पणजी: गोवा रक्षण यात्रा काढली म्हणून काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. राज्यातील जनतेचा पाठिंबा भाजप सरकारसोबत आहे आणि तो कायम राहील. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात भाजपचेच सरकार असेल, असा दावा नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.
नगरनियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी काँग्रेसच्या यात्रेसह आगामी विधानसभा निवडणूक, सत्तरीतील राजकीय घडामोडी आणि सरकारच्या आगामी निर्णयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सत्तरी मतदारसंघात निमंत्रित केले असून त्यांच्या उपस्थितीत १० ते १५ हजार लोकांचा सहभाग असलेली सभा घेण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या सभेत मुख्यमंत्री जनकल्याणासाठी विविध घोषणा करतील.
त्यामध्ये जनतेच्या अपेक्षेपलीकडील काही घोषणांचाही समावेश असेल. या घोषणा जनतेला आनंद देणाऱ्या असतील, असे त्यांनी नमूद केले. नवरात्रीपूर्वी आणि नवरात्रीनंतर राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. विशेषतः महिला आणि तरुणांसाठी सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत, असे राणे यांनी सांगितले. २०२७ च्या निवडणुकीनंतर आगामी सरकार भाजपचेच असेल. पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मेहनतच नव्हे, तर रक्ताचा प्रत्येक थेंब आटवेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणे म्हणाले...
भाजपमध्ये दिगंबर कामत, बाबूश मोन्सेरात यांच्यासह अनेक नेते कार्यरत आहेत. या सर्वांच्या कामामुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अलीकडे वाळपई मतदारसंघाला भेट दिल्याचा संदर्भ देत राणे म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणताही नेता कोणत्याही मतदारसंघात जाऊ शकतो. उद्या मीही फातोर्डा मतदारसंघात जाऊ शकतो. मात्र, एखाद्या नेत्याला किती प्रतिसाद द्यायचा, हे जनता ठरवते.
काँग्रेसच्या गोवा रक्षण यात्रेला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणाला यात्रा काढायची असेल तर त्यांनी ती काढावी. यात्रा काढली किंवा समाजमाध्यमांवर काही लिहिले, तरी मला त्याचा फरक पडत नाही.
सत्तरीच्या जनतेसाठी मी आजपर्यंत काम केले असून यापुढेही करत राहीन.
आगामी काळात नगरनियोजन खात्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. त्याबाबतची माहिती योग्यवेळी आणि योग्य प्रकारे जनतेसमोर मांडली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.