वास्को, आजच्या वेगवान युगात आपले स्वप्न पूर्ण करून आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी कुठल्याच प्रकारचा शॉर्टकट नाही.
स्वप्न साकारायचे असल्यास विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे. कठोर परिश्रम हाच यशप्राप्तीचा खरा मार्ग आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
वास्को रवींद्र भवन बायणातर्फे मुरगाव तालुक्यातील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मार्गदर्शक प्रवीण सबनीस, बायणा रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई आणि मान्यवर उपस्थित होते.
बायणा रवींद्र भवनने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले.
आज आम्ही स्पर्धात्मक युगात असून, येथे विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, असे आमदार कृष्णा साळकर म्हणाले. या कार्यशाळेला मुरगाव तालुक्याच्या विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी बनण्यासाठी १७ वर्षे परिश्रम
मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, कुठलीही चांगली गोष्ट घडण्यासाठी वेळ लागतो. संयम बाळगून परिश्रम घेणाऱ्याला भविष्यात नक्कीच यशाचे गोड फळ मिळते. ज्या जागेवर आज मी पोहोचलो, तेथे पोहोचण्यासाठी मला १७ वर्षे परिश्रम घ्यावे लागले.
रवींद्र भवनने आयोजित केलेल्या ''करिअर गाईडन्स'' कार्यशाळेचा उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यात चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.