Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

Khari Kujbuj Political Satire: महाविद्यालयासाठी जमीन उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे गोवा पशुवैद्यकीय महाविद्यालय आता दृष्टीपथात आल्यातच जमा आहे. ∙∙

गोमन्तक डिजिटल टीम

घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

फातर्पा पंचायतीचे माजी पंच दीपक फळदेसाई यांना सगळे लोक ‘घोडा’ ह्याच नावाने ओळखतात. त्याचे कारण जरी वेगळे असले तरी या दीपकरावांचे वागणे पाहिल्यास त्यांना अबलख घोडाच म्हणावे अशा उदार स्वभावाचे. केपेचे माजी आमदार तथा माजी उप मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांना लोक ओळखतात. मात्र सध्या बाबू आणि घोडा यांच्यामधील सख्य कमी झाले आहे, असे वाटते. याचे कारण म्हणजे, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांचा वाढदिवस. एल्टन आणि घोडा एकाच गावचे त्यामुळे एल्टनच्या वाढदिवसाला घोडा उपस्थित होता. त्याची खबर म्हणे कवळेकर यांच्यापर्यंत पोहोचल्यावर कवळेकर यांच्या जवळच्या माणसांनी एल्टनचा केक बरा वाटला का, असा प्रश्न त्यांना विचारला. या अपमानामुळे घोडा सध्या खवळलेला असून त्यांनी म्हणे आता काँग्रेसमध्येच जाण्याचे ठरविले आहे. आता त्यामुळे हा ‘घोडा’ आता कसा उधळेल ते पाहावे लागेल! ∙∙∙

पशुवैद्यकीय महाविद्यालय दृष्टीपथात

कृषी महाविद्यालयाच्या पाठोपाठ आता सरकार पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी काम करत आहे. त्या महाविद्यालयासाठी १४५ पदे भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. याआधी महाविद्यालयासाठी जमीन उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे गोवा पशुवैद्यकीय महाविद्यालय आता दृष्टीपथात आल्यातच जमा आहे. ∙∙∙

बायणा दरोड्यातून घ्यावयाचा बोध

तब्बल आठवड्याभरानंतर का होईना बायणा येथील गजबजलेल्या भागातील बहुमजली इमारतीतील सातव्या मजल्यावरील सदनिकेत पडलेल्या धाडसी दरोड्यातील सर्व संशयितांना पोलिसांनी पकडले आहे व गोव्यातही आणले आहे. ते सगळे ओडिशामधील असून सदनिकावाल्यांच्या परिचयाचे असल्याचे तपासात आढळून आले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी पळविलेले सगळे दागिने हस्तगत झाले आहेत. पण मुद्दा तो नाही. हे परप्रांतीय गुन्हेगार इतक्या सहजपणे उजळ माथ्याने वावरत असताना घर मालकांना तसेच पोलिस यंत्रणेलाही कधीच त्यांचा संशय कसा आला नाही, त्यांच्या पूर्वपीठिकेची माहिती पोलिसांनी मिळविली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. ∙∙∙

जास्त कौतुक नको!

दक्षिण गोव्यातील बायणा येथील दरोडा आणि उत्तर गोव्यातील सांताक्रूझमधील चोरीचा काही तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे पोलिसांचे कौतुकच. मात्र, या कामगिरीचे किती कौतुक करावे, यावरही काहीतरी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. कारण यापूर्वी घडलेल्या दरोड्यांत पोलिसांना अजूनही आरोपी पकडता आले नाहीत. त्याचे दुःख आणि शल्य पोलिसांनी नेहमीच मनाला टोचले पाहिजे आणि बाळगले पाहिजे. दोना पावला व म्हापसा येथील दरोड्याचे मुख्य सूत्रधार कुठे आहेत, हे पोलिसांना शोधता आलेले नाहीत. त्याशिवाय मांद्रेतील डोंगरकापणीवरून झालेल्या खुनाचाही तपास त्याच दिशेत फिरत आहे. त्यामुळे पोलिसांनी ज्या काही कारवाया केल्या, त्या केवळ हवेत बाण मारण्याचाच प्रकार असावा असे वाटते. त्यामुळे एखाद्या तपासात यश आले तर पाठ थोपवून घेण्यापेक्षा इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास तडीस नेण्यावर लक्ष केंद्रीत करावे, एवढेच. ∙∙∙

चित्र वेगळे होते

दोनच दिवसांपूर्वी मुरगाव पोलिस स्थानकासमोर स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या कार्य पद्धती विरोधात आंदोलन केले होते. पोलिसांनी वाढते गुन्हे रोखावेत, या मुख्य अशा मागणीबरोबरच बायणा येथे घडलेल्या सशस्त्र अशा दरोड्यातील संशयित दरोडेखोरांना पोलिस पकडू न शकल्याबद्दल त्या आंदोलनात आक्रोश व्यक्त करण्यात आला होता. गुरुवारी मात्र त्याच जागी वेगळे चित्र दिसले. तोवर दरोडेखोर गजाआड झाले होते. त्यामुळे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी पोलिसांचे भरभरुन कौतुक करून त्यांना पोलिसांना यथोचित सन्मानित केले. त्यावेळी पोलिसांना जाब विचारण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पुढे आलेले आता कुठे होते, अशी चर्चा मात्र दबक्या आवाजात का होईना, ऐकू येत होती. ∙∙∙

...अन् चर्चिलचा कपाळावर हात

काही दिवसांपूर्वी कोणकोणातील सोनाराचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरी होतानाच पोलिस तेथे पोहोचले. पण त्यांनी पोलिसांवर दगडफेक करुन तिथून पळ काढला, या संदर्भात पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री व माजी आमदार, खासदार वार्काचे पात्रांव चर्चिलबाबना विचारले तेव्हा त्यांनी कपाळावर हातच मारला. पोलिसांवर चोरांनी दगडफेक करणे ही गंभीर बाब आहे असे ते म्हणाले, चोर किती म्हणून काम करणार. ते भाबडे दिवस रात्र काम करतात, असे ते म्हणाले. पोलिसांनी चोरांना पकडून मारले तर आवाज होतो. चोरांना पकडले नाही तरी पोलिसांच्या विरोधात आवाज होतो. ती सुद्धा माणसेच ना, असे म्हणून त्यांनी एकंदर सारवासारव केली. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी पोलिसांच्या विरोधात ब्र काढला नाही. मुख्यमंत्र्यांचेही चर्चिल बाबाना बरेपण हवे ना, अशी चर्चा लगेच सुरू झाली. ∙∙∙

तक्रार देऊन गप्प बसावे का?

बायणातल्या दरोड्याचे कोडे तर पोलिसांनी जवळपास उलगडले म्हणे! एकच आरोपी उरला आणि तोही आता पकडला जाणार आहे, अशी हमी पोलिसांनी दिली आहे. हीच गती इतर प्रकरणांबाबत का दाखवली जात नाही? असा प्रश्न लोकांच्या मनात आता येत असेल तर त्यात चूक काय? त्यात आता पोलिस महासंचालकांनी लोकांना आवाहन केलेय की, प्रकरणाच्या प्रगतीबद्दल विचारू नका!, आरोपी सतर्क होतात. गुन्हा झाला की, आपण तोंडात बोळा घालून बसायचं का? आणि पोलिसांना काहीच विचारू नये का, असे नानाविध प्रश्न आज लोकांच्या मनात घोळत आहेत. म्हणजे पुढच्या वेळी चोरी झाली तर तक्रार द्यावी, आणि ‘सायलेन्स मोड’ वर घरी गप्प बसायचे का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बोरी पूल वाहतुकीस दोन दिवस राहणार बंद

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT