सासष्टी: मडगाव शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग तसेच नागरिकांची सुरक्षा या समस्या उग्र बनल्या आहेत. त्यावर त्वरित तोडगा काढणे गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर मडगावातील समाजसेवक प्रभव नायक यांनी जागरूक नागरिकांसह आज अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांची भेट घेतली व या समस्यांबद्दल त्यांना निवेदन सादर केले.
त्यानंतर बोलताना प्रभव नायक यांनी पत्रकारांना सांगितले की, मडगाव शहरातील शाळांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असते. या शाळा त्वरित दवर्ली येथील शैक्षणिक संकुलात स्थलांतरित करण्याची मागणी आम्ही निवेदनातून केली आहे. त्यामुळे कमीत कमी ३० टक्के वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकेल.
मडगावमध्ये पार्किंगचाही मोठा प्रश्न आहे. नगरपालिका इमारतीच्या मागे मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्पाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. जिथे पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे, ती जागा केवळ पार्किंगसाठीच आरक्षित करावी.
नगरपालिका इमारतीच्या मागे ‘रेंट ए बाईक’च्या दुचाकीसुद्धा पार्क करून ठेवल्या जातात. त्यामुळे नागरिकांना आपल्या दुचाकी तेथे उभ्या करता येत नाहीत. हा मुद्दाही आम्ही उपस्थित केला आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले. दरम्यान, आता ही समस्या सुटू शकेल, असे दिसू लागले आहे.
मडगावात आणखी कमीत कमी ५० वाहतूक पोलिसांची गरज असल्याचे आम्ही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मडगावच्या जुन्या बसस्थानकाची दैनावस्था झालेली आहे. तेथील भंगार वाहने हलविण्याची तसेच शेडची दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात लवकरच आम्ही आमदार तसेच सरकारला निवेदन देणार आहोत, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
मडगावमधील नागरिकांना विश्वासात घेऊनच मडगावचा मास्टर प्लॅन तयार करणे आवश्यक आहे. मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी एखाद्या स्थानिक सल्लागाराकडे द्यावी, असे प्रभव नायक म्हणाले. आम्ही ज्या समस्या उपस्थित केल्या आहेत, त्या रास्त आहेत. लोकांच्या हितासाठी आहेत. त्यात राजकारण नाही, असेही प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.
मडगावात सिटी बसेसचा त्रास वाढलेला आहे. बसचालक कुठेही बसेस थांबतात व प्रवाशांना घेतात. त्याचप्रमाणे त्या अगदी संथगतीने चालविल्या जातात. बसथांब्यांवर बसेस थांबत नाहीत अशी परिस्थिती आहे. जिल्हा प्रशसनाने सिटी बस स्टॉप निश्चित करणे गरजेचे आहे.प्रभव नायक, समाजसेवक (मडगाव)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.