कुडचडे: दुधाळ - काले येथे खनिजवाहू ट्रक व दुचाकी यांच्यात काल भीषण अपघात (Accident case) होऊन विद्या वरक या निरागस युवतीचा हकनाक बळी गेल्याने गावात हळहळ आणि खनिज वाहतुकीवरून संतापाचा उद्रेक झाला आहे.
खनिज वाहतूक कंत्राटदाराने आपल्या फायद्यासाठी सोयीस्कर आणि सोप्या मार्गाचा अवलंब करून खनिज वाहतूक आता कुठे सुरू होत असताना पहिला बळी घेतला. चुकीच्या मार्गाने खनिज वाहतूक (Mineral Transport) केल्यामुळेच विद्या वरक हिचा बळी गेल्याचा गावातील तरुणांनी ठपका ठेवून खनिज वाहतूक कंत्राटदार आल्याशिवाय मृतदेह हलविणार नसल्याचा हेका धरून ग्रामस्थ काल रात्री उशिरापर्यंत भर रस्त्यावर अडून बसले होते. अनेकांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून पाहिले, पण दुःख आणि क्रोध एकत्र झाल्याने संताप अनावर होणे साहजिकच होते. (Woman dies in horrific accident in goa)
मुळात हसऱ्या स्वभावाची आणि घरात कामविणारी असल्यामुळे घराचा आधार बनलेली विद्या अचानक गेल्याचा धक्का सर्वांनाच लागून राहिला आहे. कारेमळ गावात आलेल्या संकटामुळे प्रत्येक नागरिक संताप व्यक्त करीत होते. अपघात (Goa Accident) होताच खनिज वाहतूक करणारा ट्रकचालक ट्रक सोडून पळत कुडचडे पोलिस स्थानकात शरण आला. कुडचडे पोलिसांनी (Goa Police) त्याला वाहतूक कायद्या अंतर्गत विविध कलमाखाली अटकही केली, पण चालकाला अटक करून प्रश्न सुटणार नाही आणि बळी गेलेली विद्या परत येणार नसले, तरी भविष्यात अशाप्रकारच्या सोयीस्कर मार्गाचा अवलंब करून खनिज वाहतूक होत असेल, तर विद्या वरक नंतर अजून कोणाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संताप्त ग्रामस्थ खनिज वाहतुकीचा मार्ग बदलण्याची मागणी करीत आहेत.
वास्तविक खनिज वाहतुकीसाठी ठरवून दिलेला मार्ग हा तळे खाण, काले रेल्वे पुलाखालून वळडव, पेरीउदक मार्गे श्रद्धाइस्पात असा मार्ग ठरलेला असताना खनिज वाहतूक तळे, कष्टी, मार्गे श्रद्धाइस्पातला खनिज वाहतूक करण्यात येत होती. खनिज वाहतूक केली जात असल्याचा कोणालाही सुगावा नसल्याचा बहाणा लोकप्रतिनिधी करीत होते. स्थानिक मंत्री आपल्याला काहीच माहिती नसल्याचे घटनास्थळी संतप्त लोकांना सांगून आपली बाजू झटकण्याचा प्रयत्न केला. गावातील सरपंच, पंचही आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत होते.
मग कोणाच्या भरवशावर कंत्राटदार खनिज वाहतूक करीत होता याचे उत्तर स्थानिक नागरिक मागत असताना कोणीही जबाबदारी न घेता पळपुटेपणाची भूमिका घेतल्याने ग्रामस्थ अधिक संतापले होते. कोणीतरी लोणी खाऊनच खनिज वाहतुकीला परवानगी दिल्याशिवाय खनिज वाहतूक केली जाणार नाही आणि नसल्यास लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांची भूमिका कोणती? सर्व काही डोळे बंद करून होते काय की प्रकरण अंगावर येताच मी त्यातला नाही अशी तात्पुरती भूमिका घेऊन पळवाट काढणे सोपे, पण चुकीचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना पाठीशी घालून विद्या वरक या निरागस युवतीचा हकनाक बळी गेला तो केवळ चुकीच्या खनिज वाहतूक मार्गामुळेच.
वरक कुटुंबावर शोककळा
विद्या वरक ही आता कुठे परिचारिका म्हणून शिक्षण पूर्ण करून खासगी आस्थापनात रुजू झाली होती. घरात कमविणारे एकमेव वडील, आई घरकाम, मोठा भाऊ शिकून बेरोजगार, धाकटी बहीण अजून शिकत आहे. असा एकूण कुटुंबाचा ढाचा असून विद्या आता शिकून मोठी झाल्याचा आनंद कुटुंबाला होता. आपल्या मैत्रिणीला आणण्यासाठी सोबत आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन घरी परतत असताना अचानक काळाने घाला घातल्यामुळे विद्या जागीच गतप्राण झाली, तर धाकटी बहीण सिया आणि मैत्रीण रिया या अपघातात जखमी झाल्या. सध्या जखमींवर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. कमवित्या मुलीच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे विद्याच्या कुटुंबावर शोकककळा पसरली आहे. आई, वडील, भाऊ धायमोखलून रडत आहेत, तर एक बहीण अपघातात जखमी झाल्याने इस्पितळात उपचार घेत आहे.
खनिज वाहतूक होऊ न देण्याचा निर्धार
नागरिकांच्या म्हणण्यानुसार जिथे अपघात झाला ते ठिकाणी खनिज वाहतुकीसाठी मुळीच नसून केवळ आपल्या फायद्यासाठी चुकीच्या मार्गाचा स्वीकार करून खनिज वाहतूक करीत होते. त्यातून विद्या वरकचा हकनाक बळी गेला. जर त्या मार्गाने खनिज वाहतूक केलीच नसती, तर ही दुर्घटना घडलीच नसती अशी ठाम धारणा ग्रामस्थांची बनली असल्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत या भागातून खनिज वाहतूक होऊ देणार नसल्याचा निर्धार गावातील तरुणांनी केला. पोलिस आपल्या परीने संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते, पण संतापाला लगेच आवर घालणे शक्य नसल्याने रात्री उशिरापर्यंत जमाव रस्त्यावर ठाण मांडून होता. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे तेथील काही लोकांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.