वाळपई: गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली वाळपई शहराची वाहतूक समस्या अद्याप सुटलेली नाही. यामुळे दररोज नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेकदा या संदर्भात मागणी करूनही याची अजिबात दखल घेतलेली नाही. त्यामुळे रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
(Traffic Problem In Walpai goa)
वाळपई शहरात गेल्या दहा वर्षापासून वाहतुकीची समस्या जटील बनलेली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वाळपई नगरपालिकेने अनेकदा प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांची डोकेदुखी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे .
काहीच दिवसापासून शाळा सुरू झाल्या. यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळी व संध्याकाळी हमखास वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे अनेकदा तास-तासभर वाहने अडकून पडतात. यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी वाळपई नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून वाहतूक आराखडा नियोजित करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले होते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक लावले होते .मात्र अजूनपर्यंत आराखडा अधिसूचित न झाल्यामुळे नगरपालिकेचा हा लाखो रुपयांचा खर्च सध्यातरी वाया गेलेला आहे.
दरम्यान, वाळपई नगरपालिका व वाळपई पोलिस यांनी संयुक्तरीत्या या संदर्भात प्रयत्न केल्यास वाहतुकीच्या कोंडी नियंत्रणात येऊ शकते. सरकारी व खासगी कामानिमित्त जाणारे अनेक नोकरदार पहाटे पाच वाजल्यापासून वाळपई शहरात प्रमुख ठिकाणी आपले वाहने पार्क करतात. त्यामुळे दिवसभर कोंडी होते. नगरपालिका व पोलिसांनी या संदर्भात विशेष मोहीम राबवून पहाटे पोलिसांची नियुक्ती केल्यास बेशिस्त वाहतूक पार्किंगवर शहरांमध्ये नियंत्रण येऊ शकते. तसे झाल्यास वाहतुकीच्या कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
राणेंकडून दुर्लक्ष होत असल्याचा समज
स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज होती. मात्र ते हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचा नागरिकांचा समज आहे. सातत्याने नागरिकांची होणारी फरफट दूर होण्याच्या दृष्टिकोनातून वाहतुकीची कोंडी सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. विश्वजीत राणे यांनी या संदर्भात विशेष लक्ष दिल्यास दहा दिवसांमध्ये वाहतुकीच्या आराखडा अधिसूचित होऊ शकतो. तसे झाल्यास वाळपईची ही समस्या कायमस्वरूपी निकालात निघेल.
सात वर्षापासून वाहतूक नियोजनाचा आराखडा अधिसूचित करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. अनेकदा हा आराखडा अधिसूचित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला अजून यश आलेले नाही. सातत्याने बेशिस्त पार्किंग हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असून बेशिस्त पार्किंगवर अजून कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाईत मोठ्या प्रमाणात अडथळा येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण जोपर्यंत वाहतूक आराखडा लागू होत नाही. तोपर्यंत बेशिस्त पार्किंग व दंडात्मक कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलिस यंत्रणेचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.