दाबोळी: वास्कोच्या नवीन मासळी मार्केट बांधण्याचा तिढा अजून सुटला नसून या मार्केटमधील (Market) मासळी विक्रेत्या महिलांची मागणी जोपर्यंत धसास लागत नाही, तोपर्यंत नवीन मासळी मार्केटचा प्रश्न सुटणार नाही हे नक्की. मुरगाव पालिकेतर्फे मासळी मार्केटच्या जागी नवीन सुसज्ज इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने सुडाकडे संबंधित रक्कम वर्ग केली आहे. त्यानुसार मासळी मार्केटमधील विक्रेत्यांना देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर हलवण्यात येणार आहे. तेथे शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले असून इतर कामे लवकरच पूर्ण होणार आहे. विक्रेत्यांना मार्केट मधून देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांना दुसर्या जागेवर हलवण्या पूर्वी येथे किती मासे विक्रेते आहेत आणि मासे कापणारे किती आहे, तसेच मार्केट बाहेर बसणारे फळ भाजीविक्रेते किती आहेत, यासंबंधी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण सुरू केले होते. मात्र बऱ्याच मासळी विक्रेत्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. त्यामुळे मासळी मार्केट (Fish Market) विषयी गुंता अजून वाढत आहे.
दरम्यान आज सकाळी सदर मासे विक्रेत्या महिलांनी एकत्रित जमून जोपर्यंत घाऊक मासे विक्रेत्यांना तसेच शहरात इतर ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी मासे विक्री करणाऱ्यांना त्या जागेवरून मासे विक्री करण्यास बंदी आणत नाही तोपर्यंत मासळी मार्केट मधून आम्ही कोणत्याही परिस्थितीत हलणार नाही असा एल्गार सोडला. मासळी मार्केट संघाच्या अध्यक्षा कारिदाद यांनी बोलताना सांगितले की पाच महिन्यापूर्वी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच वास्को पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक मासळी मार्केट महिला बरोबर झाली होती. सदर बैठकीत आम्ही आमचे घाऊक मासळी विक्रेते संबंधी तसेच मोक्याच्या ठिकाणी बसून मासे विक्री करणाऱ्या विरुद्ध प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा त्या विक्रेत्यांना तेथून हलविण्यात येणार असल्याचेही आश्वासन आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी व आमदार आल्मेदा यांनी दिले होते. मात्र आज पर्यंत आमदार तसेच संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास अपयशी ठरले आहे. आता नवीन मासळी बांधकाम करण्यास आम्हाला स्थलांतर होण्यास कोणत्या तोंडून सांगत आहे. आधी त्या विक्रेत्यांवर बंदी आणा नंतरच नवीन मासळी मार्केट बांधण्यास पुढाकार घ्यावा. तोपर्यंत आम्ही या जागेवरून हलणार नाही असा इशारा संघटनेच्या अध्यक्ष कारीदाद यांनी दिला आहे.
संघटनेचे कायदा सल्लागार फा. मायकल यांनी याविषयी बोलताना मासे मार्केटमधील विक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्यास वास्कोचे आमदार अपयशी ठरले आहे. जोपर्यंत त्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नवीन मासळी मार्केट बांधकाम हाती घेणे बरोबर नाही. तसेच खारीवाडा येथे स्वतः नगरसेवक बेकायदेशीररित्या घाऊक मासळी विक्री करत आहे. त्यामुळे दुसर्या घाऊक विक्रेत्यांना दुजोरा मिळतो. तसेच मोक्याच्या ठिकाणी मासळी विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर ही कारवाई होत नसल्याने त्यांच्या व्यवसाय तेजीत चालतो असल्याचे ते म्हणाले. वास्कोचे आमदार यापूर्वीही आल्मेदा यांनी मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांच्या प्रश्न सोडवावा नंतरच नवीन मासे मार्केट बांधकामास हात घालावा असे स्पष्ट केले.
याविषयी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांना विचारले असता ते म्हणाले की लोकांना घाऊक मासळी विक्रेत्याकडून कमी दरात वजनाद्वारे स्वस्त दरात मासे मिळतात. त्यानुसार लोक त्यांच्याकडे जाणारच. तसेच त्यांच्यावर आम्ही कारवाई चालूच ठेवली असून पालिकेतर्फे, पोलिसांद्वारे त्यांच्यावर कारवाई चालू आहे. मात्र त्यांच्यावर २४ तास पाळत कशी ठेवणार. घाऊक मासळी विक्रेत्यांना लवकरच दत्तात्रेय मार्गाच्या बाजूस पालिकेच्या जुन्या मासळी मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात येणार असल्याचे आमदार आल्मेदा यांनी सांगितले. मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्यांचा त्यांच्या मागणी नुसार घाऊक मासळी विक्रेत्यांवर कारवाई चालू आहे. मासळी विक्रेत्या महिला व खारीवाडा येथील घाऊक विक्रेत्यामध्ये दुजाभाव होऊ नये यासाठी घाउक विक्रेत्यांना हल्लीच नुतनीकरण करण्यात आलेल्या जुन्या मार्केट मध्ये एकाच ठिकाणी आणणार आहे.
नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सदर नवीन मासळी मार्केट हे मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांच्या भल्यासाठीच असून त्यांनी यासाठी आडकाठी आणणे बरोबर नाही. प्रत्येक मासे खवय्यांना ज्यांना मोठे मासे व जास्त प्रमाणात मासळी हवी आहे तो घाऊक दरात मासे घेणारच. तसेच जो माणूस दररोज मासळी मार्केट मध्ये येतो तो मासळी मार्केटमध्ये येणारच त्यासाठी मासे विक्रेत्या महिलांनी हतबल होऊ नये. येणाऱ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात सदर नवीन सुसज्ज असे मासळी मार्केट बांधून दिले जाईल असे ते म्हणाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.