कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव देश भर गाजू लागले आहेत. कसे ते सांगितल्यास सर्वजण आश्चर्यचकित नक्कीच होतील. सोनी टीव्हीवरील अमिताभ बच्चनच्या‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात सुपर संदूक प्रश्न मालेत खालील प्रश्न विचारला गेला ‘युरी आलेमाव, कुठल्या राज्यात विरोधी पक्षनेते आहेत?, उत्तरा मध्ये चार पर्याय दिलेले. त्यात गोवा हा एक पर्याय होता. स्पर्धकाने सुद्धा अचूक उत्तर दिले. त्यामुळे युरीबाब देशात किती लोकप्रिय आहेत, याची प्रचिती आली. ∙∙∙
रमेश तवडकर व गोविंद गावडे यांच्यात सध्या चालू झालेल्या वादात भाजपचे काही पदाधिकारी पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत असले तरी हा वाद अजूनही संपलेला नाही, असे गोविंद गावडे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले आहे. मी पुस्तक बंद करणाऱ्यांतला नाही, अशी प्रतिक्रिया गावडे यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक रमेश आणि गोविंद यांच्यात सुरुवातीपासून जो वाद आहे तो, एका पुस्तकावरूनच सुरू झालेला आहे. ‘उटा’चा इतिहास या पुस्तकात आपल्याला विनाकारण व्हिलन करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करीत तवडकर यांनी ‘उटा’शी फारकत घेतली होती. आता पुन्हा गोविंद पुस्तक बंद न करण्याची भाषा करतात, त्यामुळे हा वाद कितपत वाढेल हे आता पहावे लागेल. ∙∙∙
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरण, कोडारमधील प्रस्तावित आयआयटी आणि चिंबलमधील प्रशासन स्तंभ, युनिटी मॉलला वाढत असलेला स्थानिकांचा विरोध अशा काही विषयांवरून राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. जनतेला नको असलेले प्रकल्प सरकारने रोखायचे असतील, तर विरोधकांनी आक्रमक भूमिका घ्यावी लागते. पण, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनी मात्र या विषयांवर दुर्लक्ष करून आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तर गेल्या काही दिवसांपासून याबाबत बैठकाच घेण्यात व्यस्त आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पणजीत झालेल्या आंदोलनात झळकले. त्यानंतर मात्र ते कुठे आहेत, हेच इतर विरोधकांना माहीत नाहीत. काँग्रेसच्या इतर नेत्यांनी तर ‘ज्यात आपला फायदा’ त्यातच लक्ष घालायचे अशी भूमिका घेतली आहे. हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत असलेली जनता खरेच जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला साथ देईल? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे.∙∙∙
पत्रकार रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयितांना पोलिसांनी तातडीने पकडल्याचे जाहीर केले असले तरी, तपास ज्या संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे ''काहीतरी गडबड आहे'' अशी चर्चा गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाढू लागली आहे. हल्लेखोर लगेच सापडले, हे चांगलेच झाले. पण या हल्ल्यामागे नेमके कोण? हल्ल्याचे कारण काय? याची पाळेमुळे खोलवर आहेत, की वरवरची गोष्ट आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळायला इतका वेळ का लागतोय? ‘खऱ्या सूत्रधाराला’ वाचवण्यासाठी हा तपास जाणूनबुजून संथ ठेवला जात आहे का, अशी शंका लोकांना येऊ लागली आहे. पोलिस इतक्या महत्त्वाच्या प्रकरणात काम करत नसतील, तर नक्कीच वरिष्ठ स्तरावरून दबाव आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित मोठे मासे यात अडकले असावेत, ज्यामुळे पोलिस आता ''नावाला'' तपास करत आहेत. हल्लेखोरांना पकडण्याचे श्रेय घेतल्यानंतर, आता मूळ प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशीही चर्चा राज्यभरात सुरू आहे. ∙∙∙
शिरोडा मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मोठी गर्दी होणार हे निश्चित आहे. यावेळी भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’वाले सज्ज झाले आहेत. या दोन्ही पक्षांचे नेते गोवा फॉरवर्ड आणि आरजीवाल्यांकडून शिरोड्यातील बारीक सारिक समस्यांमध्ये लक्ष घालू लागले आहेत. सध्या कोडारमधील आयआयटी प्रकरण मोठे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आरजी आणि गोवा फॉरवर्डने विषय लावून धरला आहे. सत्ताधारी भाजप, पण कोडारमधील आयआयटी विषयावरून बॅकफूटवर गेला हे निश्चित. ∙∙∙
भाजपच्या कार्यक्रमावेळी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक एकत्र होते. ते कार्यक्रमाला पोचले तेव्हा शिक्षकांची भाषणे व्हायची आहेत असे सांगण्यात आले. शिक्षक हे ४५ मिनिटे बोलतील, असे गृहित धरून ही सूचना करण्यात आली होती. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, आम्हाला घरीही शिक्षिकांचे ऐकण्याची सवय आहे. दामू व आपली पत्नी शिक्षिका असल्याचा संदर्भ देत त्यांनी हे विधान केले, त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. ∙∙∙
कधी कधी पत्रकार सुद्धा असे प्रश्न विचारतात की, पुढची व्यक्ती अचंबित झाल्याशिवाय रहात नाही. भाजप महिला मोर्चाच्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, माजी अध्यक्ष कुंदा चोडणकर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिता थोरात उपस्थित होत्या. निवडणुकीच्या वेळी पक्षाने तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते, त्या संदर्भात प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाने भाजपच्या तीनही महिला एकमेकीच्या तोंडाकडे पाहण्याशिवाय काहीच करू शकल्या नाहीत. याचाच अर्थ त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. ही पत्रकार परिषद ‘वोकल फॉर लोकल’ संदर्भात होती व या प्रश्नाचे उत्तर योग्य वेळी दिले जाईल. मुख्यमंत्री डॉ. सावंत या बद्दल शहनिशा करतील, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, त्यांच्या झालेल्या अवस्थेने भाजप महिला मोर्चा व एकूण पक्ष व सरकार तोंडघशी पडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. ∙∙∙
माजोर्डा येथे सोमवारी धीरयोत एकाचा बळी गेला व पोलिसांची धांदल उडाली. रात्री उशिरा सहाजणांवर गुन्हा नोंद करून, तिघांना अटक केली. या धीरयोचे ‘कनेक्शन यूएस’पर्यंत आहे. सहापैकी दोन संशयित अमेरिकेत आहेत. तेथे बसून ते धीरयोचे नेटवर्क चालवित होते. गुन्हा नोंद केला असला तरी त्यांना पकडणार कसे, असा नवीन पेच पोलिसांसमोर आ वासून उभा राहिला आहे. भारतात आणून त्यांना अटक करण्यासाठी ‘रेडकॉर्नर नोटीस’ बजावावी लागणार. ही प्रक्रिया बरीच कठीण असते. कोलवा पोलिसांची गत या धीरयो बाबतीत ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशी झाली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.