गोव्यात सध्या पाण्याच्या टॅंकरमधून सांडपाणी नेत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने विविध सरकारी विभागांना भेट देऊन जाब विचारण्याचे सत्र सुरू केले आहे. कॉंग्रेसच्या या आंदोलनाला कार्यकर्त्यांचा उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे.
परंतु विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता तसेच हळदोणाचे आमदार कार्लुस फरेरा हे मात्र गप्प आहेत. आजपर्यंत झालेल्या तीन आंदोलनात एकही आमदार सहभागी न झाल्याने, आमदार कुठे गायब झालेत? असा प्रश्न लोकांना पडला आहे.
कॉंग्रेसच्या तीन आमदारांच्या मौनावर आता गोमंतकीयांकडून संताप व्यक्त होत असून, कॉंग्रेसचे कार्यकर्तेही आता आमदारांच्या भूमिकेबद्दल वरिष्ठांकडे तक्रार नोंदविण्याच्या तयारीत आहेत. या ज्वलंत प्रश्नांवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ पणजीकर, कॅप्टन विरीयाटो फर्नांडिस, बिना नाईक, सावियो डिसिल्वा, विजय भिके, श्रीनिवास खलप, सुदिन नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सरकारवर दबाव आणत आहेत.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी परवाच मडगावमध्ये पुलवामा शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी युवक कॉंग्रेसने काढलेल्या मेणबत्ती यात्रेत सहभाग घेतला होता. त्यामुळे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे येत असताना आमदारच मागे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉंग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आताच करावी लागणार असून, एकंदर निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आमदारांनी लक्ष घालणे गरजेचे आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे. साखळी तसेच फोंडा नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात किंवा तेथे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठीसुद्धा एकही आमदार न गेल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत.
...आंदोलनात आम्ही होतोच
कालच्या आंदोलनाला मी काही वैयक्तिक कामासाठी गैरहजर होतो. मात्र यापूर्वी पक्षाने जी आंदोलने केली आहेत, त्यात आमदार या नात्याने मी आणि अन्य आमदार सहभागी झाले होते. दूषित पाणीपुरवठा संबंधी पक्षाने जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेला पाठिंबा आहे.
एल्टन डिकॉस्ता, आमदार (केपे)
...तर वजन वाढले असते
विरोधी पक्ष नेत्यांवर कित्येक कामांचा भार असतो, त्यामुळे ते व्यस्त असणे समजू शकते, पण इतर दोन आमदारांनी या आंदोलनात भाग घ्यायला हवा होता, हे माझे मत आहे. मात्र कदाचित ते आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त असावेत. पण एक मात्र खरे या आंदोलनात आमदार सामील झाले असते तर आंदोलनाची धार अधिकच वाढली असती.
मोरेन रिबेलो, काँग्रेस समिती (सरचिटणीस)
पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अनुपस्थित
"दूषित पाणीपुरवठा प्रकरणी जलस्रोत खात्यावर जो मोर्चा नेण्यात आला त्याची कल्पना मला देण्यात आली होती. पण त्याच वेळी माझे अन्य पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी तिथे जाऊ शकलो नाही."
"मात्र काँग्रेस पक्षाने जो मुद्दा घेतला आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि यावर मी सरकारला धारेवरही धरणार आहे. टँकरने पाणीपुरवठा केला जातो, ते पाणी पिऊ नका, असे जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी सांगणे दुर्दैवी आहे. असे असल्यास सरकार टँकरने पाणी पुरवठा का करते ?"
कार्लोस फेरेरा, आमदार (हळदोणा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.