Sand Extraction: राज्यातील विकासकामे, वैयक्तिक बांधकामे, गृह संकुले, तसेच घरदुरुस्तीसाठी लागणारी रेती आता सिंधुदुर्गातून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेला दीड महिना वादामुळे सिंधुदुर्गातील रेतीची गोव्यात होणारी वाहतूक बंद होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार जीत आरोलकर, माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील दोन आणि गोव्यातील एका वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात रेती वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्गातील रेती तेथील वाहनांतून गोव्यात आणण्यात येते. शिवाय गोव्यातील वाहने तेथे जाऊनही रेती आणतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यात सर्वच नद्यांतून रेती काढण्यास बंदी लागू झाल्यानंतर रेतीसाठी सिंधुदुर्ग आणि कारवारवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. गोव्यातून रेती आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना सिंधुदुर्गात रोखण्यात आले.
त्यामुळे सिंधुदुर्गातून येणारी रेतीवाहू वाहने गोव्यात आणण्यास विरोध करण्यात आला. गेले दीड महिना या संघर्षात रेती वाहतूक बंद पडली आहे.
आरोलकर यांचा पुढाकार
मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर आमदार जीत आरोलकर यांनी याकामी पुढाकार घेतला. त्यांनी राणे यांच्याशी काल दूरध्वनीवर यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी राणे यांनी बैठकीसाठी पणजीत येण्याची तयारी दाखवली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि हा प्रश्न सोडवण्यात यश आले. राणे यांनी या बैठकीनंतर सांगितले, की स्थिती पूर्ववत करण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले आहे. त्याचे शक्यतो पालन केले जाईल. आरोलकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे रेतीचा प्रश्न मार्गी लागल्याचे नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.