Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यात निवडणुकीचीच चोरी

Khari Kujbuj Political Satire: सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या मंत्रिपदाचा ताबा घेतल्‍यानंतर दिगंबर कामत यांनी पहिला विषय हाती घेतला तो खराब रस्‍त्‍यांचा.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

रस्‍त्‍यांची ‘फोडाफोडी’ म्‍हणे कामतांना आवडेना!

सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या मंत्रिपदाचा ताबा घेतल्‍यानंतर दिगंबर कामत यांनी पहिला विषय हाती घेतला तो खराब रस्‍त्‍यांचा. पहिल्‍याच दिवशी त्‍यांनी खात्‍याच्‍या अभियंत्‍यांची बैठक घेत खड्डे पडलेल्‍या आणि पूर्णपणेच खराब झालेल्‍या रस्‍त्‍यांच्‍या आढावा घेतला, रस्‍त्‍यांची कामे तत्‍काळ सुरू करण्‍याचेही निर्देश दिले. त्‍यानंतर आता त्‍यांनी खात्‍याच्‍या प्रधान मुख्‍य अभियंत्‍यांच्‍या परवानगीशिवाय इतर खात्‍यांना रस्‍ते फोडता येणार नाहीत, असे निर्देश जारी केले आहेत. खुद्द मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही काही महिन्‍यांपूर्वी असेच आदेश दिले होते. तरीही त्‍यांच्‍या आदेशांना अंतर्गत वाहिन्‍यांची कामे करणारी अनेक खाती आणि एजन्‍सींनी जुमानले नव्‍हते. ते आता दिगंबर यांचे निर्देश पाळणार की त्‍यांनाही ‘वाटाण्‍याच्‍या अक्षता’ दाखवणार, हे लवकरच समजेल. ∙∙∙

गोव्यात निवडणुकीचीच चोरी ?

‘पुन्हा पुन्हा खोटे बोललेले नंतर खरे वाटू लागते’ असे म्‍हटले जाते. सध्‍या आपल्या देशात ‘मतचोरी’वरून काँग्रेस व विरोधी पक्षांनी आंदोलन छेडले आहे. काँग्रेस ज्यास हायड्रोजन बॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्बची उपमा देत आहे, ती मतचोरी खरोखरच होते की नाही, याचा फैसला जनता व न्यायालय करेल. मात्र गोव्यात सरकारच्या आशीर्वादाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीची चोरी करण्याची तयारी केल्याचा आरोप एल्विस गोम्स यांनी केला आहे. ते म्हणतात, निवडणूक आयोगाने कोणालाही न कळवता गुपचूप जिल्हा पंचायत मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा घाट घातला आहे. एवढेच नव्हे सरकार पक्षाला फायदा करून देण्यासाठी आयोग मतदारसंघ राखीवता व पुनर्रचना करणार का? आता पाहुया गोव्यातही ‘व्होट चोरी’ आंदोलन छेडले जाते की नाही ते! ∙∙∙

‘देवचार’ उवाच

माजी मंत्री गोविंद गावडे यांची संभावना कला व संस्‍कृतीमंत्री रमेश तवडकर यांनी ‘देवचार’ अशी केल्‍यानंतर त्‍यावर बरीच चर्चा होऊन गेली. स्‍वत: गोविंद गावडे यांनीही त्‍याच भाषेत उत्तर दिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत बोलताना गोविंद गावडे यांनी देवचाराविषयी अधिक माहिती देताना, ‘‘मी लहानपणापासून देवचाराच्‍याच सान्निध्‍यात वाढलो आहे. देवचार हे लोकांना वाट दाखवितात तसेच ते लपवूनही ठेवतात’’ असे त्‍यांनी म्‍हटले. आता लपवून ठेवतात असे म्‍हणण्‍यामागे गोविंद गावडे यांचा नेमका अर्थ काय, हे मात्र कळू शकले नाही. ∙∙∙

लोबोंच्‍या मनाचा लागेना थांगपत्ता

कळंगुटचे आमदार मायकल लोबो कधी काय बोलायचे ते ठरवून बोलतात. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन परतल्यानंतर त्या भेटीची माहिती देताना लोबो शब्द शोधत होते. यावरून ते बोलण्याविषयी किती सजग असतात हे लक्षात येते. असे हे लोबो ‘आता निवडणुकीला एक वर्ष तीन महिने राहिले आहे, पाहू पुढे काय होते ते’ असे उद्‌गार काढू लागले आहेत. यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. मध्यंतरी मंत्रिमंडळ फेररचनेविषयी लोबो यांना नाही तर त्यांची पत्नी दिलायला यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे बोलले जात होते. मात्र लोबो सत्तेपासून दूरच राहिले. त्यामुळे ‘पाहू पुढे काय होते ते’ या लोबो यांच्या विधानात बरेच काही दडले असल्‍याचा अर्थ काढला जात आहे. ∙∙∙

‘व्‍हीआयपी’ गुंड!

रामा काणकोणकर यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी पोलिसांनी सूत्रधार म्हणून कुख्यात गुंड जेनिटो कार्दोज याला अटक केली. विरोधी पक्षांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे संशयितांना पकडले, त्याबद्दल आता त्‍याच विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त होऊ लागला आहे. विशेष बाब म्हणजे या हल्ल्यातील मुख्य संशयित जेनिटोला पकडल्यानंतर ज्या पद्धतीने त्‍याला पोलिस ठाण्यात आणण्‍यात आले, त्यावरून तो कोणी प्रसिद्ध अभिनेता आहे का, असे वाटायला लागले. तोंडावर मुखवटा घातला तरी हाताला बेड्या घातल्‍या नव्‍हत्‍या किंवा दोरी बांधली नव्‍हती. यावरूनच आता विरोधकांनी संशय व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. यावरून जनतेने काय बोध घ्‍यावा? ∙∙∙

तो मंत्री कोण?

समाजकार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर राज्‍यात पडसाद उमटले आहेत. या प्राणघातक हल्ल्यामागील खरा मास्टरमाईंड कोण, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. गोवा पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली असली तरी विरोधक आणि लोकांच्‍या मते खरा सूत्रधार एक मंत्री आहे. काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी तर तसे ठासून सांगितले आहे. मात्र कोणीही अजूनपर्यंत त्‍या मंत्र्याचे नाव घेतलेले नाही. वास्‍तविक सर्वांना नाव माहीत आहे, पण उघड कोण करणार? तशी हिंमत पाहिजे ना? कार्लुसबाब यांनी टाकलेल्‍या बॉम्‍बमुळे उत्‍सुकता आणखी वाढली आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: भाजपा आपामंदी पेटलें..

‘धीरयो’ने केली बदली

गोव्‍यात होणाऱ्या धीरयोंमुळे लोकांच्‍या जीवाला कसा धोका निर्माण झाला आहे याचा प्रत्‍यय दोन दिवसांपूर्वी माजोर्डा येथे झालेल्‍या एकाच्‍या मृत्‍यू प्रकरणातून दिसून आला. वास्‍तविक ज्‍या कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत ही दुर्घटना घडली, त्‍या पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत दोन दिवसांपूर्वीच अशाच धीरयोचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍याचे फोटोही व्‍हायरल झाले होते. तरीसुद्धा पोलिसांनी योग्‍य खबरदारी न घेतल्‍यामुळे माजोर्डा येथील दुर्दैवी प्रकार घडला. यापूर्वी कोलवा पोलिस स्‍थानकात फिलोमेन कॉस्‍ता हे निरीक्षक असताना त्‍यांनी आपल्‍या पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत चालणाऱ्या धीरयोंवर बऱ्यापैकी नियंत्रण आणले होते. मात्र त्‍यांची ही कृती स्‍थानिक आमदारांसह इतर काही आमदारांना न आवडल्‍याने असो किंवा आमदाराच्‍या हस्‍तकांना नुकसान होत असल्‍यामुळे असो, ‘फिलू’ सायबाची कोलव्‍याहून लगेच बदली करण्‍यात आली. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर अशी कारवाई होत असेल तर कोणता पोलिस अधिकारी आपले काम निष्‍ठेने करणार? ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; दोतोर, भांगर सवाय कर

त्यांच्या सावलीतही उभे राहायला आवडत नाही!

आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी गोविंद गावडे यांच्यासोबतच्या वादावर पुढे काही बोलण्यास नकार दिला असला तरी मंगळवारी त्‍यांनी ‘‘ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्या सावलीतही उभे राहण्यास आवडत नाही’’ हे वाक्य पुन्हा एकदा ऐकवलेच. त्यांनी याआधी पत्रकार परिषद घेत गावडे यांना ‘काजवा’, ‘देवचार’ अशी बिरुदे चिकटवली होती. या पत्रकार परिषदेनंतर हितचिंतकांनी नाराजी व्यक्त केल्याचे तवडकर यांचे म्हणणे आहे. आपण शनिवारी व रविवारीही सुट्टी न घेता काम करतो असे सांगून तवडकर यांनी आता कामांना प्राधान्य देणार असे सुचवले आहे. त्यामुळे गावडे यांनी शाब्दिक वार सुरूच ठेवल्यास त्याकडे दुर्लक्ष करत तवडकर पुढे जाणार असे मानता येईल. मात्र खोचक बोलण्यात पटाईत असलेले तवडकर खरेच असे करतील का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com