वाळपई: म्हणतात ना.. गरज ही शोधाची जननी आहे. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एका बळीराजाने सहकारी शेतकऱ्यांना ‘टेक्नो’ बनवण्याचे ध्येय बाळगले असून त्याची ध्येयपूर्तीसुद्धा केली. हेदोडे-वाळपई येथील अशोक जोशी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सुपारी सोलर (पिलिंग मशिन), श्रेडर आणि ‘कॅश्यू ॲपल सेपरेटर’ अशी यंत्रे बनविली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या सर्व यंत्रांना ‘आयसीआर’ची मान्यता असून त्यांना गोवा सरकारचे अनुदानही उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता मी ही यंत्रे बनविली आहेत. आत्तापर्यंत ३०० हून पिलिंग मशिन्स विकल्या आहेत. अजूनही ऑर्डर येत आहेत. राज्यात दिवसेंदिवस सुपारीचे क्षेत्र वाढत आहे, मात्र सुपारी सोलणारेच नाहीत. पारंपरिक पद्धतीने सुपारी सोलण्याची प्रथा आता बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मशिन्सशिवाय पर्याय नाही. त्यातच इतर पिकांना रानटी जनावरांचा धोका वाढला असून शेतकरी सुपारी उत्पादनाकडे वळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गरज म्हणून मशिन्स तयारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचे जोशी यांनी सांगितले.
मी गेल्या आठ वर्षांपासून मशिन्स बनवत आहे. राज्यात आम्ही सुपारी सोलर बनवणारे तिघेच आहोत. सुरवातीला कल्पनेतून प्रत्यक्षात मशिन्स तयार करणे खूप आव्हानात्मक होते. कारण मी एक साधा शेतकरी असल्याने तांत्रिक अडचणी खूप होत्या. केवळ अडचणी इतरांना सांगून चालणार नाही. त्यातून मार्ग काढावा लागतो याची जाण असल्याने मी मशिन बनवण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नानंतर त्याला यश मिळाले. निश्चितच, माझे हे प्रयत्न कृषी क्षेत्राला आधुनिक बनवण्यास मदतीचे ठरतील, असे जोशी यांनी सांगितले.
अरेकॅनट पिलिंग मशिन्स (सुपारी सोलर) : यात दोन प्रकारच्या मशिन्स आहेत. एक दीड हाऊस पॉवर आणि दुसरी दोन ‘एचपी’ची. पहिली मशिन्स ही तासाला ५० ते ६० किलो सुपारी सोलते. दुसरी तासाला ९० ते १०० किलो सुपारी सोलू शकते. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्टही वाचतात.
श्रेडर : माड तसेच इतर झाडांच्या फांद्यांची पावडर बनवण्याचे काम हे मशिन करते. पावरचे कंपोस्टिंग चांगले केले जाते. जमीन सुपीक बनवण्यास ही पावडर उत्तम आहे. कारण त्यापासून गांडूळखताची निर्मिती होते. त्यामुळे या मशिनला मागणी वाढत आहे.
कॅश्यू ॲपल सेपरेटर : काजू आणि बोंडांचे वर्गीकरण करण्यासाठी या मशिनचा वापर होतो. बोंडे पिळणे आणि त्याचा चोथासुद्धा या मनिशमुळे होतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने काजू तयार करण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे मशिन्सही उपलब्ध असून त्यासही मागणी वाढत आहे.
कार्बन पोल : कार्बन पोल सध्या गोवा बागायतदाराकडे उपलब्ध आहे. हा ६० फूट उंच असून त्याद्वारे औषध फवारणे आणि हार्वेस्टिंग करता येते. शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे काम मी करतो. आता शेतकरी या पोलचाही वापर करत आहेत, असे जोशी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.