Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, खलीने खुलवली विजयची खळी!

Khari Kujbuj Political Satire: मडगावातील सिटी बससवाल्यांची दादागिरी ही आजकालची नव्हे तर खूप वर्षांपूर्वीची आहे. विशिष्ट मंडळीच या बसेस चालवतात.

गोमन्तक डिजिटल टीम

खलीने खुलवली विजयची खळी!

फातोर्डा मतदारसंघात सुरू झालेल्‍या एका स्पोर्ट्स बुटीकचे उद्‍घाटन करण्‍यासाठी काल पैलवान ग्रेट खली यांना बोलावण्‍यात आले होते. स्‍थानिक आमदार या नात्‍याने विजय सरदेसाई हे या कार्यक्रमाला उपस्‍थित होते. यावेळी खली यांनी विजयची वारेमाप स्‍तुती केली. विजयबद्दल मी ऐकून होतो, आज त्‍यांची प्रत्‍यक्ष भेट घडली. मतदारसंघात बदल घडवून आणण्‍याची तुमच्‍या आमदाराची क्षमता आहे, असे खली बोलले. हे ऐकताच दुसऱ्या बाजूने विजयची खळी खुलली!∙∙∙

उर्मट बसवाल्‍यांना वेसण हवीच

मडगावातील सिटी बससवाल्यांची दादागिरी ही आजकालची नव्हे तर खूप वर्षांपूर्वीची आहे. विशिष्ट मंडळीच या बसेस चालवतात. त्यांच्या दादागिरीला सरकारी यंत्रणा वठणीवर आणत नाही या निराशेतून पिढीजात बसवाले व्यवसायातून मागे हटले. बिचाऱ्या प्रवाशांना तरणोपाय नाही. ते मुकट्याने प्रवास करतात. या बसवाल्यांना बसथांबा लागत नाही, तिकीट लागत नाही की गणवेशही लागत नाही. मडगावच्या पांडव कपेलजवळ पाच मिनिटे थांबावे, या लोकांची उर्मटगिरी दिसून येते. अशा प्रकारातूनच वाहतूक खात्याने तेथील तीन बसेसचे परवाने ४५ दिवसांसाठी निलंबित केले आहेत. या लोकांच्या वागणुकीला कंटाळलेले म्हणतात की, खरे तर अशा बसेसचे परवाने कायमचे निलंबित करून पणजीच्‍या धर्तीवर कदंब बसेस सुरू कराव्‍यात. आता या कारवाईनंतर तरी हे ‘दादा’ बसचालक ताळ्यावर येऊन आपले वर्तन सुधारतील काय? ∙∙∙

बाबांच्‍या कार्यकर्त्यांचा अखेर झाला हिरमोड

मागची दोन वर्षे मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या मडगा‍वच्‍या बाबांना त्‍यांच्‍या या वाढदिनी तरी चांगली वार्ता कानी पडेल अशी खात्री त्‍यांच्‍या तमाम कार्यकर्त्यांना होती. याचे कारण म्‍हणजे, गोवा मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री रोहन खंवटे यांच्‍याविरोधात कर्नाटक न्‍यायालयात सुरू असलेल्‍या खटल्‍याचा निकाल ७ मार्च रोजीच लागणार होता. या खटल्‍यात खंवटे दोषी ठरले तर त्‍यांचे मंत्रिपद जाणार आणि त्‍याजागी बाबांची वर्णी लागणार अशी अटकळ सर्व कार्यकर्त्यांनी बांधली होती. पण रोहनच्‍या सुदैवाने आणि बाबांच्‍या दुर्दैवाने असेल कदाचित, रोहन निर्दोष मुक्‍त झाले आणि बाबांच्‍या कार्यकर्त्यांच्‍या हिरमोड झाला. एवढेच नव्‍हे तर त्‍याच दिवशी गिरीश चोडणकर यांनी अपात्रतेविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केलेली याचिकाही दाखल करून घेतली गेली. बाबांच्‍या कार्यकर्त्यांसाठी हा दुसरा धक्‍का होता. ∙∙∙

‘राजकारणी विरहीत’ फेरीची उत्‍सुकता वाढली

मांद्रे नववर्ष स्वागत समितीने या गुढीपाडव्याला एक अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. यावर्षी भव्य मिरवणूक काढण्याचे समितीने जाहीर केले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास संपूर्ण परिसरात त्याची चर्चा होणार हे नक्की, कारण या समितीत कोणाही राजकीय नेत्याला स्थान नसल्याने सर्वसामान्यांमध्‍ये खरा उत्साह दिसून येत आहे. या भव्य फेरीबद्दल खूपच कुतूहल व उत्‍सुकता लागून राहिली आहे. मांद्रेत इतका मोठा कार्यक्रम होतोय, मग आपल्याकडे का नाही? अशी चर्चा अन्‍यत्र चहाच्या टपऱ्यांपासून ते पार, सभांपर्यंत रंगू लागल्‍या आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर आपणही पुढच्या वर्षी असाच उपक्रम राबवू , असे काहीजण आताच बोलू लागले आहे. ∙∙∙

पैसे परत मिळाले म्हणजे प्रश्‍‍न सुटतो का?

माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी ‘विद्यमान मंत्री पैसे मोजण्यात दंग आहेत, एका मंत्र्याने तर आपल्‍याकडून लहान कामासाठी १५ ते २० लाख रुपये घेतले’ असा सनसनाटी आरोप करून भाजपच्या गोटात खास करून मंत्र्यांमध्ये खळबळ उडवून दिली. मात्र त्‍यामुळे मडकईकर भाजपचेच असल्याने विरोधी पक्षांना सरकारवर तुटून पडण्याची आयतीच संधी मिळाली. आता ‘मडकईकर यांना २० लाख परत मिळाले’ अशा बातम्या छापून आल्या. हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु पैसे परत मिळाले म्हणजे प्रश्‍‍न सुटतो का? लाच देणाराही अपराधी नाही का? असे प्रश्‍‍न विजयबाब विचारतात. तमाम गोंयकारांचेही हेच प्रश्न आहेत का? ∙∙∙

दामू यांचा लिफाफा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी एक लिफाफा त्यांच्या हाती सोपवला आहे. त्या लिफाफ्यात काय दडले आहे याविषयी उत्सुकता होती. आता दिल्लीत चकरा मारणाऱ्या नेत्यांना राज्यात मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना भेटा असा सल्ला दिला जाऊ लागल्याने त्या लिफाफ्यात अनेकांच्या कुंडल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दामू हे प्रत्येकाशी हसतमुखाने वागतात, मात्र साऱ्याच्या मुळाशी पक्षहित असते. त्यामुळे पक्षहितासाठी कोणत्या कडवट गोष्टी त्यांनी लिफाफ्याच्या रूपाने संतोष यांच्या कानी घातल्या असतील याचा केवळ आता अंदाज लावला जात आहे. ∙∙∙

तुये इस्‍पितळ रुग्‍णांसाठी की नेत्‍यांच्‍या भाषणासाठी?

पेडणे तालुक्यात अलीकडे एक कुजबूज ऐकायला मिळतेय व ती म्‍हणजे, लोकांच्या तोंडाला पाने पुसण्‍यात आमदार व्यस्त आहेत. आठ वर्षांपूर्वी उभारलेले तुये इस्पितळ अजूनही सुरू झालेले नाही आणि याचं खापर मात्र सरकारी पाठपुराव्यावर फोडलं जातंय. आमदार म्हणतात, आम्ही पाठपुरावा करत आहोत!. पण नेमका कुठे पाठपुरावा होतोय, हे मात्र कुणालाच कळत नाही. सरकारी कागदपत्रांमध्ये इस्पितळाचे काम ‘कागदी डोस’ घेतंय आणि प्रत्यक्षात लोकांना गोमेकॉ किंवा जिल्हा इस्पितळाकडे जावं लागतंय. मात्र पेडणेतील दोन्‍ही आमदारांच्या शब्दकोशात ‘तुये इस्पितळ’ हा शब्द दिसत नाही. आता तर लोक म्हणतात, बाहेर फलक लावा की, ‘तुये इस्पितळ केवळ नेत्यांच्या भाषणांसाठी’!∙∙∙

कुंकळ्ळीत मिळाला ‘बळीचा बकरा’

‘लंबी रेस का घोडा’ हा वाक्प्रचार आपण ऐकला असणार. भाजपने म्हणे कुंकळ्ळी मतदारसंघात पुढील विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक सक्षम उमेदवार शोधला आहे. त्‍याला म्हणे पक्षाने काम करण्याची मोकळीक दिली आहे. पक्षाचे कार्य मतदारसंघातील प्रत्येक मतदारापुढे नेण्याबरोबरच पक्षसंघटना बळकट करावी व त्या दृष्टीने काम करण्याचा आदेश त्‍या संभाव्य उमेदवाराला दिला आहे. विशेष म्‍हणजे तोसुद्धा त्‍याच दिशेने कामाला लागला आहे. आपला विजय तो आत्तापासूनचं निश्‍चित मानू लागलाय. कारण त्‍याला म्‍हणे कुंकळ्ळीत कमळ फुलवून दाखवायचेच आहे. शिवाय दिल्लीतील नेत्‍यांचे लक्ष वेधून घ्‍यायचे आहे. आता तो ‘पराक्रम’ करतो की ‘बळीचा बकरा’ ठरतो हे समजेलच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT