मडगाव: ‘उटा’च्या प्रेरणा यात्रेत बाळ्ळी जळीत कांडातील हुतात्मा मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांचे पुतळे होते. हे, पुतळे वापरण्याची परवानगी कुटुंबीयांपैकी कुणाकडून घेतली का, असा सवाल कै.मंगेश गावकर यांच्या कुटुंबीयांनी उटा नेत्यांना केल्याने प्रेरणा यात्राच वादात सापडली आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात फर्मागुढी येथे होणाऱ्या ‘उटा’च्या द्विदशकपूर्ती सोहळ्याच्या जनजागृतीसाठी दहा दिवसीय अखंड प्रेरणायात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेची सुरवात परवा (२७ रोजी) गावडोंगरीतून मंत्री गोविंद गावडे यांनी बावटा दाखवून केली होती.
या यात्रेच्या उदघाटनाच्या काही क्षणापूर्वी, कुटुंबीयांकडून सर्वांसमोर ही विचारणा झाल्याने, ‘उटा’चे पदाधिकारी मृत मंगेशाच्या कुटुंबीयांना गृहीत धरतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याविषयी गावकर कुटुंबीयाशी संपर्क साधला असता, तूर्त आम्हाला काय सांगयचे होते ते आम्ही ‘उटा’वाल्यांना सांगितले आहे. आता आम्ही याविषयी अधिक बोलू इच्छित नाही, पण योग्यवेळी नक्कीच पत्रकार परिषद घेऊन आमच्या दुखावलेल्या भावना जनतेसमोर मांडू, असे त्यांनी सांगितले.
तेथे आलेल्या गावकर कुटुंबीयांनी सर्वप्रथम ‘उटा’चे कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे यांना जाब विचारला, तर त्यांनी त्यांना, जे काही विचारायचे आहे ते अध्यक्ष प्रकाश वेळीप यांना विचारा असे सांगितले. ते प्रकाश वेळीप यांच्याकडे गेले. तसे त्यांनी थातुर मातूर उत्तरे देत, यावर नंतर बोलूया, असे सांगून वेळ मारून नेली. हा अगदी संवेदनशील मुद्दा समोर येऊनही तेथे उपस्थित मंत्री गावडे त्यांचाशी काहीच का बोलले नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेरणा यात्रेसाठी ‘उटा’ आंदोलनातील हुतात्मे मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांचे नाव वापरण्यास मला काहीच वावगे वाटत नाही. आणि त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेतली नाही, या अक्षेपातही काही अर्थ नाही. दरवर्षी आम्ही या दोन्ही हुताम्यांच्या प्रीत्यर्थ प्रेरणा दिवस पाळतो. त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी कुणी घेतली आहे का ? मग त्यावेळी का आक्षेप घेतला गेला नाही. या दोन्हीं दिवंगत युवा नेत्यांचे बलिदान आमच्यासाठी महान आहे. म्हणूनच त्यांच्या नावाने आम्ही रॅली काढत आहोत आणि त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. कित्येक कार्यक्रमासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव वापरले जाते, त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची कुणी परवानगी घेते का?प्रकाश वेळीप , ‘उटा’ अध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.