Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: गोव्यातील घटनांचीही दखल घ्या...

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील घटनांचीही दखल घ्या...

निरूपती बालाजी मंदिरात प्रसादात भेसळ केल्याने आझाद मैदानावर एकत्र जमून या घटनेचा गोमंतक मंदिर महासंघाने निषेध व्यक्त केला आणि कारवाई करण्याची मागणी केली. कृती योग्‍यच आहे, परंतु या महासंघाने गोव्‍यात काय चालले आहे हे देखील पाहावे. गेल्याच महिन्यात उत्तर गोव्यातील एका मंदिराच्या गाभाऱ्यात महिलेला मारहाण झाली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. अशाही घटनांची महासंघाने दखल घ्‍यावी. त्‍यातील सत्‍यता समोर आणावी. संस्थेच्या नावात मंदिर आहे. राज्‍यातील घटनांचा पाठपुरावा न केल्‍यास तो दुजाभाव ठरेल, नाही का?∙∙∙

आता वेध खाणींचे...

राज्यातील खनिज खाणी गेल्या बारा वर्षांपासून बंदच आहेत. थोडा फार लिलावाचा खनिज माल वाहतूक तेवढा करण्यात आला, पण आता पूर्ण क्षमतेने खनिज खाणी धडाडणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्याने खाण अवलंबित गावातील लोकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. चतुर्थीनंतर या खाणी सुरू होणार असे सरकारकडून सांगण्यात आले होते. आता चतुर्थी झाली, एकवीस दिवसांच्या गणपतीचे लवकरच विसर्जन करण्यात येणार आहे, त्यामुळे खाण अवलंबितांना आस लागून राहिली आहे ती खाणींची. विशेष म्हणजे एवढी वर्षे कसेबसे दिवस काढले, निदान आता तरी खाण व्यवसायातून चांगले दिवस येऊ दे, असेच साकडे खाणव्याप्त भागातील प्रत्येक घराघरांतून गणरायाला घालण्यात आले होते. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू

जसे अनेक नेत्यांचे विश्‍वासू कार्यकर्ते असतात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचेही विश्‍वासू मंत्री असतात. कुटबण जेटीच्या पाहणीनंतर लगेच त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी नुवेचे आमदार तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर जबाबदारी टाकली व सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आलेक्सबाब दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आले. ज्या मतदारसंघातून ते निवडून आले ते मतदार काँग्रेसचे, पण त्यांचाही रोष पत्करून आलेक्सबाब दिगंबर कामत व इतरांबरोबर भाजपात आले ते केवळ मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. त्यानंतर उशिरा आलेक्सबाबांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. भाजपात ताठ मानेने रहायचे असेल, तर नेत्यांचा विश्र्वास महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे आलेक्सबाबांनी या नेत्यांचा विश्र्वास मिळविण्याचा प्रयत्न केला व करीत आहेत. आता तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा विश्र्वासही संपादन केल्याचे बोलले जाते. म्हणूनच त्यांच्यावर कुटबण जेटीवरील स्वच्छतेची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी ते अत्यंत कसोशीने पार पाडीत आहेत असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल असा सूर होता, पण आता त्यांनी मंत्रिमंडळात आपले स्थान मजबूत केल्याचेही बोलले जात आहे. ∙∙∙

खरेच कारवाई होणार का?

रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला गेला, तर जबर दंड व त्याचबरोबर त्यासाठी वापरलेले वाहनही जप्त करण्याचा इशारा दोतोर मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, पण त्याबाबत सर्वसामान्य गोमंतकीय साशंकता व्यक्त करताना दिसत असून खरेच तशी कारवाई होणार का? अशी विचारणा करत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्यात लागू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार असा कचरा टाकण्यास मनाई आहे व तशी कृती केल्यास जबर शिक्षेची तरतूद आहे, पण आजवर तशी कारवाई झाल्याची उदाहरणे त्या मानाने अल्प आहेत. एका मडगावसारख्या भागात अशाप्रकारे कचरा टाकला जात असलेली अनेक ठिकाणे आहेत व नगरपालिकेसाठी ते डोकेदुखी ठरत आहेत. कोणी अशा चुकारांना पकडून दिले तरी पोलिस त्यांना नाममात्र दंड आकारून सोडतात व त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालल्याच्या तक्रारी आहेत. आता दोतोर सांगतात त्याप्रमाणे अशा कामासाठी वापरलेली वाहने जप्त केली गेली, तर त्याला पायबंद बसेल. पण खरेच अशी कारवाई होणार का? असा प्रश्न आम्ही नव्हे, तर सर्वसामान्य गोवेकरच विचारत आहेत. ∙∙∙

हे तर हिमनगाचे टोक!

सध्या सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाचा मुद्दा केवळ राज्यातच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतही चर्चेत आहे. या प्रकल्पाला परवानगी देण्यात आपला हात नाही असे सांगण्यात राजकारण्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. मात्र, ही परवानगी नेमकी दिली तरी कुणी ते सांगण्यास कोणीच पुढे येत नाहीत. हे प्रकरण मुरगाव तालुक्यातील, पण तेथील राजकारणीही मूग गिळून बसलेले दिसतात. त्यामुळे प्रत्येकजण आपला तर्क लढवीत आहेत. पण मुद्दा तोही नाही, गेल्या काही वर्षांत अशी किती भूतानी प्रकरणे घडली आहेत त्याची कल्पना सर्वसामान्यांना नाही. पण भूतानीमुळे सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून गोव्यात सहजगत्या कामे केली जातात हे उघड झाले आहे. हल्लीच सरकारने जुन्या बहुमजली इमारती व वसाहतींच्या जागी नव्या वसाहती उभारण्यासाठी एफआरआय वाढवून दिला आहे व त्यामुळे सर्वत्र गगनचुंबी इमारती वा मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यातही गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होतो व भूतानीमुळे तो दृढ झाला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत गोव्यात जे जमीनविषयक व्यवहार झाले आहेत त्याबाबतही त्यामुळे संशयाने पाहिले जात आहे. ∙∙∙

रवींच्या गोटात आनंदाची लहर

रवींचा वाढदिवस होऊन चार दिवस उलटले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांत उमटलेली आनंदाची लहर अजूनही कायम आहे. एकतर वाढदिवसाला गर्दी चांगली झालीच आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात रवींची वारेमाप स्तुती करून त्यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करून टाकले. त्यामुळे पात्रावाला भविष्यातसुद्धा फोंड्यात पर्याय नाही असे त्यांचे कार्यकर्ते बोलायला लागले आहेत. आता त्यांचा हा आशावाद खरा होईल की नाही याचे उत्तर पुढे मिळेलच, पण रवींच्या वाढदिवसाचे कवित्व सध्या फोंड्यात भरपूर गाजत आहे, एवढे मात्र नक्की.∙∙∙

आलेशबाब कुटबणमुळे फॉर्मात

आपले पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा सासष्टीत तरी ‘आलेशबाब’ म्हणूनच परिचित आहेत. सातजणांबरेाबर काँग्रेस सोडून ते भाजपात आले, तेव्हा अनेकांना जबर धक्का बसला होता. कारण अशाप्रकारे पक्षबदल करणाऱ्यांपैकी ते नव्हते. पण त्यांनी पक्ष बदलला हे खरे. त्या मागील कारण मतदारसंघाचा विकास हे असल्याचे त्यांनी मागाहून सांगितले. त्यानंतर काही काळाने त्यांना मंत्रिपदही मिळाले, पण त्याचा कोणताच लाभ भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी झाला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्या हाती नारळ दिला जाणार अशी चर्चा सुरू झालेली असतानाच आता अचानक कुटबण धक्क्याचा प्रश्न तयार झाला व तेथे स्थिती सावरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आलेशकडे सोपविली. त्यानंतर लगेच आलेश यांनी अशी काही पावले उचलली की आठवडाभरातच तेथील समस्या कधी नव्हे ती दूर होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यासाठी आलेश यांनी बैठकांचा सपाटा तर लावलाच, पण काही धाडसी निर्णयही घेतले व त्याची अंमलबजावणी कठोरपणे होईल याची खबरदारीही घेतली. त्यामुळे तेथील निकामी व बिनवापरातील नौका कधी नव्हे त्या हटल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे मंत्रिपद जाईल अशी चर्चा करणाऱ्यांची तोंडे मात्र आता बंद झाली आहेत. ∙∙∙

मंत्री मोन्सेरात अस्वस्थ

भाजप सरकारमध्ये नोकरभरतीचा घोटाळा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या आमदार व मंत्र्यांकडूनच उघडकीस आणण्याचे यापूर्वीही घडले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरतीप्रकरणी आमदार असताना बाबूश मोन्सेरात यांनी घोटाळा चव्हाट्यावर आणल्यावर सरकारला ही नोकरभरती प्रक्रियाच रद्द करावी लागली होती. आता मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या महसूल खात्यात कारकुनाच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विरोधी आमदारांनी केल्यानंतरही सरकार गप्प आहे. सरकार किंवा भाजप नेत्यांनी मंत्र्यांच्या बाजूने हा आरोप खोटा असल्याचे स्पष्टीकरण केले नाही. त्यामुळे गेले काही दिवस धुमसत असलेल्या मंत्री मोन्सेरात यांनी भाजपच्या गाभा समितीमध्ये त्याचा उद्रेक केला. यापूर्वी भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मोन्सेरात हे भाजप सरकारमध्ये असले तरी भाजप कार्यालयात क्वचितच भेट देतात. ते मनाने किती भाजपच्या जवळ आहेत हे आता त्यांनी बैठकीत केलेल्या त्रागामुळे अधिकच स्पष्ट झाले असून त्यांची भाजपमध्ये मुस्कटदाबी होत असल्याचेच उघड झाले आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

Miss Universe India: 51 स्पर्धकांना मागे टाकत 19 वर्षीय रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया!!

Navelim News: पुन्हा अडथळा! नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम स्थगित; आरोग्य खात्याचे सरकारकडे बोट

Goa News: गोवा पर्यटन विभागाचा अमृतसरमध्ये डंका! 'ITM 2024’ मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट दालन पुरस्कार

SCROLL FOR NEXT