Yuri Alemao slams goa government
मुंबई आयआयटीच्या अहवालात युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेल्या तसेच पृथ्वी ग्रहावरील 35 जैव विविधता स्थळांपैकी एक असलेल्या 1600 किलोमीटर लांब पश्चिम घाटात मातीची धूप अती जलद गतीने होत असल्याचे नमूद केले आहे.
सदर अहवालात जवळपास 80 टक्के मातीची धूप झाली असल्याचे म्हटले आहे. विध्वंसक तीन रेखीय प्रकल्पांवर पुनर्विचार करण्यासाठी भाजप सरकारसाठी ही आणखी एक "धोक्याची घंटा" आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्या वतीने प्रा. पेन्नन चिन्नासामी आणि प्रा. वैष्णवी होनप यांनी तयार केलेल्या अभ्यास अहवालात पश्चिम घाटात झपाट्याने वाढणारी मातीची धूप व त्यापासूनचा धोका यावर प्रतिक्रीया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारने सदर अहवावातील माहिती अभ्यासणे आवश्यक असल्याचे सांगून, गोवा सरकारने सदर अहवालाचा युद्धपातळीवर अभ्यास करून सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विनंती आयआयटी-मुंबईच्या अभ्यासकांना सदर अहवालावर गोवा विधानसभेच्या सर्व सदस्यांना आणि गोव्याच्या पर्यावरण कार्यकर्त्यांना सादरीकरण देण्यासाठी आमंत्रित करावे.
आम्ही म्हादई गमावली आहे, जर आम्ही आता कृती करू शकलो नाही तर जैव-विविधतेने समृद्ध पश्चिम घाट गमावण्याची पाळी आपणांवर येणार असून,त्यानंतर गोव्याचे वाळवंटात रूपांतर होईल, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.
काही महिन्यांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने गोवा राज्यातील किनारपट्टीवरील धूप यावर अहवाल प्रकाशित केला होता. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांतील जमिनीची होणारी धूप यावरही असाच अहवाल इस्रोनेच प्रकाशित केला होता.
गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मी सरकारला या अहवालांची गांभीर्याने दखल घेऊन सुधारात्मक पावले उचलण्याची विनंती केली होती, अशी आठवण युरी आलेमाव यांनी करून दिली.
आयआयटीच्या अहवालात पश्चिम घाट प्रदेशातील अतिवृष्टी व पूरामूळे कृषी उत्पादकतेवर मोठा आघात झाल्याचे तसेच पाण्याची गुणवत्ता कमी झाली असल्याचे व शुद्ध पाण्याचे स्त्रोत प्रभावित केले असल्याचे म्हटले आहे.
सदर स्थितीमूळे पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक आव्हाने उभी राहिली असून पश्चिम घाटाच्या अद्वितीय जैव विविधतेवर परिणाम झाला असल्याचे ठळकपणे समोर आले आहे. या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींची गांभीर्याने दखल घेणे व कृती योजना आखणे आता भाजप सरकारचे काम आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
भाजप सरकारची धोरणे पर्यावरण विरोधी आणि भांडवलदारांच्या हिताची आहेत. गोव्यातील स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोव्याची ओळख सुरक्षित आहे. भाजप सरकारच्या विध्वंसक धोरणांपासून गोव्याला वाचवण्यासाठी केलेल्या परिश्रम आणि प्रयत्नांसाठी गोमंतकीय एनजीओ आणि कार्यकर्त्यांचे नेहमीच ऋणी राहतील, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.