Goa Politics: खरी कुजबुज; मडकईकरांचा कावा

Khari Kujbuj Political Satire: पर्वरीच्या खाप्रेश्वर देवस्थान परिसरातील इतरत्र हलवण्यात आलेला वटवृक्ष जगेल की नाही, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
Goa Latest Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

मडकईकरांचा कावा

भाजपचे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी राज्‍यातील मंत्र्यांनी लुटमार चालवली आहे, असा आराेप करून काहीसे गोंधळाचे वातावरण तयार केले असले तरी एकंदर सर्व स्‍थिती पहाता, भाजपातील स्‍वत:चे महत्‍व वाढवून घेण्‍यासाठी त्‍यांनी केलेला हा कावा याच दृष्‍टिकोनातून सर्वजण त्‍याकडे पहात आहेत. वास्‍तविक मडकईकर हे मंत्री असतानाही त्‍यांच्‍यावर असे कित्‍येक आरोप झाले. मडकईकर यांनी राजेश फळदेसाई यांच्‍यावरही तोंडसुख घेताना, बाहेरून आणलेल्‍या आमदारांमुळे भाजपचे गोव्‍यात पतन होऊ लागले आहे,अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. मात्र एकेकाळी स्‍वत:ही असेच बाहेरून आपण भाजपात आलो होतो, याचा विसर त्‍यांना कसे बरे पडला असावा? ∙∙∙

देवाचे झाड ते!

पर्वरीच्या खाप्रेश्वर देवस्थान परिसरातील इतरत्र हलवण्यात आलेला वटवृक्ष जगेल की नाही, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. पणजीत स्थानांतर करण्यात आलेला वृक्ष जगला नसल्याने तशी शंका घेतली जात आहे. शास्त्रीय पद्धतीने स्थानांतर करण्यात आल्याने वटवृक्ष जगला पाहिजे, असे सर्वांनाच वाटते. वटवृक्ष हा पुरातन आहे आणि श्रद्धा त्याच्याशीच निगडीत आहेत. त्यामुळे वटवृक्ष जगणार का, असे विचारल्यावर ते देवाचे झाड आहे, असे स्थानिक आमदार या नात्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले आहेत. ∙∙∙

जबाबदारी सर्वांचीच

पर्यटकांना अतिथी म्हणूनच वागणूक दिली पाहिजे. ‘अतिथी देवो भव’ असे आपले ब्रीद आहे. याचे भान पर्यटन क्षेत्रातील सर्वांनीच ठेवावे, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. किनारी भाग स्वच्छ ठेवावा, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या आहेत. एका ठिकाणचा कचरा दुसऱ्या ठिकाणी नेऊन फेकण्यातून प्रश्न सुटणार नाही, असे सांगण्यासही मुख्यमंत्र्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. येत्या तीन वर्षात पर्यटन क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करून देऊ पण कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सुरक्षित पर्यटनस्थळ ही ओळख पुसली गेली तर त्याचा फटका सर्वांना बसेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ∙∙∙

‘कुजबूज’चा इफेक्ट, गेट झाले बंद!

‘खरी कुजबूज’चा इफेक्ट लवकर दिसून येतो. असे म्हणतात की बातम्यांपेक्षा अनेकांची पहिली पसंती ‘खरी कुजबूज’ या स्तंभाला असते. त्यामुळे एखाद्या प्रश्नावरून कुजबूज प्रसिध्द झाली की लगेच सरकारी यंत्रणा खडबडून जागी होते व त्या प्रश्नावर पावले उचलली जातात. गत आठवड्यात मडगावांतील पूर्व बगलरस्त्यानजिक असलेल्या मलनिस्सारणाच्या कार्यालयीन इमारतीकडे संबंधितांचे झालेले दुर्लक्ष या मुद्दयावर कुजबूज प्रसिध्द झाली. त्यांत या इमारतीच्या आवाराचे फाटक सुट्टीच्या दिवशीही कसे सताड उघडे असते, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. अन् नवलाची गोष्ट म्हणजे सोमवारपासून सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर ते बंद होऊ लागले. या कार्यालयात संबंधित कर्मचारी असतानाही फाटक बंद करण्याची तसदी कोणीच घेत नव्हता, हेही त्यांतून उघड झाले. आता इमारत आवारात साफसफाई करणे , इमारतीवर वाकलेली झाडे कधी हटविली जातात, त्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. सरकारची अन्य कार्यालये हायफाय होत असताना हे कार्यालय दुर्लक्षित का, याचे मात्र अन्य कोणाचे नव्हे तर तेथीलच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

निवेदन देणारे भाविक?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या भेटीसाठी आमदार रोहन खंवटे यांनी काही सुकूर पंचायतीचे सदस्य आणि ‘भाविक’ मंडळींना घेऊन बुधवारी शासकीय बंगल्यावर हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत देव खाप्रेश्वर मंदिर बांधून देण्याचे आश्वासन मिळाले आणि भाविकांनी निवेदनही दिले. पण खरी मजा तर तिथूनच सुरू झाली. जे भाविक रविवारी घटनास्थळी दिसले ते भाविक मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना दिसलेच नाहीत, असे पर्वरीतील लोकच बोलतात. खाप्रेश्वर मंदिरासाठी रात्रंदिवस झटणारे, वटवृक्षासाठी आर्त कळवळा करणारे, त्याच्या पाळांना पाणी घालणारे खरे भाविक तिथे दिसलेच नाहीत, असे पर्वरीतील स्थानिकच चर्चा करू लागलेत. मुख्यमंत्री भेटीनंतरचा फोटो व्हायरल होताच, या चर्चेला अधिकच उधाण आले. ∙∙∙

पेयजलाचा वापर बांधकामासाठी?

सरकारने लोकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ‘साबांखा’पासून पेयजल हा विभाग अलग करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्या नंतर तरी पाणीपुरवठा सुरळीत होणार का, असा प्रश्न मात्र लोकांना अजूनही पडलेला आहे. त्या मागील कारण राज्यात सर्व भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे व त्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या नळांतून येणाऱ्या पाण्याचा सर्रास वापर, कायद्याने बांधकामासाठी ‘साबांखा’च्या नळाच्या पाण्याचा वापर केला गेला तर त्यासाठी पाणीपट्टीचा दर जास्त आहे. पण तशी पाणीपट्टी म्हणे आकारलीच जात नाही, दुसरीकडे एखादे नवे बांधकाम सुरू करताना प्रथम नळाची जोडणी घेतली जाते व भल्या मोठ्या टाक्यांत नळाचे पाणी भरून ते बांधकामासाठी वापरले जाते. असे सांगतात की, गोव्यात विशुध्द पाणीपुरवठा केवळ उद्योगांना केला जातो. नळातून जे पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते ते प्रक्रिया केलेले व त्या प्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो. वास्तविक हे पाणी बांधकामाबरोबरच बगिचांना सुध्दा वापरता येत नाही, पण सरकार त्या बाबत गंभीर नसल्याने प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच गैरवापर सुरू आहे. निदान बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठी अधिक शुल्क लावता येते पण बांधकाम व्यवसायाशी मोठाली धेंडे असल्याने हे दुर्लक्ष होते असे ‘साबांखा’चे लोकच म्हणतात. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: मडकईकर हे संतोष यांच्यापर्यंत पोचले कसे? 20 लाखांच्या लाच आरोपावरून रंगला कलगीतुरा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राजकारण की सत्य?

जमीन बळकावप्रकरणी सुलेमान सिद्दिकी याने पुन्हा बॉम्ब टाकला. यावेळी हस्ताक्षर असलेले कागदपत्र त्याने पत्रकारांच्या दिशेने टाकले, जेव्हा त्याला कोर्टात बुधवारी आणले होते. पण प्रश्‍न असा पडतो की, पेपर सिद्दिकीकडे आले कसे? आणि पोलिसांनी मुद्दामहून त्याला मोकळीक दिली की, पोलिसांचा निष्काळजीपणा! जर निष्काळजीपणा असेल,तर एस्कॉर्ट केलेल्या पोलिसांचे निलंबन नक्की! या पत्रात सिद्दिकीने उपसभापतींच्या नावाचा पुन्हा उल्लेख केला आहे. त्यामुळे याला महत्व प्राप्त होते. याविषयी आमदार काय उत्तर देतात, हा नंतरचा भाग. पण सिद्दिकी याला हे पेपर फेकण्यासाठी मुद्दाम मोकळीक दिली होती?, की सत्ताधारी पक्षातील काहींना जोशुआ यांना टार्गेट तर करायचे नाही ना? असे काही प्रश्न निर्माण होतात. खरे काय व खोटे काय, हे समोर येईलच. पण या घेटनेमुळे काहीही न करता, ‘सुंठीवाचून खोकला गेला’ अशी संधी जोशुआ यांच्या विरोधकांना सिद्दिकीच्या स्वरूपात आयती मिळाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही... ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: शीशे के घरों में रहने वाले...; 20 लाखांच्या लाच आरोपावरुन मंत्री माविन यांचा मडकईकरांना सूचक इशारा

आता शाळेत कॅनव्हास बूट घाला!

आपले सरकार आता पर्यावरणाच्या बाबतीत बरेच सक्रिय झाले आहे, असे दिसते. सरकार स्वतः पर्यावरणाबाबतीत खरोखरच गंभीर आहे की नाही हा प्रश्न वेगळा. मात्र, आता सरकारने शालेय मुलांना कॅनव्हास बूट सक्तीचे केले आहेत.पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी चामड्याचे किंवा इतर रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे बूट विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थिनींनी वापरू नयेत केवळ कॅनव्हास बूट घालावेत, असा आदेश सरकारने काढला आहे.आता याला ही पालकांकडून व शिक्षक संघटनाकडून विरोध झाला नाही, म्हणजे झाले! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com