राज्याच्या किनारपट्ठी भागात प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकाळण्याबाबतचे वादळ तात्पुरते शमले असले तरी धूर अजूनही येत आहे. हे प्रकरण पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. व्हायरल झालेल्या पत्राची प्राथमिक चौकशी करून ते बोगस असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
त्या पत्राचा स्रोत शोधण्याचे काम सायबर क्राईम पोलिसांकडून केले जात आहे. खंडणीराज हे कित्येक वर्षांपासून चालत आहे. सरकारने हे प्रकरण बोगस असल्याचे सांगितले असले तरी जनतेचा त्यावर विश्वास नाही. त्यामुळे खरोखरच या प्रकरणाचे सत्य बाहेर येणार का, अशी चर्चा राज्यभर सुरू आहे.
‘त्यांना’ हात लावण्याचीही हिंमत नाही!
‘सरकारी यंत्रणा मॅनेज करण्यासाठी वावरणाऱ्यांनी किनारी भाग वाटून घेतला आहे. पोलिसांचाही यात वापर होत असल्याचे लपून राहिलेले नाही. कारण ‘प्रोटेक्शन मनी‘ मागणारी जी आडनावे पणजीतील विवांता हॉटेलमधून बाहेर आली, त्या पाडलोस्कर आणि तेंडुलकर यांना कोणी हातही लावणार नाहीत, असे एका सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्याने सांगितले.
कथित खंडणी प्रकरणाला वाचा फोडणारे आमदार मायकल लोबो यांनी काल रविवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिल्याने हा विषय संपला असल्याचे सांगितले आहे. परंतु किनारी भागातील हॉटेल व्यावसायिक आणि जनता यावर कितपत विश्वास ठेवेल, हा मूळ प्रश्न आहे.
कारण पेडणे ते काणकोण किनाऱ्यापर्यंत अनेकांची हप्तेखोरी सुरू आहे, हे हॉटेल व्यावसायिकांना पूर्ण माहीत आहे. आतापर्यंत स्थानिक पातळीवर यंत्रणा ‘मॅनेज'' करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडे थेट मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून ‘प्रोटेक्शन मनी‘ गोळा करणारी यंत्रणा निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान, आपली बदनामी करण्यासाठी हा प्रकार होत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे या प्रकरणातील गंभीरतेला तिलांजली देण्यासारखे आहे. या एकंदरीत प्रकारावरून या कथित खंडणी प्रकरणातील सत्य काही समोर येणार नाही. कारण हे प्रकरणही जमीन बळकावल्याच्या तपासासाठी नेमलेले विशेष तपास पथक जसे गुंडाळले, त्याच मार्गाने जाण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.