Candolim Murder Case 
गोवा

रुममध्ये रक्ताचे डाग, टॅक्सी चालकाची सतर्कता, पोलिसांचा मागोवा; कांदोळी खून प्रकरणाची ए टू झेड कहाणी

महिलेला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी टॅक्सी चालकाशी कोकणीतून संवाद साधला

Pramod Yadav

हॉटेलची रुम स्वच्छ करण्यासाठी आलेल्या रुमबॉयला रुममध्ये रक्ताचे डाग दिसले, एका दिवसापूर्वी चार वर्षांच्या मुलासोबत आलेली महिला मध्यरात्री हॉटेलमधून बॅग घेऊन एकटीच बाहेर पडत होती, बंगळुरुला जायला टॅक्सीभाडे महाग पडेल, असे हॉटेल स्टाफने सांगूनही तिने टॅक्सीनेच जाण्याचा आग्रह धरला.

त्यांचा संशय बळावला, पोलिसांना कळवण्यात आले आणि नंतर समोर आली काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना... हृदयाचा थरकाप उडवणारा जन्मदात्या आईनेच शांत डोक्याने केलेला 4 वर्षीय कोवळ्या लेकराचा खून... 

घटनाक्रम

06 जानेवारी 2024, कांदोळी परिसरातील, सिकेरी येथे एका हॉटेलमध्ये चार वर्षीय बालकासोबत सूचना सेठ नावाची महिला राहण्यास आली. उच्च शिक्षित आणि एका एआय... म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता स्टार्टअप कंपनीची CEO असणारी सूचना एक दिवस तिथे राहिली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच... 07 जानेवारीच्या मध्यरात्री ती हॉटेलमधून बाहेर पडली.

चेकआऊट करण्यापूर्वी तिने हॉटेलच्या रिसेप्शनजवळ बंगळुरुला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्यास सांगितले. टॅक्सीचे भाडे महाग पडेल त्याएवजी तुम्ही विमानाने प्रवास करा असे रिसेप्शन स्टाफ सांगत असताना देखील सूचनाने टॅक्सीनेच जाण्याचा आग्रह धरला.

अखेर रिसेप्शनकडून इनोव्हा गाडी बुक करण्यात आली. बाहेर पडताना तिच्यासोबत केवळ एक बॅग होती पण तिचा मुलगा तिच्या सोबत नव्हता. बॅग टॅक्सीत ठेऊन सूचना  बंगळुरुला जाण्यासाठी रवाना झाली. टॅक्सीसाठी तिने 30 ते 35 हजार रुपये भाडे मोजल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी हॉटेलमधील घटनाक्रम

सोमवारी सकाळी सूचनाने मुक्काम केलेल्या रुमची स्वच्छता करण्यासाठी रुमबॉय रुममध्ये दाखल झाला. तिथे त्याला रक्ताचे डाग आढळून आले, हॉटेल मॅनेजरला तात्काळ त्याने याची कल्पना दिली.

तिच्या अचानक टॅक्सीने जाण्यामुळे त्याला संशय होताच, त्यात रक्ताचे डाग दिसल्याने सतर्क झालेल्या हॉटेल मॅनेजरने लगेच टॅक्सी चालकाला फोन करुन सूचनाशी संवाद साधला व मुलगा कुठे आहे अशी विचारणा केली.

सूचनाने मुलगा फातोर्डा येथे मैत्रिणीकडे असल्याचे सांगितले, एवढेच नव्हे तर तिने एक पत्ता देखील हॉटेल मॅनेजरला सांगितला. तपासाअंती तो पत्ता खोटा निघाला. दरम्यान, तोपर्यंत हॉटेल प्रशासनाने कळंगुट पोलिसांना पाचारण केले होते.

कोकणीतून संवाद

कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले असता मुलगा तिच्यासोबत नसल्याचे दिसून आले.

पोलिसांनी मॅनेजरच्या मदतीने पुन्हा टॅक्सी चालकाला संपर्क साधून त्याला विश्वासात घेतले. महिलेला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी टॅक्सी चालकाशी कोकणीतून संवाद साधला आणि तिच्याकडे बॅग आहे का? अशी विचारणा केली. ड्रॉयव्हरने सकारात्मक उत्तर दिल्यानंतर पोलिसांनी त्यांला 'तुझी टॅक्सी रस्त्यात कर्नाटक पोलीस आडवतील' अशी पूर्वकल्पना दिली.

कळंगुट पोलिसांनी चित्रदुर्ग पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती आधीच दिली होती. सापळा रचून बसलेल्या कर्नाटक पोलिसांनी टॅक्सी अडवून अयमंगला पोलीस स्थानकाकडे वळवली.

पोलिसांनी सूचनाने सोबत आणलेली बॅग खोलून पाहिल्यावर त्यात चार वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला. तिथेच पोलिसांनी सूचनाला अटक केली. गोवा पोलिसांनी नंतर सूचना सेठला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि म्हापसा न्यायालयासमोर उभे केले. न्यायालायने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

शवविच्छेदन अहवाल

दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता येथे असलेला सूचनाचा नवरा अर्थात त्या चिमुकल्याचा बाप व्यंकट रमण याला हा प्रकार कळताच मंगळवारी संध्याकाळी तो भारतात आला. त्यानंतर त्याने मृतदेहाच्या शवविच्छेदनास संमती दिली.

शवविच्छेदनातून मुलाचा गळा दाबल्याने मृत्यू झाला असून, उशी किंवा इतर वस्तूचा वापर करुन श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी माहिती समोर आली.

मृत्यूला 36 तासांपेक्षा जास्त काळ झाला असून मुलाच्या शरीरात रक्ताची कमतरता किंवा दुखापतीच्या कोणत्याच खुणा आढळून आलेल्या नाहीत, दबावामुळे छाती आणि चेहऱ्यावरील शिरा फुगल्याने शरीराला इजा होत नाही, असे शवचिकित्सक डॉ. कुमार नाईक यांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालात बालकाचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे समोर आले आहे तर मग रुममध्ये आढळलेले रक्त कोणाचे हा प्रश्न उपस्थित होतो. तर, खून झाल्यानंतर मुलाच्या नाकातून रक्त येत होते असे अहवालातून समोर आले आहे.

तसेच, सूचनाने हाताची नस कापून आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता पण तिचा हा प्रयत्न फसल्याचे समोर आले. तेच हे रक्ताचे डाग असावेत असे देखील सांगितले जात आहे.

सूचना सेठचा परिचय? आणि पती पत्नीचा वाद

मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी असणारी सूचना सेठने परदेशातून उच्चशिक्षण घेतले, 'द माइंडफुल एआय लॅब' या कंपनीची ती सीईओ आहे.याआधीही तिने अनेक बड्या कंपनीत मोठ्या पदावर काम केले आहे.

याघडीला ती कोट्यवधींची मालकीण आहे, 2010 सालीच तिने केरळच्या व्यंकट रमण याच्याशी विवाह केला होता, 2019 मध्ये त्यांना हे बाळ झाले, पण पती पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागल्याने 2020 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.

ते दोघे सध्या विभक्त पणे वेगवगेळ्या ठिकाणी राहत होते. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. मुलाची कस्टडी कोणाकडे याचा निर्णय आज म्हणजेच १० जानेवारी रोजी बंगळुरुच्या कौटुंबिक न्यायालयात होणार होता.

मुलाचा ताबा पित्याकडे जाईल या भीतीने वैफल्यग्रस्त होऊनच सूचनाने त्याचा जीव घेतला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT