पर्ये: महाराष्ट्राच्या दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी दाणीखोल येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगात सुरू केलेल्या धरणाच्या कामाला गोवा सरकारने विरोध दर्शविलेला असला, तरी महाराष्ट्र सरकारतर्फे या धरणाचे कामकाज जोरदाररित्या सुरूच ठेवल्याने गोव्याची चिंता वाढली आहे.
पेडण्यातील चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या कामाला गोवा सरकार गती देत असून या प्रकल्पाची पाण्याची क्षमता 30 एमएलडी केली जाणार आहे, पण त्याचबरोबर या कळणे नदीच्या वरच्या पात्रातील उपनदीवर हे फुकेरी धरण उभारत असल्याने त्याचा परिणाम बारमाही वाहणाऱ्या कळणे नदीवर होणार असून त्याचा परिणाम या प्रकल्पावर होणार आहे. त्यामुळे पूर्वीच पाण्याच्या टंचाईमुळे चांदेलवासीय धडपडत असताना हा प्रकल्प आल्यास त्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.
88 कोटींचा धरण प्रकल्प
सह्याद्री घाट माथ्यावरील हनुमंत गडच्या परिसरातून बारमाही वाहणाऱ्या एका ओहोळावर हे मातीचे धरण उभारले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कामकाज सुरू आहे.
44.11 मीटर धरणाच्या बंधाऱ्याची उंची
345 मीटर लांबी
2.12 चौ. कि. मी. धरणाचे पाणलोट क्षेत्र
5.30 दशलक्ष चौ. घनफुट मीटर धरणात पाण्याचा जलसंचय.
88 कोटी रुपये खर्च लागणार
248 हेक्टर जमीन जाणार पाण्याखाली!
या धरणामुळे सुमारे 248 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. धरणाचे पाणी ९०० मि. मी. व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकून दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, तळकट, शिरवल तर सावंतवाडी तालुक्यातील असनिये, तांबोळी आदी भागात पुरवठा केला जाणार आहे.
केंद्राला पाठवणार पत्र : मुख्यमंत्री सावंत
गोवा सरकारने या धरण प्रकल्पाला विरोध करणारे पत्र महाराष्ट्र सरकारला केले होते, पण महाराष्ट्राने त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. दरम्यान, महाराष्ट्राच्या या भूमिकेमुळे गोवा सरकार केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाला पत्र लिहिणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासाठीचे आदेश त्यांनी जलसंधारण खात्याला दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा हा प्रकल्प एक मृगजळ ठरणार आहे. जंगल तोडीमुळे पाण्याऐवजी गाळ साठून हा जलाशय अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करणार नसल्याने हा प्रकल्प एक मृगजळ ठरणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे गोव्यातील चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याची टंचाई भासणार आहे. - राजेंद्र केरकर, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.