Goa Crime
Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Gomantak Exclusive: गोवा राज्यावरील अंमली पदार्थांचा विळखा सुटेल का?

दैनिक गोमन्तक

Gomantak Exclusive: भाजप नेत्या तथा प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणामुळे गोव्यातील अमली पदार्थांच्या सुळसुळाटावरचे सरकारी आवरण पुन्हा एकदा उचलले गेले. लागोपाठ तेलंगणा पोलिसांनी आरंभलेल्या छापासत्रामुळे गोव्यातील पोलिसांची भूमिका प्रकाशझोतात आली. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून ड्रग्स व्यवसायाला मरणांतिक टोला बसतो की, तूर्तास शांत राहून पर्यटन हंगामासोबत व्यवहार पूर्ववत उचल खाणार, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून गोव्यात येऊन ड्रग्स माफियांना गजाआड केल्याने गोवा पोलिसांची पुरती नाचक्की झाली आहे. किनारपट्टी भागातील पोलिस स्थानकांबरोबरच गोवा पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही सुस्त बनल्याने त्यांच्यावर आता टीकेची झोड उठत आहे.

गोवा ड्रग्समुक्त राज्य करू, अशा घोषणा होत राहिल्या; पण माफियांना हात लावण्याचे धाडस गोवा पोलिसांना झाले नाही, ते हैदराबाद पोलिसांनी करून दाखवले. हैदराबाद पोलिसांनी ड्रग्स तस्करीची पाळेमुळे खणून काढत कुणालाही थांगपत्ता लागू न लागता कारवाईस सुरुवात केल्याने गोवा पोलिसांचे खच्चीकरण झाले आहे. मात्र, खडबडून जागे झालेल्या गोवा पोलिसांनीही ड्रग्सविरोधातील लढा तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

गोवा राज्य हे पर्यटन केंद्र म्हणून जगप्रसिद्ध असले, तरी गेल्या काही वर्षांत ड्रग्सचे विक्री केंद्र तसेच तस्करीसाठी सोयीचे ठिकाण म्हणून समोर आले आहे. ड्रग्स माफियांचे जाळे दिवसेंदिवस वाढल्याने पर्यटन हंगामात ड्रग्सची कोट्यवधींची उलाढाल होते. राजकीय नेते आणि पोलिसांच्या आशीर्वादामुळे या माफियांना गेली अनेक वर्षे अभय मिळत गेले. हैदराबाद पोलिसांनी गोव्यात येऊन ड्रग्स माफियांचे अटकसत्र सुरू आहे.

...म्हणूनच गोवा पोलिस अंधारात

हैदराबाद पोलिसांनी नोंद केलेल्या ड्रग्स प्रकरणांमध्ये काही गोमंतकीयांची नावे समोर आली आहेत. ती त्यांनी गोवा पोलिसांना दिलेली नाहीत. ही नावे ड्रग्स माफियांपर्यंत पोहचल्यास काहीजण भूमिगत होण्याचा संशय हैदराबाद पोलिसांना असल्यानेच हणजूण येथून प्रीतेश बोरकर याला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पोलिसांना याची अजिबात कल्पना न देता अंधारात ठेवले होते.

हल्लीच किनारपट्टीवरील राज्यांची ड्रग्स तस्करीसंदर्भात बैठक झाली. यात अट्टल गुन्हेगारांचा शोध तसे त्यांच्या साथीदारांनी गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता यांची चौकशी करून ड्रग्सची कीड ठेचून काढण्याचा निर्धार करण्यात आला. पण गोव्यात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले.

तेलंगणा पोलिसांचा हैदराबाद अमली पदार्थविरोधी विभाग आणि उस्मानिया विद्यापीठ पोलिस स्थानक गेल्या दोन महिन्यांपासून उस्मानिया विद्यापीठात ड्रग्स कसे पोचले, याचा तपास करत आहे. या तपासात मिळालेल्या धागेदोऱ्यांनुसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गोव्यातून ड्रग्स मिळत होते, असे स्पष्ट झाले आहे.

पकडलेल्या संशयित विद्यार्थ्यांकडून गोव्यातील काही ड्रग्स पेडलर आणि डिलरची नावे उघड झाली आहेत. त्यामुळे हे पोलिस गोव्यात पोहोचले असून त्यांनी गोव्यातून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ड्रग्स माफियांनी या तस्करीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे.

'त्या' अहवालाला केराची टोपली

दशकापूर्वी राज्यातील ड्रग्स माफिया-राजकारणी-पोलिस लागेबांधेसंदर्भात मोठे वादळ उठले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सभागृह समिती नियुक्ती केली होती. या समितीने दिलेला अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला. त्यामध्ये अनेकांची नावे समोर आली होती. मात्र, या अहवालाला त्यावेळी समितीच्या काही सदस्यांनी मान्यता न दिल्याने तो कचरापेटीत गेला. त्यावेळीच सरकारने गंभीर दखल घेत धडक कारवाई केली असती तर आज गोवा हे ड्रग्स तस्करीचे केंद्र म्हणून उदयास आले नसते.

राज्याच्या किनारपट्टी भागात रात्रीच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची उलाढाल होते. मात्र, पोलिसांनी या पार्ट्यांवर कधी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. कोट्यवधींच्या या ड्रग्स व्यवहारात ‘सेटिंग’ होत असल्याने रात्रीच्यावेळी बिनबोभाटपणे हा व्यवसाय सुरू असतो.

स्टीव्हला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-

हैदराबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी वागातोर येथील हिल टॉप रेस्टॉरंटचा मालक जॉन स्टीफन डिसोझा उर्फ स्टीव्ह याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे. डिसोझा याला गुरुवारी वागातोर येथून हैदराबाद पोलिसांनी अमली पदार्थप्रकरणी अटक केली होती.

विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड-

ड्रग्सविरोधात जी मोहीम उघडली आहे, ती दिशाभूल करणारी आहे. ड्रग्स व्यवसायात भाजपचेही काहीजण सहभागी आहेत. त्यामुळेच सरकारकडून ढिलाई होत आहे. तेलंगणा पोलिस गोव्यात येऊन ड्रग्स माफियांवर कारवाई करतात आणि गुन्हेगारांना अटक करून घेऊन जातात, हे सरकारचे अपयश आहे.

एडविनही हैदराबाद पोलिसांच्या रडारवर: हैदराबाद पोलिसांनी कर्लिस क्लबचा चालक एडविन नुनीस याचीही चौकशी सुरू केली आहे. हे पोलिस जर कर्लिस आणि हिलटॉप क्लबच्या मालकांवर ड्रग्सप्रकरणी कारवाई करत असतील, तर मग गोवा पोलिसांना ते इतकी वर्षे का जमले नाही? याची सरकारने चौकशी करायला हवी. ड्रग्स व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT