पणजी: टपाली मतदानासाठी उत्तर प्रदेशमधून आयआरबीच्या पोलिसांना आणून त्यांच्या जागी गोव्यातून पोलिसांना जाण्यासाठी केलेल्या बस व्यवस्थेमुळे त्यांचे बरेच हाल झाले. या पोलिसांना निलंबनाची धमकी देऊन स्वखर्चाने उत्तर प्रदेशला जाण्यास भाग पाडले. सरकारने पोलिसांना दिलेल्या या अमानवी वागणुकीचा निषेध करण्यात येत आहे. या गैरव्यवस्थापनाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी काँग्रेसतर्फे गोवा प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी केली.
पणजीतील पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत पक्षाचे नेते जनार्दन भंडारी उपस्थित होते. यावेळी म्हार्दोळकर म्हणाले की, बसने उत्तर प्रदेशला जाताना 400 पोलिसांना कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत. सुमारे 1,800 किलोमीटरचा प्रवासकोणत्याही सुविधा नसलेल्या बसने केल्याने त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. या गैरव्यवस्थापनाला सरकार तसेच पोलिस खाते जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
पोलिसांना पाठवण्याची घाई कोणी केली?
गोव्यात मतदानादिवशी सेवा बजावल्यानंतर आयआरबीच्या पोलिसांना लगेच दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशला पाठवण्याची घाई कोणी केली, याची चौकशी करायला हवी. उत्तर प्रदेशला मतदानाचा पुढील टप्पा लांबणीवर असताना तसेच गैरव्यवस्थापनामुळे पोलिसांना हा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली. त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप जनार्दन भंडारी यांनी केला.
सुलक्षणा सावंत यांचेही पोलिसांकडे दुर्लक्ष: उत्तर प्रदेशातील प्रचाराला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी गोवा पोलिसांची छावणी आहे, तेथून काही किलोमीटर त्या प्रचारासाठी गेल्या होत्या. मात्र, पोलिसांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्या गेल्या नाहीत, अशी माहिती तेथील आयआरबी पोलिसांकडून मिळाली, अशी माहिती म्हार्दोळकर यांनी दिली.
...तर मनस्ताप टळला असता
मतदान न केलेल्या पोलिसांसाठी गोव्यातून पोलिस अधिकाऱ्यांसोबत निवडणूक अधिकारी, तसेच संबंधित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना उत्तर प्रदेशला पाठवले असते आणि तेथेच मतदान करून टपाल मतपत्रिका आणल्या असत्या तर हा मनस्ताप पोलिसांना सहन करावा लागला नसता. आता जे पोलिस गोव्यात मतदानासाठी येणार आहेत, त्यांना रेल्वेने आणण्याची व्यवस्था करावी तसेच उत्तर प्रदेशला गेलेल्या पोलिसांचा खर्च सरकारने द्यावा, अशी मागणी म्हार्दोळकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.