Zuari Bridge
Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

‘झुआरी’च्या कामाला का होतोय विलंब?

दैनिक गोमन्तक

पणजी: आगशी व कुठ्ठाळीदरम्यान झुवारी नदीवर बांधण्यात येत असलेल्या 1,900 कोटी रुपये खर्चाच्या केबल स्टेड पुलाचे बांधकाम गेले काही दिवस ठप्प आहे. सध्या जुजबी कामे सुरू असली तरी नदीपात्रावरील केबल प्रिस्ट्रेसिंगचे काम स्थगित ठेवले आहे. या विलंबाचे प्रमुख कारण म्हणजे केबल स्टेड पुलाचे समग्र तंत्रज्ञान जाणणारा कुशल अभियंता सध्या कंपनीकडे नाही. असा अभियंता गोव्यात तर नाहीच; पण देशातही कुणी कुशल अभियंता केबल आधारित पुलाच्या बांधकामाचे मर्म जाणत नाही.

(Why Zuari's bridge work being delayed)

याच कारणास्तव अटल सेतू बांधणाऱ्या लार्सन ॲण्ड टुब्रो कंपनीने इटालीयन तज्ज्ञ अभियंत्याची नियुक्ती केली होती, जो शेवटपर्यंत या महत्त्वाच्या बांधकामावर लक्ष ठेवून होता. एप्रिल 2019 पर्यंतची मुदत असलेल्या पण कोविडचे निमित्त सांगून आतापर्यंतच्या विलंबाला सरकारी मान्यता मिळवणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीला पुलाच्या बांधकामातील अत्यंत महत्त्वाचा असा हा टप्पा ओलांडताना भविष्यातही बरेच कष्ट पडणार असल्याचे संकेत आहेत. पुलाचे काम नव्या तारखेच्याही पलीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूर्वानुभव नसताना दिलीप बिल्डकॉनला पुलाचे कंत्राट कसे मिळाले याचा तपास घेता हाती लागलेली माहिती सांगते, की महामार्गाशी संबंधित महाप्रकल्पांकरिता (100 कोटी आणि त्याहून अधिक खर्चाच्या) ईपीसी कंत्राटाची सक्ती केली आहे.

थेट फ्रान्सकडून उचललेल्या या कंत्राटाच्या मसुद्यात अनेक पूर्व अटी असतात आणि त्यात बोलीधारकांच्या आर्थिक क्षमतेबरोबर पूर्वानुभव आणि तांत्रिक कौशल्याचीही महत्त्वाची अट असते.

एमबीझेडचे संकेतस्थळ सांगते की, त्या कंपनीकडे 11 केबल आधारित पूल बांधण्याचा पूर्वानुभव आहे. मात्र, पुलावर देखरेख ठेवणाऱ्या ‘साबांखा’मधील विश्वासार्ह सूत्रांनी आपल्याला आजतागायत त्या ठिकाणी कुणी परदेशी अभियंता कामावर नियंत्रण ठेवत असल्याचे दिसलेला नाही, अशी माहिती दिली.

दिलीप बिल्डकॉन ही थातुरमातूर कंपनी नव्हे. मेट्रो, महामार्ग, ग्रीनफिल्ड विमानतळ असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या मध्यमस्तरीय कंपनीने याआधी हाताळले आहेत आणि त्यातील बहुतेक प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करून सरकारकडून 500 कोटी रुपयांहून अधिक बोनसही मिळवला आहे. दर्जेदार बांधकामासाठी मध्य प्रदेश येथे मुख्यालय असलेली ही कंपनी प्रसिध्द आहे. असे असले तरी दीर्घ पल्ला असलेल्या केबल स्टेड पुलाचे काम अत्यंत किचकट असते आणि त्यासाठी प्रगाढ अनुभवाची आवश्यकता असते. नागरी अभियांत्रिकीच्या क्षेत्रात हे कौशल्याची कसोटी पाहणारे काम म्हणून ओळखले जाते. येथे आरेखनापेक्षा प्रत्यक्ष बांधकामातच प्रचंड अडचणी येतात. अशा कामांचा अनुभवी देशात तरी नाही.

केबल स्टेड पुलासारखी बांधकामे सलग रितीने पूर्ण करता येत नाहीत. टप्प्याटप्प्यांनी बांधकाम हाताळायचे असते. असे सांगतात की, प्रत्येक टप्प्यावरल्या बांधकामाचा संरचनात्मक स्वभावधर्म पूर्ण झालेल्या पुलाहून बराच भिन्न असतो. म्हणूनच तेथे प्रगाढ अनुभवाची आवश्यकता असते. दिलीप बिल्डकॉनने उपलब्ध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मनोऱ्यांचे बांधकाम समाधानकाररित्या पूर्णही केले आहे. पण असामान्य कौशल्याची आवश्यकता असलेल्या केबल प्रिस्ट्रेसिंगचे काम रखडले आहे.

पूर्वानुभव नसतानाही मिळवले ‘दिलीप बिल्डकॉन’ने कंत्राट

दिलीप बिल्डकॉनने बांधकामाची निविदा अपेक्षित खर्चाच्या 32 टक्के कमी बोली लावून प्राप्त केली होती आणि त्यावेळी लार्सन ॲण्ड टुब्रो, गॅमन इंडिया अशा मातब्बर कंपन्यांवरही मात केली होती. मात्र, दिलीप बिल्डकॉनकडे कोणत्याच प्रकारच्या दीर्घ पल्ल्याच्या पुलाच्या बांधकामाचा पूर्वानुभव तेव्हाही नव्हता. आतादेखील कंपनीच्या संकेतस्थळावर गेल्यास प्रतिष्ठेच्या कंत्राटांत केवळ झुवारी पुलाचाच समावेश कंपनीने केलेला दिसेल.

विदेशी कंपनीशी करार : दिलीप बिल्डकॉन आर्थिकदृष्ट्या सक्षम असली तरी केबल स्टेड पुलाच्या बांधकामाचा पूर्वानुभव नव्हता. त्यावर उपाय शोधताना निविदा प्रक्रियेत उतरण्यासाठी कंपनीने युक्रेनमधील मोस्ताबुदाव्हेन्युनी झाहीन 112 (एमबीझेड) या कंपनीशी करार करून जॉईंट व्हेंचर म्हणून बोली लावली.

भागिदारीतूनही पळवाट : बोली आपल्या बाजूने लागल्यानंतर कंपनीने युक्रेनियन साहाय्याची आवश्यकता नाही, असे धोरण राबवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, काम सुरू असताना कागदोपत्री तरी जॉईंट व्हेंचर निकालात काढता येत नाही. तसे केल्यास सरकारकडे कंत्राट रोखण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पण कागदावर जॉईंट व्हेंचर ठेवून प्रत्यक्षात भागिदाराशी काडीमोड घेण्याची पळवाट उपलब्ध असतेच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT