Ganesh Festival 2021: गोव्यातील गौरी पूजनाचे वेगळेपण Dainik Gomantak
गोव्यामध्ये साधारण गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गौरी पूजन होत असते, हे गौरी पूजन सत्तरीतील मुख्य आकर्षण आहे.येथे गौरी पुजनाची परंपरा म्हणजे, घरातील सुहासिनी महिला पाचव्या दिवशी सकाळी तांब्याच्या कलशातून नदी-विहिरीवरील पाणी घरी घेऊन येते व त्याची गणपती समोर पूजा अर्चा केली जाते, त्यानंतर गौरीचे 'हवशे' होतात. मये मध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच घरा मध्ये गौरी पूजन करतात. या गौरी पुजनावेळी कलशातून पाणी आणणे आणि त्याचे विसर्जन करते वेळी सर्वजण एकत्रित जमतात तर दुपारच्या सत्रात महिला हवशे घेऊन घरोघरी जात असतात.गौरीचा कलश सजवण्यासाठी हळदी,अबोली,शेवंती,हरणे, अघाडा, पत्तीची कणस, विडयाची पाने, सात छोटे खडे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो, याव्यतिरिक्त या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो. हवशे हे हळदीच्या पानावर मुगाची डाळ व इतर फळांचे तुकडे घातलेला नैवेद्य असतो. तो देवीला अर्पण केल्यानंतर घरातील महिला गावात फिरून याचे वाटप करतात. नंतर संध्याकाळी त्यांची पुन्हा आणलेल्या ठिकाणी विसर्जन होते.