मिलिंद म्हाडगुत
पेडणे हा मतदारसंघ महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवर आहे. साधारणपणे महाराष्ट्राचा बाज असलेला असा हा मतदारसंघ. उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) हे पेडणेचे विद्यमान आमदार. पण ते सध्या मडगावात किल्ला लढवताहेत. भाजपने (BJP) पेडणेची उमेदवारी न देऊन त्यांचे मडगावात स्थलांतर केले आहे. त्यामुळे ते सध्या विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी झुंज देताना दिसताहेत. परिणामी राजन कोरगावकर, प्रवीण आर्लेकरसह सर्वच उमेदवार नवखे असून या मतदारसंघातून निवडून येणारा कुणीही उमेदवार प्रथमच सिकंदर होऊन विधानसभेत दाखल होणार आहे.
वास्तविक गेले वर्ष दीडवर्ष आर्लेकर मगोपतर्फे कार्यरत होते. पण भाजपने उचलून आणून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे मगोपला राजन कोरगावकर यांना रिंगणात उतरावे लागले. 2017 मध्ये मगोपतर्फे बाबू आजगावकर यांनी तत्कालीन सभापती राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव केला होता. पण नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने समीकरणे बदलली. खरेतर राजेंद्र आर्लेकर हेही भाजपच्या उमेदवारीकरिता इच्छुक होते. पण त्यांना हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्त केल्यामुळे ते या स्पर्धेतून बाहेर पडले. त्यामुळे बाबूंना तसे स्पर्धक नव्हते. बाबू हे पेडणेतून तीन वेळा निवडून आले आहेत. तरीही भाजपने त्यांना संधी न देता तुलनेने नवख्या असलेल्या प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी दिली. आर्लेकरांनी गेल्या वर्ष-दीडवर्षात बरेच कार्य केले असले तरी ते मगोपतर्फे कार्यरत होते. मगोपने तृणमूलशी युती केली म्हणून पक्ष सोडला, असे जरी आर्लेकर सांगत असले तरी ती सबब विशेष पटत नाही. आर्लेकरांनी भाजप प्रवेश केल्यानंतर बाबू हेही मगोतर्फे इच्छुक होते. पण ढवळीकर बंधूनी त्यांना उमेदवारी नाकारून ‘गद्दारांना’ मगोप उमेदवारी देत नाही, असा संदेश जनतेपर्यंत पोहचवला. आता कोरगावकर मगोतर्फे लढत असून त्यांनी आर्लेकरांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. आपतर्फे पुंडलिक धारगळकर, शिवसेनेतर्फे सुभाष केरकर, रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे संजय म्हापसेकर हे रिंगणात असून गुरुदास विनोर्डेकर, कमलाकर गडेकर, विष्णूदास कोरगांवकर हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ते कोणाची किती मते घेतात ते बघावे लागेल. (who will be winner pernem)
मगोप राखणार का बालेकिल्ला ?
पेडणे मतदारसंघातील सर्व उमेदवार हे ‘नवखे’ आहेत. कोणी जर निवडून आला तरी ती त्याची विधानसभेत प्रवेश करण्याची पहिलीच वेळ असेल हे निश्चित. कॉंग्रेसतर्फे (Congress) जितेंद्र गांवकर हे रिंगणात असून ते या लढतीचा तिसरा कोन ठरू शकतात. पण खरेतर लढत ही भाजप व मगोत आहे. पेडणे एकेकाळी मगोचा ‘बालेकिल्ला’ म्हणून गणला जात होता. मात्र जितेंद्र देशप्रभूंनी तो कॉंग्रेसकडे नेला. तरीसुध्दा कॉंग्रेस येथे अभावानेच यशस्वी झाली आहे. मगोप भाजपचे जेवढे मतदार आहेत तेवढे इथे कॉंग्रेसचे पारंपरिक मतदार नाहीत. त्यामुळे आता मगोप पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडून खेचतो का,हे बघावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.