पणजी: विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची नोंदणी करण्यासाठी तसेच ‘सी–फॉर्म’ दाखल करण्यासाठी हॉटेल्स तसेच निवासी आस्थापनांना पर्यटन खात्यामार्फत सुरू केलेल्या ‘टुरिस्ट इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट एंटरप्राइज’ (टाईम) या सॉफ्टवेअरचाच वापर करण्याची सक्ती खात्याने केली आहे. पर्यटन संचालक केदार नाईक यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
पर्यटनाचा स्वर्ग असलेल्या गोव्यात दरवर्षी देशी–विदेशी मिळून सुमारे एक कोटी पर्यटक भेट देत असतात. राज्यात येणाऱ्या पर्यटकांची माहिती जमवण्यासाठी पर्यटन खात्याने ‘टाईम’ हे सॉफ्टवेअर सुरू केले आहे.
हॉटेल व्यावसायिक तसेच अतिथीगृह मालकांनी आपल्याकडे निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांची माहिती या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्याच्या सूचना खात्याने याआधीही दिलेल्या होत्या. परंतु, काही जणांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आल्याने खात्याने त्यांच्यासाठी पुन्हा निर्देश जारी केले आहेत, अशी माहिती पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, विदेशी पर्यटकांच्या माहितीसह ‘सी–फॉर्म’ही हॉटेल व्यावसायिक आणि अतिथीगृह मालकांना ‘टाईम’वरून सादर करावा लागणार आहे.
पर्यटकांची माहिती दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत ‘टाईम’वर अपलोड करणे सक्तीचे.
पर्यटकांबाबत अपूर्ण किंवा चुकीची माहिती सादर करू नये.
पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निवासस्थानांची वेळोवेळी तपासणी होईल.
‘टाईम’वर पर्यटकांची माहिती सादर न केल्यास संबंधितांवर गोवा पर्यटन व्यापार नोंदणी (सुधारणा) नियम, २०२२ च्या नियम (१७) नुसार कारवाई करण्यात येईल.
या निर्णयाचे जाणूनबुजून पालन न केल्यास काद्यानुसार आस्थापनाचा ऑपरेटिंग परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल.
‘टाईम’च्या अंमलबजावणीसह विदेशी पर्यटकांचे आतिथ्य करणाऱ्या सर्व निवासी युनिट्सना सी-फॉर्म सादर करणे अनिवार्य असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.