Goa Politics: खरी कुजबुज; प्रमोदजी वेळीच जागे व्हा!

Khari Kujbuj Political Satire: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोव्याबाबत कमालीचा जिव्हाळा असून गोव्याच्या प्रत्येक भेटीतील भाषणातून तो जिव्हाळा व कळकळ दिसून येते.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोदजी वेळीच जागे व्हा!

सडेतोड नितीन गडकरी केवळ व्यर्थ बडबड करीत नाहीत, तर पूर्ण ताकदीने काम करतात. गोव्यात रस्ते उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधींची मदत दिली आहे. झुवारी पुलावर दर्शक गॅलरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मंत्री गडकरी यांनी दिला होता. मात्र, या प्रकल्पासाठी वाहनतळ उभारण्यास जागा देण्याचे काम राज्य सरकारने अजून हाती न घेतल्याबद्दल मंत्री गडकरी संतापले. राज्य सरकारने व मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्प हाती घेण्यास दिलेले वचन पाळले नाही, याचा राग येणे स्वाभाविक म्हणून नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर ‘सरकार जागे व्हा’असा आदेश देण्याची वेळ आली. गडकरींचे बोल आपल्या मुख्यमंत्र्यांना झोंबले असतील. मात्र ते बोलले ते सत्य आहे. ∙∙∙

गडकरींची सूचना; पण गांभीर्य कुणाला?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोव्याबाबत कमालीचा जिव्हाळा असून गोव्याच्या प्रत्येक भेटीतील भाषणातून तो जिव्हाळा व कळकळ दिसून येते. परवा वास्कोतील उड्डाणपूल उद्‍घाटनाच्या कार्यक्रमातही त्याचेच प्रत्यंतर आले. त्यांनी प्रदूषण व अपघात मुक्त गोवा घडवा, असे आवाहन करतानाच महामार्गालगत होणारे अतिक्रमण व उभी रहाणारी बांधकामे याबाबत चिंता व्यक्त करून त्यावर कडक कारवाई करण्याची राज्य सरकारला सूचना केली. अशी बांधकामे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत, असे मडगावचे लोक म्हणतात. या संदर्भात पूर्व बगलरस्त्यानजिक हल्लीच्या काळात उभी राहिलेली व रहात असलेल्या बांधकामांकडे ते अंगुली निर्देश करतात. यापूर्वी मुंबईचे वाहतूक पोलिस प्रमुख पसरीचा यांनी या बांधकामाबाबत प्रश्‍न केला होता. काल गडकरी यांनी जी सूचना केली, ती त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यकर्ते व संबंधित अधिकारी खरेच गांभीर्याने घेतील का, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित झाला आहे. ∙∙∙

सुदिनराव सत्य तेच बोलले

‘मगो’शी दगाबाजी करणाऱ्या वा तो पक्ष सोडून गेलेल्यांची स्थिती दयनीय झाल्याची जी टिप्पणी मंत्री व त्या पक्षाचे प्रमुख नेते सुदिन ढवळीकर यांनी केली आहे, ती यथार्थ असून ‘समझनेवालेको इशारा काफी है’, असे ‘मगो’ समर्थक म्हणत आहेत. काहींच्या मते त्यांनी ही टिप्पणी जीत आरोलकर यांना उद्देशून केली आहे. पण ‘मगो’च्या स्थापनेपासूनचा इतिहास चाळला तर सुदिनराव म्हणतात, त्यात तथ्य असल्याचे म्हटले जाते. त्या काळांत भाऊसाहेबांपासून दूर गेलेले प्रमख नेते पाहिले वा नंतर ताईंच्या वेळी बंड केलेले वा त्या नंतरच्या काळात ‘मगो’शी फारकत घेतलेले सगळेजण आज राजकारणात कुठेच दिसत नाहीत. फारकत घेऊन अन्यत्र गेल्यानंतर काही काळ ते मंत्रिपदावर राहिले खरे, पण नंतर ते पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. याला केवळ अपवाद ठरले ते फोंड्याचे पात्रांव अर्थात रवीबाब. बाकीच्या कोणाचेही, मग ते खलप असोत, प्रकाश वेळीप असोत वा दयानंद नार्वेकर असोत, राजकीय क्षेत्रांत परत त्यांचा दबदबा राहिलेला नाही. त्यामुळे सुदिनरावांनी एकप्रकारे ‘मगो’ च्या उमेदवारीवर दावा सांगणाऱ्यांना एकप्रकारे पक्षाशी एकनिष्ठ राहिला नाहीत, तर राजकीय जीवनातून संपून जाल, असा इशाराच दिला आहे. असे असले तरी आजवरचा अनुभव पहाता किती जण तो इशारा गांभीर्याने घेतील, तोच प्रश्‍न असल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

राजेश फळदसाईंचे वाढते वजन!

काही दिवसांपूर्वी बायंगिणी कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पावरून चर्चेत असलेले कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भात विचार मांडताना विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांना काटशह दिला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू झालेली आहे. भाजपचाच उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे. एकिकडे ते भाजप जो कोणी उमेदवार ठरविल तो स्वीकारून त्याला पाठिंबा देऊ, असे सांगताना विद्यमान जिल्हा पंचायत सदस्याबाबत काही मत मांडणे हसत हसत टाळले. कुंभारजुवेच्या विद्यमान सदस्याने विधानसभेच्या निवडणुकीत कितपत प्रयत्न केले होते, याचाही जिल्हा पंचायत उमेदवार ठरवताना लेखाजोखा केला जाण्याची शक्यता आहे. अशा या स्थितीत आमदार राजेश फळदेसाई हे आपल्या मर्जीतील उमेदवाराला पुढे आणण्याची संधी सोडणार नाहीत, हे तितकेच सत्य आहे. सर्व निर्णय भाजपवर त्यांनी सोडले असले तरी अंतर्गत कारवाया करत ते आपली पोळी भाजून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मंत्री बाबुश मोन्सेरात यांना बायंगिणी प्रकरणावरून ठोशास ठोसा देणारे फळदेसाई यांचेही पक्षातील वजन वाढले की काय, अशी चर्चा आहे. ∙∙∙

ओल्‍ड ईज गोल्‍ड!

दामू नाईक हे भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष झाल्‍यानंतर कित्‍येक जुन्‍या भाजप कार्यकर्त्यांना आशेचे धुमारे फुटू लागले आहेत. दामू नाईक यांनी अध्‍यक्षपदाचा पदभार स्वीकारल्‍यानंतर संघटन बळकट करून पक्षाची ताकद वाढवणार, असे सांगून जे कोण पक्षाबरोबर कर्तव्‍य बुद्धीने ठाम राहिले त्‍यांचाच यापुढे गौरव होईल, असे आडवाटेने सूचित केले आहे. दामू नाईक हे प्रदेशाध्‍यक्ष झाल्‍यानंतर त्‍यांचे अभिनंदन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या फातोर्डा येथील निवासस्‍थानी असंख्‍य कार्यकर्त्यांनी भेट दिली. त्‍यात केपे येथील प्रारंभीपासूनच्या भाजप कार्यकर्त्यांपैकी एक असलेले राजीव सुखठणकर यांचाही समावेश होता. सुखठणकर हे पक्षाच्‍या स्‍थापनेपासून भाजपात कार्यरत आहेत. एक ज्‍येष्‍ठ भाजप कार्यकर्ते म्‍हणून त्‍यांच्‍याकडे पाहिले जाते. दामू नाईक यांना आलिंगन देत त्‍यांचे अभिनंदन करत असतानाचा सुखठणकर यांचा फोटो प्रसिद्ध झालेला आहे. केपेतील भाजप राजकारणाला आता वेगळे वळण मिळणार, याचे तर हे संकेत नाहीत ना? ∙∙∙

दामुबाब मग काढा ना हंटर!

बोलणे सोपे असते, कृती करायला धाडस असावे लागते, असे म्हणतात ते खरे. भाजप हा शिस्तबद्ध राजकीय पक्ष, अशी ओळख, पण पक्षाची गेलेली पत पुन्हा मिळवून देण्याचा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी निश्चय केला आहे, असे दिसते. भाजपात दादागिरीला थारा नाही, असे विधान करून दामू नाईक यांनी आपला इंगा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. असे असेल तर दामूला आपला शब्द खरा करून दाखविण्यासाठी काही राजकारणात वजन असलेल्यांकडून कडून कमळ चिन्ह माघारी घ्यावे लागेल, असे आम्ही नव्हे, तर भाजप कार्यकर्तेच सांगताहेत. दामूजी चला तर करा सुरुवात. काढाल ना आपला हंटर? ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'मगो' सोडून गेलेल्यांची स्थिती काय आहे? ढवळीकरांचा जीतना टोला; राजकीय निष्ठेबद्दल 'दामूंचे' अभिनंदन

कला ‘आता कमी’

कला अकादमीच्या कोकणी नाटक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आतापर्यंत २१ नाटकं राहिली आहेत. नंतर थोडी गळू शकतात. मराठी स्पर्धेच्या अनुभवाने भाजलेल्या कला अकादमीने व पोळलेल्या कलाकारांनी थोडी काळजी घेतली तर नियमभंग झाल्यावर होणारं चर्वित चर्वण व नाहक अतार्कीक चोथामय मंथन बंद होईल. नाटकाचा सादरीकरण अवधी कधी सुरू करायचा, पडदा उघडल्यावर की, आतून उद्‍घोषणा होते त्यावेळी ते नियमांतच स्पष्ट नाही. परीक्षकांकडे ॲनालॉग घड्याळ असो की, डिजिटल, तिन्हींची वेळ वेगवेगळी असते. अकादमीनेच डिजिटल घड्याळ लावून तो वेळ ठरवावा ते बरं होईल. अधिकाऱ्याने तुरे देऊन पळू नये. वेळ एक मिनिट कमी पडला वा एक मिनिट जास्त झाला तर ते नाटक रद्दबातल, असं त्याच रात्री अकादमीने परीक्षकांना सांगावं वा घोषित करावं. परीक्षकांमधे कोंकणीची, उच्चारशास्त्राची सखोल जाणकारी असणारा साहित्यिक वा नाटककार हवाच. कमी आपल्यात असते, कलेत नाही. ∙∙∙

Goa Political Updates
Goa politics:'गोवा महाराष्ट्राचाच भाग म्हणून चालवयची त्यांची इच्छा', CM सावंतांची बांदोडकरांशी तुलना; वेंझी - सरदेसाईंच्यात रंगला कलगीतुरा

गरमागरम चहा आणि मंत्रिपद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी सडा वास्को येथील एका छोट्या हॉटेलात चहा घेतला. मुख्यमंत्री अधून मधून स्थानिक हॉटेलमध्ये असे जात असतात. तेथे गेल्यावर उपस्थितांशी ते संवादही साधतात. यावेळी मात्र आमदार संकल्प आमोणकर त्यांच्यासोबत होते. त्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणाचे कौतुक करत समाज माध्यमावर चहाचे दोन ग्लास टेबलवर ठेवलेले आहेत आणि मुख्यमंत्री तेथे असलेल्या मुलीशी व युवकाशी संवाद साधत असल्याचे, अशी दोन वेगवेगळी छायाचित्रे व्हायरल केली आहेत. संकल्प यांना मंत्रिपदाचा शब्द दिल्लीतील भाजप नेत्यांनी दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतचा हा चहा संकल्प यांना मंत्रिपदापर्यंत घेऊन जाणार का, याकडे वास्कोवासीयांच्या नजरा मात्र लागल्या आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com