष सोडा साधं तीन ते चार वर्ष टिकलं तरीही त्याकडे बघून "काश ये मेरे साथ भी होता" असा विचार नक्कीच आपल्या मनात येतो.
दोन माणसांमधलं नातं ही खूप सुंदर संकल्पना आहे. आयुष्यात आपल्याला अनेक नात्यांचा भाग बनावं लागतं आणि प्रत्येक नात्याची जबाबदारी सुद्धा वेगळी असते. प्रेमाचं नातं हे काहीसं वेगळं असतं कारण इथे समोरचा माणूस फक्त आपल्या आयुष्याचा नाही तर पर्सनल स्पेसचा भाग बनणार असतो. पर्सनल स्पेस (Personal Space) हा शब्द ऐकायला किंवा वाचायला जेवढा सोपा वाटतो तो तेवढा सोपा नाही बरं का! ज्या नात्यात समजूतदारपणाची सगळ्यात अधिक गरज असते तिथेच जर का आपण रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅगची विभागणी करत बसलो तर कदाचित येणाऱ्या काही दिवसांत 'Mr. Perfect' किंवा 'Miss. Perfect' असं काही राहणारच नाही.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जगात कोणीही परफ़ेक्ट नाहीये, मात्र जो समोरच्याला समजून घेऊ शकतो त्यालाच परफेक्ट म्हणता येऊ शकतं. मग चांगल्या वाईट गोष्टींचा विचार न करताच भगवान भरोसे नात्याची सुरुवात करावी का? तर तसं सुद्धा नाही.
सुरूवातीला आपण ज्या मुलीचा अनुभव वाचला त्यातही 'रेड फ्लॅग' चा शिक्का मारण्याची घाई केल्याचे दिसते. एखादा व्यक्ती जर कॉल आणि मेसेज करू शकला नाही तो कदाचित कामात व्यग्र असू शकतो, त्याचा मोबाईल डिस्चार्ज झाला असेल किंवा घरी परतल्यावर त्याचा डोळा लागला असेल. लगेच तर्क लावण्याऐवजी थोडा वेळ घेऊन परिस्थिती काय होती हे बघणं गरजेचं आहे.
एखाद्या माणसाला किंवा कॅलिटीला रेड आणि ग्रीन फ्लॅग (Red Flag in Relationship) म्हणण्याआधी काही घटकांची शहानिशा करून घ्यावी. कदाचित तुमच्यासाठी रेड फ्लॅग असणारा कुणा दुसऱ्यासाठी ग्रीन फ्लॅग असू शकतो. आपलं आयुष्य अनेक रंगांनी भरलंय मग रेड आणि ग्रीनमध्ये का अडकावं?
एखादं नातं टिकणार असेल तर त्या नात्यामध्ये अडरस्टॅण्डिंग फार महत्वाचं असतं, त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीला किती समजू शकतो, त्याच्या किती सवयींसोबत आपण तग धरू शकतो हे जाणून घेण्यासाठी काही वेळ जाऊद्या. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला तात्कळत ठेवा असा मुळीच होत नाही, पण ज्याच्यासोबत आपण आयुष्याचा विचार करतोय तो आपल्या इनर सर्कलमध्ये नीट बसतोय का? तो किंवा ती आपल्या आयुष्यात येण्याने आपल्याला स्वतःमध्ये किती बदल करावे लागतील हे समजून घेण्यासाठी काही वेळ जाऊ देणं चांगलं असतं. घाईघाईत आणि विचार न करता घेतलेले निर्णय अनेकवेळा चुकतात मग पुढे जाऊन कोणालातरी रेड फ्लॅग म्हणत सोडून देण्यापेक्षा आधीच विचार करून निर्णय घेतलेलं काय वाईट आहे?
आजकाल आपण सोशल मीडियाच्या जगात वावरतो. काही इंफ्ल्युइन्सर्स चार मोलाच्या गोष्टी सांगतात आणि आपण पटकन विश्वास ठेवतो. चार लोकांच्या गोष्टी ऐकणं चुकीचं नाही, तर त्यावर स्वतः विचार न करता निर्णय घेणं हे चुकीचं आहे. प्रत्येक माणूस हा चांगल्या आणि वाईट गुणांनी, सवयीनीं बनलेला असतो. आपण कोणत्या सवयी सहन करू शकतो, किंवा कोणत्या गोष्टींसह ऍडजेस्ट होऊ शकतो हे जाणून घेणं महत्वचं.
आपण स्वतःला जेवढं जवळून आणि नीट ओळखतो तेवढं कदाचित इतर कोणीही ओळखू शकणार नाही, त्यामुळे समोरच्या माणसाला ग्रीन आणि रेड फ्लॅगच्या तागडीत तोलण्याआधी तुमच्यातले रेड आणि ग्रीन फ्लॅग (Green Flag in Relationship) शोधून काढा.
समजा, तुम्ही शुद्ध शाकाहारी आहात आणि समोरचा व्यक्ती मांसाहाराशिवाय जगूच शकत नसेल तर हा रेड फ्लॅग मुळीच नाही. ती समोरच्या माणसाची आवड आहे आणि ती तुम्हाला पटणारी नाही. अशावेळी माणूस रेड फ्लॅग ठरत नसतो तर ती सवय तुमच्यासाठी रेड फ्लॅग असते कारण तुम्ही त्या सवयींसोबत जगू शकणार नसता, म्हणूनच एखादं नातं सुरु करण्यापूर्वी काहीसा वेळ जाऊद्या, स्वतःला नीट ओळखून घ्या, कारण तुम्हाला जरी मांसाहारी माणूस रेड फ्लॅग वाटत असला तरीही त्याच्यासोबत जगणारा, समजून घेणारा किंवा ऍडजेस्ट करणार कोणीतरी ग्रीन फ्लॅग नक्कीच असू शकतो... हो ना?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.