भाजपचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष म्हणून दयानंद कार्बोटकर व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभाकर गावकर यांनी पदभार स्वीकारला. प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांनीही सूत्रे हाती घेतली. मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे, जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे व प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताना मावळत्या अध्यक्षांना मान देण्यात आला. त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र, त्याला अपवाद ठरले दक्षिण गोवा भाजपचे मावळते जिल्हा अध्यक्ष तुळशीदास नाईक. तुळशीदास यांनी सांकवाळ येथील प्रकल्पाला विरोध दर्शवला ज्या प्रकल्पाला मंत्र्यांचा आशीर्वाद होता. पण नाईक हे स्थानिकांसोबत राहिले. त्यांना एक दिवस पोलिस चौकीवरही जाऊन बसावे लागले. मात्र, पक्षाने ते जिल्हा अध्यक्ष असूनही त्यांना मदत केली नसल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेत्यांना याबद्दल विचारले गेले तेव्हा ते आता अध्यक्ष राहिले नाहीत, असे सांगण्यात आले. प्रभाकर गावकर यांनी दक्षिण गोवा जिल्हा समिती अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्या दिवशीही मावळत्या अध्यक्षांना आमंत्रण नव्हते. तेव्हा त्यांचा गौरव करण्याचे सोडाच. तुळशीदास नाईक हे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असूनही त्यांना अशी वागणूक मिळाली. हेच का ते भाजपचे वेगळेपण?, असे आता पक्षाचे कार्यकर्तेच विचारू लागलेत. ∙∙∙
सध्या नाट्य परीक्षक हा एक वादाचा विषय ठरू लागला आहे. परवा राजीव गांधी कला मंदिराच्या महिला नाट्य संगीत स्पर्धेत याचा प्रत्यय आला. मदनाची मंजिरी या नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले. मात्र, नाटकाच्या दिग्दर्शकाला एकही बक्षीस प्राप्त होऊ शकले नाही. या विरोधाभासाची रंगकर्मीच्या गोटात अजूनही चर्चा सुरू आहे. आता लवकरच कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धा सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेला तरी योग्य परीक्षक असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नियुक्त केलेल्या परीक्षकांचा ‘बायोडेटा’ जाहीर करावा, अशी मागणीही होऊ लागली आहे . इथं राज्य पुरस्कार विजेते बाजूला पडतात आणि भलत्यांचीच परीक्षक म्हणून वर्णी लावली जाते.. आणि मग असा ‘विचित्र’ निकाल लागलेला बघायला मिळतो. असे ज्येष्ठ रंगकर्मी बोलू लागले आहेत. ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही हो, काळ सोकावतो आहे, हेच शेवटी खरं नाही का? ∙∙∙
राज्यातील वीज खांबावरील लांबणाऱ्या इंटरनेट व टीव्ही केबल ऑपरेटर्सना सरकार व न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने चांगलाच दणका बसलाय. गेल्या दोन वर्षापासून त्यांना नियमांचे पालन करण्यास सांगूनही दुर्लक्ष केले गेले. मात्र, कारवाई सुरू होताच त्यांना जाग आली. वीज खांब तसेच झाडांवरून गेलेले केबल्स हे एकाच रंगाचे आहेत. त्यामुळे ते कोणत्या नेटवर्क पुरवठादाराचे आहेत हे त्यांनाच माहीत नाहीत. अशा स्थितीत दिलेल्या मुदतीत परवान्यासाठीच्या प्रक्रियेसाठी वेळच राहिलेला नाही. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आलेत. न्यायालयाने त्यांना कोणतीही दया न दाखवता उलट या केबल खांबावरून टांगलेल्या असल्याने घाणेरडे दिसते, असा टोलाही होणला होता. न्यायालय ते सरकार अशी धावाधाव करूनही त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. वीज खात्याने केंद्राच्या नियमानुसार कारवाई या महिन्यानंतर सुरू केल्यास त्याचा फटका या सेवा पुरवठादारांना बसणार हे नक्की. ∙∙∙
गोवा सरकारने तिसरा जिल्हा निर्माण करण्याबाबत खरेच गंभीरपणे निर्णय घेतला आहे की काय, त्या बाबत अजून काहीच स्पष्ट झालेले नाही. पण या तिसऱ्या जिल्ह्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीला मात्र आनंद झालेला असून नुकत्याच झालेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीने सरकारचे अभिनंदन केले आहे. कदाचित या जिल्हा निर्णयाच्या धर्तीवर लगेच गोव्यात आणखी एक जिल्हा पंचायत निर्माण केली गेली नाही म्हणजे झाले, असे जाणकार म्हणत आहेत. त्यांच्या मते जिल्हा पंचायतीच्या बैठकीत तसे विशेष काहीच होत नसते. त्यामुळे त्या बैठकीत तसे अभिनंदनाचेच ठराव होत असतात. कारण या संस्थांना तसे कोणते विशेष अधिकारही नसतात व त्यामुळे त्यांनी स्थापनेपासून तसे नाव घेण्यासारखे काही कामही केल्याचे दिसून येत नाही. नाही म्हणायला या संस्थांवर सरकारच्या मर्जीतील लोकांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची व्यवस्था मात्र झालेली आहे, असे आम्ही नव्हे तर हे जाणकारच म्हणत आहेत. ∙∙∙
सध्या नवी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा मोसम असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी तेथे आम आदमी पक्षाच्या गोव्यातील नेत्यांचा एक ताफा दाखल झाला आहे. वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली सहाजणांचा गट सध्या तेथे सक्रीय असून कडाक्याच्या थंडीत ते दाराेदारी जाऊन प्रचार करीत आहेत. दिल्लीत पुन्हा एकदा ‘आप’चे सरकार सत्तेत आले तर देशातील इतर भागातही हात पाय पसरविण्यासाठी ‘आप’ला त्याचा फायदा होणार हे गृहितक समोर ठेवून देशातील सर्व भागातील ‘आप’ कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. त्यात गोव्यातील हे ‘आप’ कार्यकर्तेही सामील झाले आहेत. ‘अब दिल्ली दूर नही’, अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत. ∙∙∙
जेव्हा आपल्या नावापुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे बिरूद लागते, तेव्हा भारदस्त वाटते. काही लोकांना अशी फुकटची बिरुदावली लावण्याची भारी हौस. आपल्या राज्यात वेगवेगळ्या जातींच्या संघटना आहेत. या सर्व संघटना स्थानिक पातळीवर आपल्या ज्ञाती बांधवांसाठी चांगले कामही करतात. मात्र, आता आपल्या राज्यात परराज्यातील ज्ञाती संघटना पाय पसरायला लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नावाच्या संघटनेने गोव्यात आपली शाखा उघडली असून नावात जरी अखिल भारतीय असले तरी उत्तर प्रदेशच्या हजरतगंज लखनौ येथे एका छोट्या फ्लॅटमध्ये चालत असलेल्या या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक महेश गांवकर याची नेमणूक केली आहे. काही का असेना महेशसाहेब एका संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनले, हेही नसे थोडके. ∙∙∙
आता वीजखात्याने या केबल्स हटविण्याची मोहीम हाती घेतली. ही मोहीम त्या केबल धोकादायक ठरल्या म्हणून राबविली की, वीजखांबांवर त्या टाकताना परवाना घेतला नाही,आवश्यक ते शुल्क भरले नाही, म्हणून घेतली असा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण वाटेल तशा या केबल टाकल्या व काही ठिकाणी त्यात अडकून अनेकांना अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे. कारण रस्त्यावरून चालताना काही ठिकाणी त्या डोक्याला स्पर्श करताना आढळतात. अनेकांचा असाही प्रश्न आहे की सुरवातीला त्या टाकतानाच त्या बाबत नियमावली करायला हवी होती, पण ती खबरदारी न घेतल्यानेच गोष्टी या थरावर गेल्या आहेत. अनेक भागांत म्हणे राजकीय नेत्यांच्या समर्थकांनीच केबल व्यवसाय सुरू केला आहे व त्यामुळे वीज यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर या व्यवसायात स्पर्धा होऊ लागली व त्यांतून ही मोहीम राबविली गेली. खरा मुद्दा आहे तो म्हणजे वीज खात्याचा परवाना घेतला की, या केबल धोकादायक ठरणार नाहीत का, हा आहे. त्याचे उत्तर खाते देणार का? ∙∙∙
भाजप हा एकेकाळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी ओळखला जात होता, परंतु गेल्या काही वर्षांत पक्ष आपल्या आयात केलेल्या कार्यकर्त्यांसाठी प्रसिद्ध झाला. पक्षात मोठ्या संख्येने पक्षांतर करून आमदार आल्याने त्यांनी आपल्या सोबत निष्ठावंत कार्यकर्ते आणले, परंतु ते पक्षाचे नव्हे त्या आमदारासाठीच. ही प्रक्रिया होत असताना पक्षासाठी रक्ताचे पाणी करणारे दुखावले गेले, याची प्रचिती दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत आली. आपला धनी दाखवील ती पूर्व दिशा असे हे आयात केलेले कार्यकर्ते असल्याने त्यांचा धनी ज्या दिशेने जाणार, त्याच वाटेने हे जाणार असल्याने याचा फटका पक्षाला बसणार असल्याची चर्चा ऐकू येते. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.