पणजी: उत्तर व दक्षिणेला जोडणारा झुआरी नदीवरील बहुप्रतिक्षेत असलेला नव्या केबल स्टेड पुलाची बारकाईने पाहणी चीनच्या पथकाने केली होती. यात ओव्हीएम मशिनरी कंपनी लि.चे उपसरव्यवस्थापक वेई झेजून तसेच ली शाँगग्राँग या दोघांचा समावेश होता. त्यानंतर आज मंगळवारी येत्या नोव्हेंबरपर्यंत त्याचा एक मार्ग सुरू करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरकारने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
(Zuari bridge cable stayed work in final stage)
गेल्या दोन वर्षांपासून बांधकामाच्या स्थितीत असलेल्या झुआरी नदीवरील बहुचर्चित केबल स्टेड पुलाचे काम अंतिम टप्प्यावर आहे. पुलाचे अंतिम ‘सेगमेंट’मधील पहिला ब्लॉक येत्या २५ ऑगस्टपर्यंत तर दुसरा व शेवटचा ब्लॉक ३० ऑगस्टला घालण्यात येणार आहे. यासाठीच या चीनच्या सल्लागारांनी पुलाची सविस्तर पाहणी केली. हे ब्लॉक घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी पुलाचा एक मार्ग खुला करण्यासाठी अनुमती दिली आहे. त्यामुळे सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘तारीख पे तारीख’ला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
सध्याच्या झुआरी पुलावरील वाढती वाहनांची संख्या तसेच दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर सरकार तोडगा काढू शकलेला नाही. या नव्या झुआरी पुलाचा एक लेन सुरू करण्याचा प्रयत्न वारंवार करत असून मात्र त्यामध्ये सरकार यशस्वी ठरत नव्हते. या पुलाची एक लेन गेल्या १५ ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन सरकारने दिले होते.
अत्याधुनिक गॅलरी
आशिया खंडातील हा अनोखा पूल असून, या पुलाच्या अंतिम टोकावर हॉटेल आणि व्हिविंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. यासाठीही चीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या मनोऱ्याच्या गॅलरीत जाण्यासाठी पाण्यातून लिफ्टची सोय केली जाणार असून त्यासाठी बोटींची सोय केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यासाही हे नवे पर्यटन स्थळ बनण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे विलंब
दुलिप बिल्डकॉन कंपनीतर्फे बांधण्यात येत असलेल्या झुआरी पुलाचे मुख्य सल्लागार हे चीनचे अधिकारी आहेत. शिवाय या पुलासाठी लागणारे केबल स्डेट यासह इतर सामानही चीनच्या तंत्रज्ञानाचे आहे. २०१९ च्या शेवटी चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला त्यामुळे चिनी प्रवासी आणि नागरिकांवर विविध देशांनी प्रवासासाठी निर्बंध घातले होते त्यामध्ये भारताचाही समावेश होता. त्यामुळे हे अधिकारी भारतात येऊ शकले नव्हते. या कारणास्तव पुलाचे बांधकाम रेंगाळले होते.
पुलाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असून हवामानाची साथ मिळाल्यास या महिन्याअखेरपर्यंत पुलाच्या मुख्य जोडणीचे काम पूर्ण होईल आणि पुलाच्या फिनिशिंग कामाला सुरवात होईल. येत्या दोन महिन्यांत या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा आमचा उद्देश असून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
- देवगौंडा पाटील,
झुआरी प्रकल्प व्यवस्थापक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.