पणजी: तोयार तळे परिसरात युनिटी मॉल नकोच, यावरून ग्रामस्थ चिंबलमध्ये आक्रमक झाले असतानाच त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या (बुधवारी) दुपारी ४ वाजता आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे ठरविले आहे.
विधानसभेत सकाळच्या सत्रात या विषयावरून विरोधक आक्रमक झाल्यामुळे १० मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले होते. दुपारच्या सत्रात सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी, तळे व परिसर हा पाणथळ भाग म्हणून आपल्याच सरकारने अधिसूचित केल्याचे निदर्शनास आणले. आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत फडकावलेला ‘एनआयओ’चा अहवालही सरकारनेच करवून घेतला असून पर्यावरणाची काळजी सरकारला आहे, म्हणूनच हा अहवाल करून घेतल्याचे ते म्हणाले.
चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्प हा अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्रात समाविष्ट नाही आणि ओलित संवर्धन क्षेत्रात या प्रकल्पाचे कोणतेही विकासकाम होणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले. ओलित संवर्धन प्राधिकरणाने देखील हा प्रस्तावित प्रकल्प अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्राच्या कार्यकक्षेबाहेर असल्याचे लेखी कळविले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाविरोधात उपोषण करणाऱ्या चिंबलवासीयांनी मंगळवारी पंचायतीसमोर सरपंच आणि पंचसदस्यांना जाब विचारण्यासाठी जोरदार आंदोलन केले. यावेळी इंदिरानगरमधील पंचसदस्य शंकर नाईक यांच्यावर उपोषणकर्ते धावून गेल्याने त्यांना पोलिसांनी कडे करून संरक्षणात बाहेर काढले. कदंब पठारावरील जागेत प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाचे काम सुरू झाल्याने चिंबल ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. या उपोषणानंतर झालेल्या जाहीर सभेनंतर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.