पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील (West Bengal Assembly Election) विजयानंतर टीएमसीने (TMC) आता इतर राज्यांमध्ये पक्ष विस्ताराचे काम सुरु केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गोवा (Goa) दौऱ्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गोव्याला भेट देणार आहेत. अभिषेक बॅनर्जी सध्या बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासोबत मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. तेथून परतल्यानंतर ते गोव्याला जाणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी पक्ष विस्ताराची जबाबदारी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोपवली आहे.
दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यातील आणखी काही बडे नेते तृणमूलमध्ये सामील होऊ शकतात. विशेष म्हणजे पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तृणमूलने तेथे निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तृणमूलचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या योजना पाहता गोवा विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
अभिषेक 12 डिसेंबरपासून गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बॅनर्जी 12 डिसेंबरला गोव्याला रवाना होणार आहेत. तेथे त्यांचे दोन दिवस कार्यक्रम असणार आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला अभिषेक बॅनर्जी गोव्याला जाणार असल्याची चर्चा होती, मात्र त्रिपुरा दौरा आणि नंतर ममता बॅनर्जींसोबत दिल्लीला जाणे यामुळे ते शक्य झाले नाही. ममता बॅनर्जी या नुकत्याच गोव्याचा दौरा करुन परतल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस, ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली आणि प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिस यांनी तृणमूलचा झेंडा हातात घेतला.
गोव्यात पक्षाचा विस्तार करण्याची योजना
ममता बॅनर्जी यांनी गोव्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम कृष्णानगरचे तृणमूल खासदार महुआ मैत्रा यांच्याकडे सोपवले आहे. महुआ तेथे वारंवार बैठका घेऊन लोकांना पक्षाशी जोडण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी यांचा गोवा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. अभिषेक बॅनर्जी तेथे तृणमूल काँग्रेसच्या सद्यस्थितीचा आढावा घेतील आणि आवश्यक सूचना देतील. कोलकाता येथे झालेल्या TMC वर्किंग कमिटीच्या बैठकीत लिएंडर पेस (Leander Paes) उपस्थित होते. बैठकीत पक्ष विस्ताराचे नियोजन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.