Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: साखळीत नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षीत असल्याने या जागेसाठी रश्मी देसाई या प्रबळ दावेदार असणार आहेत, तर फोंड्यात मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनाच पहिली पसंती मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांची मते घेऊन, तसेच मुख्यमंंत्री व मंत्री नाईक यांच्याशी बोलूनच नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
मुख्यमंत्री कर्नाटकात विधानसभा निवडणुकीमुळे व्यस्त आहेत, ते आल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला आम्ही सर्व नगरसेवकांना भेटणार आहोत. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या नावावर मते जाणून घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.
साखळीत प्रभाग चारमध्ये टुगेदर फॉर साखळीचे हेवीवेट नेते धर्मेश सगलानी यांना पराभूत करणाऱ्या रश्मी देसाई यांना नगरसेवकाचा अनुभव आहे.
साखळीत अकरा जागा भाजपने जिंकल्या आहेत, त्यात सहा महिला आणि पाच पुरुष आहेत. सहा महिलांमध्ये रश्मी देसाई या अनुभवी असल्याने त्यांचाच पहिल्यांदा नगराध्यक्षपदासाठी विचार होण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय नाईक या यावेळी जायंट किलर ठरल्याने त्यांच्याच त्या पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत, तर यशवंत माडकरांना उपनगराध्यपदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
सुलक्षणा सावंत यांच्या मताचाही होणार विचार
साखळीचा नगराध्यक्ष निवडीत सुलक्षणा सावंत यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत कर्नाटक निवडणूक प्रचारात व्यस्त असताना सुलक्षणा सावंत यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडीत त्यांचे मतही जाणून घ्यावे लागणार आहे.
रितेश यांना पाठिंबा
फोंड्यात मंत्री रवी नाईक यांनी भाजपला सत्ता मिळवून दिल्याने त्यांचा शब्द प्रमाण असणार आहे. यावेळी रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र निवडून आले आहेत, रितेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात काम केल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. इतर नगरसेवकही त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करतील, अशी खात्री भाजप गोटातून व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.