Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: कोविडनंतर वाळपई आठवडा बाजाराला मिळतंय स्थैर्य

व्यापारी वर्गात वाढ: भाजी,फळे, अन्नधान्याबरोबरच विविध साहित्य उपलब्ध

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News वाळपई येथे साप्ताहिक भरणारा मंगळवारचा बाजार हा वाळपई शहर तसेच ग्रामीण भागासाठी फायद्याचा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाळपईत मंगळवारी आठवडा बाजार भरत आहे. पूर्वी हा बाजार मासोर्डे गावात जाणाऱ्या एकाच रस्त्यावर भरत होता.

सर्व प्रकारचे व्यापारी एकाच रस्त्यालगत बसून व्यवसाय करीत होते. पण मागील दहा वर्षापासून या बाजाराचे विभाजन केल्याने बाजाराला सुरळीतपणा आला आहे. कोविडकाळात विस्कळीत झालेला बाजार पुन्हा सुरळीत सुरू असून बाजाराला स्थैर्यप्राप्त झाले आहे.

बाजारात भाजी,फळे, अन्नधान्याबरोबरच विविध साहित्य उपलब्ध होत आहे. मासोर्डे गावच्या रस्त्यावरील मार्गावर केवळ कपडे, चप्पल, बॅगा या व्यावसायिकांना जागा दिली आहे. तर फळे, भाजी व्यावसायिकांना वाळपई पालिका मैदानाच्या ठाणे रस्ता मार्गावरील रस्त्यालगत बसविले आहे.

त्यामुळे बाजाराच्या विभाजनामुळे वेगळपणा जाणवत आहे. त्यातून स्थैर्यपणा आला आहे. परंतु वाढत्या बाजारासाठी वेगळ्या बाजार संकुलाचा विचार आवश्यक आहे, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

वाळपईच्या आठवडी बाजाराचे दोन्ही बाजूला विभाजन गेल्या काही वर्षापासून झाल्याने बाजाराला सुटसुटीतपणा आला आहे. तरीही विशेष करून बाजार भरलेला असताना मधूनच दुचाक्या नागरिकांकडून नेल्या जातात.

तसेच भटक्या गुरांचाही संचार बाजारपेठेत असतो. अशावेळी व्यापारी व्यावसायिकांना त्रास होतो आहे. यावर उपाय म्हणून वाळपई आठवड्याच्या बाजाराला नवे रूप देण्याची गरज आहे. तसे झाले तर चांगली सुविधा सर्वांना प्राप्त होणार आहे.

यावर मात करण्यासाठी वाळपई पालिकेने चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2018 महिन्यात मासोर्डे मार्गावर एका जागेची पाहणी केली होती. त्या जागेत नवीन बाजार संकुल उभारण्याच्या हालचाली केल्या होत्या. त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे.

आठवडा बाजार सुसज्ज अशा जागेत होऊ लागला, तर वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

मासोर्डे मार्गावर सुमारे अडीच हजार चौ. मी. जागेची पहाणीही त्यावेळी प्रशासनाने केली होती. हा प्रकल्प जर प्रत्यक्षात उतरला तर बाजाराला वेगळे रूप मिळणार आहे.

सध्या जे व्यावसायिक वाळपईत उघड्या जागेत बसून व्यवसाय करीत आहेत. त्यांना कोणत्याही सुविधा नाहीत, अशी स्थिती आहे. मुख्यतः शौचालय व पाण्याची सोय आवश्यक आहे.

कारण परराज्यातून दूरवरून बरेच व्यावसायिक वाळपईत येतात. त्यांना गटारांच्या लाद्यांवर बसून व्यवसाय करावा लागतो आहे.

वाळपईचे नागरिक देवेंद्र गावकर म्हणाले, नवीन बाजार संकुल बांधले गेले, तर त्या ठिकाणी सुविधा देता येणार आहे. त्यात शौचालयाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, हातपाय धुण्याची सोय आदी गोष्टींची पूर्तता करणे शक्य होणार आहे.

यातून वाळपईतील मुख्य रस्ते मोकळे राहतील. वाळपई शहराला जुना इतिहास आहे. व्यवसायात वाढ होत आहे.

...पाठपुरावा करणार!

नगराध्यक्ष शेहझीन शेख म्हणाल्या, वाळपईचा मंगळवारचा आठवडा बाजार ग्रामीण भागासाठी मुख्य केंद्र बिंदू ठरलेला आहे. व्यापारी वर्गांचे दोन ठिकाणी विभाजन केल्याने बाजारात सुटसुटीतपणा आलेला आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे मंडळ कार्यरत असून बाजाराला भविष्यात चांगले आणखीन दिवस येण्यासाठी निश्चितच पाठपुरावा केला जाणार आहे.

विक्रेत्यांची संख्या वाढली : दिवसेंदिवस या आठवडी बाजारात येत असलेल्या विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ताण प्रचंड वाढला आहे. ताडपत्रीच्या आधारावर रस्त्यालगत गटारांवर बसविलेल्या लाद्यांवर विक्रेते बसत आहेत.

या लाद्या विक्रेत्यांना आधार बनला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातून विक्रेते वाळपईत मंगळवारी दाखल होतात. बाजारातील अर्थकारण बदलत आहे. पूर्वी कमी प्रमाणात 50 ते 60 विक्रेते येत होते.

आता ही संख्या दोनशेहून अधिक वाढलेली आहे. पूर्वी दुकान व्यावसायिक देखील कमी होती व आता दुकाने वाढलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Sudarsan Pattnaik: 'तर गोव्यात अनेक वाळू शिल्प कलाकार घडतील'! पद्मश्री सुदर्शननी केले गोवन संस्कृतीचे कौतुक, म्हणाले की..

Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

SCROLL FOR NEXT