पणजी : गोव्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवसायाशी अनेकदा संबंध प्रस्थापित झाला असला, तरी असे व्यवहार पूर्णत: उखडून काढण्यासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी विभागाबरोबर शेजारील राज्यांशी समन्वयाची आवश्यकता आहे. तरच असे व्यवहार करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचता येते. राज्यात ‘झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ या धोरणानुसार गोवा पोलिस अधिक सक्रिय होतील, असा आशावाद नवे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी व्यक्त केला.
जसपाल सिंग यांनी आज पोलिस (police) महासंचालक पदाचा ताबा घेतला. यावेळी ते बोलत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात अमली पदार्थांचे व्यवहार सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. याशिवाय ॲण्टी नार्कोटिक ब्युरो यांच्या वतीनेही छापे टाकून मुद्देमालासह काहीजणांना अटक केली आहे. यापुढे राष्ट्रीय यंत्रणांसोबत संयुक्तपणे अमली पदार्थ व्यवहाराविरोधात कारवाईचे संकेत जसपाल सिंग यांनी दिले. पर्यटन (Tourism) क्षेत्राला उपद्रव ठरणाऱ्या या व्यवसायाला आळा घातल्यास पर्यटन व्यवसाय अधिक तेजीत येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- गोव्यात तिसऱ्यांदा बदली
जसपाल सिंग (1996 अग्मूट केडर) यांनी आज आपल्या पदाचा ताबा घेतला. त्यांची ही गोव्यात (goa) तिसऱ्यांदा बदली झाली आहे. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची गोव्यात 1998 साली साहाय्यक अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्या व्यूहरचना सहकाऱ्यांशी चर्चा करून आखण्यात येतील, अशी प्रतिक्रिया सिंग यांनी पदाचा ताबा घेतल्यानंतर दिली.
‘‘गोव्यात मी तिसऱ्यांदा येत आहे. त्यामुळे इथली गुन्हेगारी व तपासासंदर्भात माहिती आहे. देशातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये तपासकामात गोवा पोलिसांचा क्रमांक लागतो. त्यामुळे तो दर्जा कायम ठेवण्यासाठी सर्व प्रकारची आव्हाने पेलली जातील. गोवा हे ड्रग्ससाठी नव्हे, तर पर्यटकांसाठी सुरक्षित स्थळ असल्याची ओळख जागतिक पातळीवर व्हावी, यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. - जसपाल सिंग, महासंचालक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.