Goa: गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स तसेच रिसॉर्टमध्ये परदेशी (Goa's Hotels and Resorts) भाज्या म्हणजेच 'एक्झॉटिक व्हेजिटेबल्स' (Exotic Vegetables). या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. पण, या एक्झॉटिक भाज्या गोव्यात हव्या तश्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल्स आणि रिसॉर्ट इतर राज्यातून या भाज्यांची आयात करतात. एक्झॉटिक भाज्यांच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. गोव्यात या भाज्यांची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आमचे शेतकार’ (Amche Shetkaar) या गटाने देशी भाज्यांबरोबर परदेशी भाज्यांचीही लागवड करण्यासाठी गोमंतकीय शेतकरी तसेच महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सुमारे दिडशे शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात रस दाखवला आहे.
गोव्यातील हॉटेल्स तसेच रिसॉर्टमध्ये या एक्झॉटिक भाज्या महाराष्ट्र, कर्नाटकातून येतात. मागणी मोठी असते, पण गोव्यातील शेतकऱ्यांकडून अश्या भाज्यांची लागवड केलेली सहसा दिसत नाही. गोव्यातील शेतकऱ्यांनी या भाज्यांची लागवड केल्यास हॉटेल्स तसेच रिसोर्टना अन्य राज्यांवर अवलंबून राहाण्याची गरज पडणार नाही. शिवाय गोव्यातील शेतकऱ्यांना अश्या भाज्यांची लागवड खूप फायदेशीर ठरू शकते. 'आमचे शेतकार’चे नितेश बोरकर याबद्द्ल अधीक माहिती देताना म्हणाले, ‘यंदा टोमॅटो, मिरची, वांगी या देशी भाज्यांबरोबर लेटयूस, झुकीनी, ऍस्परागस व अन्य परदेशी भाज्यांच्या लागवडीवर प्रशिक्षण देण्यात येईल. गोव्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यावर स्वस्तात ही रोपटी पुरविण्यात येणार आहेत. पारंपरिक भाजीपाला पिकांच्या तुलनेत या भाजीपाल्यावर कीड व रोगांचा धोका कमी प्रमाणात असतो, त्यामुळे ही पीके फायदेशीर ठरतात’.
एक्झॉटिक भाज्यांचे उत्पादन थंड हवामानात चांगल्या प्रकारे घेता येते. काही एक्झॉटिक भाज्यांची लागवड वर्षभर करणे शक्य असते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात पॉलिहाऊसमध्ये उत्तम प्रकारे एक्झॉटिक भाज्यांची लागवड होऊ शकते. गोव्यातील शेतकरी वर्ग पारंपरिक भाज्यांच्या लागवडीसोबत, प्रायोगिक स्वरूपात, काही क्षेत्रात एक्झॉटिक भाज्यांची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात, असे नितेश बोरकर खात्रीपुर्वक म्हणाले. काही दिवसांत उत्तर गोव्यातील शेतकऱ्यांना या भाज्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून लगेच त्या मागोमाग दक्षिण गोव्यातील शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीसोबत जुन्या पिढीनेही या भाज्यांची लागवड करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यास नितेश बोरकर विसरत नाहीत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.