पणजी: तेलंगणमध्ये गोव्यातून अमलीपदार्थ पुरवण्याचा आरोप असलेल्या संशयिताला पकडण्यासाठी तेलंगण पोलिसांना तब्बल सात दिवस दिवसरात्र पाळत ठेवावी लागली होती, अशी माहिती समोर आली आहे. तेलंगण पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विशेष पथकाने गोव्यात सात दिवस शोधमोहीम राबवून संशयित पुरवठादार बशारथ अहमद याला अटक केली आहे.
या कारवाईत त्याच्यासोबत प्रीतेश नारायण बोरकर यालाही ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या हालचालींवर पाळत ठेवून आणि त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची खातरजमा करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमद हा गोव्यातून तेलंगणातील ग्राहकांना अमलीपदार्थ पुरविणाऱ्या कथित जाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा पोलिसांना संशय होता.
त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक गोव्यात दाखल झाले होते. अहमद आणि त्याचे साथीदार हणजूण येथील एका सुरक्षित ठिकाणाहून कथित अमलीपदार्थ व्यवहार चालवत होते. या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची झडती घेऊन त्यांची माहिती तपासली जात होती. त्यामुळे थेट छापा टाकण्याऐवजी पथकाने संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले.
संशयिताच्या वास्तव्याच्या ठिकाणाची खातरजमा करण्यासाठी साध्या वेशातील पथके तैनात करण्यात आली होती. सात दिवसांच्या शोधमोहिमेनंतर बशारथ अहमद हा बाहेर पडला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यासोबत असलेल्या प्रीतेश बोरकर यालाही ताब्यात घेण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
विविध मार्गांनी तपास सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरकर हा पोलिसांचे लक्ष वेधले जाऊ नये यासाठी जुन्या कीपॅड मोबाईलचा वापर करत असल्याचा संशय आहे. तसेच, व्यवहारांसाठी ‘यूपीआय’ऐवजी रोख रकमेचा वापर केला जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. मुंबईतील एका पुरवठादाराकडून तसेच गोव्यात कार्यरत असलेल्या एका नायजेरियन नागरिकाकडून अमलीपदार्थ मिळत होते का? याचाही तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.