Election Dainik Gomantak
गोवा

शिरोड्यात कोण ठरणार ? 'मुकद्दर का सिकंदर'

वास्तविक 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुभाष तब्बल पाच हजारच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. पण नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत हा फरक फक्त सत्तर मतांवर घसरला होता.

दैनिक गोमन्तक

फोंडा : शिरोडा (Shiroda) हा फोंडा (Ponda) तालुक्यातील आणखी एक ग्रामीण मतदारसंघ आहे शिरोडा, बोरी (Borim), पंचवाडी, बेतोडा- निरंकाल या चार पंचायती शिरोड्यात येतात. तसेच बोरी व शिरोडा या दोन जिल्हा पंचायतीचा या मतदारसंघात समावेश होतो. सुभाष शिरोडकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. ते सातवेळा शिरोड्यातून निवडून आले आहेत. मात्र सहा वेळा कॉग्रेसच्याउमदेवारीवर (congress) तर 2019 साली झालेल्या पोटनिवडणुकीत ते भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. वास्तविक 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीत (Election) सुभाष तब्बल पाच हजारच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. पण नंतर भाजपमध्ये (bjp) प्रवेश केल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत हा फरक फक्त सत्तर मतांवर घसरला होता. तरीही डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत शिरोडा व बोरी या दोन्ही जागा भाजपतर्फे मिळवण्यात ते यशस्वी ठरले होते. पण आता गेल्या बारा महिन्यात समीकरणे बदलली असून सुभाष भाऊंपुढे कडवे आवाहन उभे ठाकले आहे. या मतदारसंघाचा फेरफटका मारल्यास सुभाष विरोधी वातावरण ठायी ठायी प्रतीत होत आहे. खुद्द भाजपचे कार्यकर्ते सुध्दा त्यांच्या विरोधात बोलताना आढळतात.

बोरीचे जि.प. सदस्य दीपक नाईक बोरकर यांना भाजपची उमेदवारी द्यावी, असा एक प्रस्ताव सध्या वर येत आहे. तरीही ही उमेदवारी सुभाष भाऊंनाच मिळणार असे संकेत मिळत आहेत. पण उमेदवारी मिळाली म्हणून ते बाजी मारतीलच याची खात्री देता येणे शक्य नाही. पण त्याचबरोबर सुभाष भाऊंना पर्याय कोण? याही प्रश्नाचे उत्तर शिरोडावासीय शोधताना आढळत आहेत.. आमआदमी पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणारे माजी मंत्री तथा शिरोड्याचे माजी आमदार महादेव नाईक यांनी सुभाषभाऊंचा दोन वेळा पराभव केल्यामुळे त्यांना राजकारणातले छक्के पंजे चांगले ज्ञात आहेत. पंचवाडीतील सुभाष शिरोडकरांच्या बाजूला असलेली पारंपरिक कॅथलिक मते यावेळी आपच्या बाजूने वळू शकतात, असाही संकेत मिळत आहे. त्यात परत मंत्री होऊन गेल्यामुळे महादेव नाईकांचा या मतदारसंघातील मतदारांशी चांगलाच संपर्क आहे. पण आम आदमी पक्ष शिरोड्याकरिता नवीन असल्यामुळे या पक्षाला मतदार जवळ करतील, की नाही याची शंका वाटते. पण सध्या तरी महादेव नाईक हेच सुभाष भाऊंचे निकटचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जात आहेत.

मगो-तृणमूल युती

मगोपतर्फे रामचंद्र मुळे यांचे पुत्र संकेत मुळे हे रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले असले, तरी मगोपने तृणमुलशी केलेली युती त्यांच्या आड येऊ शकते, असा होरा व्यक्त होत आहे. शिरोड्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकर व बोरीचे पंच तुकाराम बोरकर हे तृणमुलतर्फे रिंगणात उतरणार असे बोलले जात होते. बोरकर यांचे तर परवा तृणमुलमध्ये दणक्यात आगमन झाले होते. पण आता त्यांच्या सर्व आशा आकांक्षांवर पाणी पडल्यासारखे झाले आहे. शिरोड्यात मगोपची पारंपरिक अशी मते असली तरी जिंकायला पुरेशी नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ मगोपला जाणार हे निश्चित आहे. हे पाहता तृणमुलवासीयांना मगोपचे काम करावे लागणार असेच चित्र दिसते आहे. मतदारांना ही युती पटणे कठीण आहे, असेच मतदारांशी बोलल्यावर दिसून येते. कॉँग्रेसच्या गोटातही चलबिचलता दिसते आहे. बोरीच्या सरपंच ज्योती नाईक यांचे पती मुकेश नाईक हे कॉँग्रेस उमदेवाराचे प्रमुख दावेदार गणले जात होते. पण आता परवाच कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेले स्नेहलो ग्रासियस हे ही उमेदवारीचे दावेदार बनू शकतात.

काँग्रेसचा बालेकिल्ला?

सुभाष भाऊ भाजपामध्ये गेल्यानंतर शिरोड्यातील कॉँग्रेसची बांधणी विस्कळीत झाली असून आताही बांधणी पूर्वपदावर कोण आणणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 1984 पासून शिरोडा हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2007 व 2012 साली सुभाष भाऊंचा पराभव झाला तरी कॉँग्रेसचे शिरोड्यातील कार्य सुरूच होते. मात्र गेली दीड वर्षे शिरोड्यात कॉँग्रेसचे कार्य ठप्प झाले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय? पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या महादेव नाईक यांना सव्वातीन हजाराच्या आसपास मते प्राप्त झाली होती. तसेच जि. पंचायत निवडणुकीत त्यांचे अस्तित्व सुध्दा दिसले नव्हते. आता जरी कॉँग्रेस थोडीफार सक्रीय झाल्यासारखी वाटत असली तरी ही सक्रीयता कॉँग्रेसला ते ‘गतवैभव’ प्राप्त करून देईल की नाही हे बघावे लागेल. ‘व्ही फॉर शिरोडा’ ही सुभाष भाऊंच्या विरोधात उभी राहिलेली शिरोड्यातील एक संघटना डॉ. सुभाष प्रभुदेसाई हे या संघटनेतर्फे निवडणुकीत उतरणार असल्याचे समजते.

शिरोडकरांचा प्रचार

डॉ. प्रभुदेसाई हे शिरोड्यातील एक नामांकित डॉ. म्हणून गणले जातात. त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. पण आता ते राजकारणात किती प्रभावी ठरू शकतात हे बघावे लागेल. तरीही आम आदमी, कॉँग्रेस, मगोप, व्ही फॉर शिरोडा हे सर्व पक्ष सुभाषांच्या विरोधात ठाकल्याचा फायदा परत त्यांनाच होऊ शकेल असे बोलले जात आहे. सध्या सुभाष भाऊ प्रचाराला लागले असून वाट जरी बिकट असली तरी त्यातून ते नेहमीसारखाच मार्ग काढतील, अशी आशा त्याचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसताहेत. पण ‘वन टू वन’ लढत झाली, तर मात्र सुभाष भाऊंना ही निवडणूक कठीण जाऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

तर्कवितर्कांना उधाण

रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे शैलेश नाईक हा युवक रिंगणात उतरणार असून सध्या ते घरोघर प्रचार करताना दिसत आहे. गेल्या खेपेला मगोपतर्फे निवडणूक लढवून सहा हजारच्या आसपास मते घेतलेले अभय प्रभू मात्र राजकीय दृष्ट्या शांत झाल्यासारखे दिसताहेत. अभय प्रभू यांचा बेतोडा निरंकाल ग्रामपंचायतीत चांगलेच वर्चस्व असल्यामुळे व मागच्या वेळी त्यांनी चांगली लढत दिल्यामुळे ते यावेळी सुभाष भाऊंना पर्याय ठरू शकले असते, असा होरा विश्लेषक व्यक्त करत आहेत. पण सध्यातरी महादेव नाईक सुभाष भाऊंना ‘चेक मेट’ देऊ शकतील की काय? दुसरा एखादा उमेदवार सुभाष भाऊंना आठव्यांदा विजय मिळविण्यात अडथळा ठरू शकेल की काय? यावर शिरोडा मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे एकंदरीत शिरोड्याचे वातावरण रोचक झाले असून तर्कवितर्कांना उधाण यायला लागले आहे. यातून कोण सिकंदर ठरतो, याचे उत्तर येणारा काळच देईल हे निश्चित.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT