Sudden Heavy Rain Inundates Panaji City
पणजी: राज्यात नैऋत्य मॉन्सूनने माघार घेतलेली असली, तरी राज्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच आहेत. त्यात कहर म्हणजे सोमवारी संध्याकाळी ६.४५ वाजता ढगफुटी सदृश बरसलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या तासाभरातच राजधानी पणजीत पाणीच पाणी झाले.
पणजीत १८ जून मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने अनेकांची तारांबळ उडाली. शहरातील काही भागांत दोनवेळा वीज जाण्याचे प्रकारही घडले. पणजीत रात्री ८.३० वा. पर्यंत तब्बल ७० मि.मी. म्हणजेच २.७५ इंच पावसाची नोंद करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव घेणाऱ्या पणजीकरांना सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावत सुखावणारा धक्का दिला. परंतु सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस यामुळे राजधानी पणजीत काही वेळातच रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडले व काही दुकानांत पाणी घुसले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याकडे उभ्या करून ठेवलेल्या दुचाक्या अर्ध्याअधिक बुडाल्या होत्या आणि पावसाचा वाढलेला जोर पाहता त्या वाहून जातील की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.
राज्यात नैऋत्य मॉन्सूनच्या माघारानंतर आत्तापर्यंत एकूण २७८.९ मि.मी. म्हणजेच १०.९८ इंच पावसाची नोंद झाली असून जी सरासरी मॉन्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत तब्बल ७६ टक्के आहे. राज्यात मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे, परंतु बुधवारी आणि गुरुवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
राज्यातून ४ ऑक्टोबर रोजी नैऋत्य मॉन्सूनने माघार घेतली. त्यानंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात सुरू आहे. हा ईशान्य मॉन्सूनच्या परिणामातून पडलेला पाऊस असून या काळात पडणाऱ्या पावसाची विशेषतः ही, की हा पाऊस प्रामुख्याने संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी पडतो.
डॉ. एम. आर. रमेशकुमार, शास्त्रज्ञ, एनआयओ (निवृत्त)
अवघ्या एक तासाच्या मुसळधार पावसाने शहराचा मुख्य भाग जलमय झाला आहे. ज्ञान नसलेल्या लोकांनी स्मार्ट सिटीचे नियोजन केले तेव्हा हे घडणे निश्चितच होते. आमचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी १९ जुलै २०२३ रोजी स्मार्ट सिटीचे भविष्य वर्तवले होते.
दुर्गादास कामत, महासचिव, गोवा फॉरवर्ड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.