Shortness Of Breath: श्वास घेण्यास वारंवार अडचण होत असल्यास याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पायऱ्या चढताना किंवा वेगाने धावल्यानंतर तुम्हाला अनेकदा श्वास फुलतो, ही सामान्य बाब आहे. पण, श्वास घेण्याचा वारंवार त्रास होत असल्यास याकडे दुर्लेक्ष करून चालणार नाही. असे होत असल्यास तुम्ही तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
श्वास घेण्यास अडचण कशामुळे होते?
श्वास घेण्यास त्रास होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अॅलर्जीपासून ते हृदयरोग अशी कारणे यामागे असू शकतात. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दमा (Asthama)
दमा आजारामुळे श्वसनमार्ग सुजतात आणि अरुंद होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अस्थमावर कोणताही इलाज नाही, फक्त त्याची लक्षणे नियंत्रित करता येतात.
न्यूमोनिया (Pneumonia)
न्यूमोनिया हा एक संसर्ग आहे ज्यामुळे फुफ्फुसांच्या अल्व्होली याला जळजळ होते. यामुळे खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर कारणांमुळे न्यूमोनिया होऊ शकतो. निमोनियावर वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD)
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजमध्ये, फुफ्फुसांना सूज येते, आणि श्वास घ्यायला अडचण होते. यात श्वास घेण्यास त्रास होणे, घरघर येणे आणि खोकला यांचा समावेश असू शकतो. जे लोक धूम्रपान करतात त्यांना सीओपीडीचा धोका अधिक असतो.
लठ्ठपणा (Obesity)
लठ्ठपणात शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. लठ्ठपणा हे देखील श्वासच्या अडचणीचे कारण असू शकते. म्हणूनच शरीरातील चरबी कमी करणे महत्त्वाचे आहे.
कोरोना (Corona Virus)
कोरोनाने जगात घातलेला धुमाकूळ पाहता जर श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, तात्काळ कोविड चाचणी करून घ्यावी. श्वास घेण्यास त्रास होणे हे कोविडचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्राणघातक ठरू शकते.
हृदयविकाराचा झटका (Heart Attack)
धाप लागणे हे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा रक्त प्रवाह कमी होतो. हृदयविकाराचा झटका सहसा धमन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे येतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.